पुढारी ऑनलाईन डेस्क : सांगोला मतदारसंघातून सलग ११ वेळा विधीमंडळावर निवडून जाण्याचा विक्रम करणाऱ्या दिवंगत गणपतराव देशमुख यांना सोशल मीडियावर आदरांजली वाहिली जात आहे. दिवंगत गणपतराव देशमुख यांच्या अनेक आठवणी आणि त्यांची कर्तव्यनिष्ठा याबद्दल अनेक घटनांचा त्यावर उहापोह दिसत आहेत.
लहान लहान गोष्टींतून गणपतराव देशमुख यांनी बांधिलकी आणि कर्तव्यनिष्ठेचा वास्तुपाठ घालून दिला. देशमुख यांना सर्वच पक्षांच्या नेत्यांसह अनेकांनी आदरांजली वाहिली आहे.
डॉ. प्रशांत भामरे यांनी फेसबुकवर शेअर केलेला किस्सा खूप काही सांगून जातो. ते म्हणतात, माजी मंत्री गणपतराव देशमुखसाहेब आज आपल्यातून गेले.
ते विलासराव देशमुख यांच्या मंत्रिमंडळात मंत्री असताना माझा मित्र त्यांच्याकडे पीएस होता.
एक दिवशी त्यांना कार्यालयाचा राउंड घेत असताना वृत्तपत्रांच्या रद्दीचे गट्ठे एका कोपऱ्यात बांधून पडलेले दिसले. त्यांनी पीएसना विचारले 'याचे तुम्ही काय करणार आहात ?' त्यांनी सांगितले 'आजच विकून टाकतो.'
गणपतराव देशमुख म्हणाले, 'आलेल्या पैश्यांचे काय करणार?' पीएस साहेबाना सुद्धा माहीत नव्हतं की एवढ्या किरकोळ रकमेचं काय करायचं. त्यांनी सांगितलं की 'किरकोळ रक्कम आहे सर.'
देशमुख म्हणाले, 'किरकोळ असो की मोठी. वृत्तपत्र सरकारी पैशांतून कार्यालयात आली आहेत तर त्याच्या रद्दीचे पैसेसुद्धा सरकारी तिजोरीतच गेले पाहिजेत.'
शोधाशोध केल्यावर लक्षात आलं की असे पैसे जमा करण्यासाठी हेडच नाही. मग धावपळ करून हेड निर्माण करावं लागलं!
'मसरूफ़ ज़माना मेरे लिए क्यूं वक़्त अपना बरबाद करे' या साहिरच्या ओळी आठवल्या !
राजकारणातील एक साधे आणि सात्विक व्यक्तिमत्व हरपले अशा शब्दात मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी सांगोलाचे माजी आमदार आणि ज्येष्ठ शेकाप नेते गणपतराव देशमुख यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला.
आबासाहेबांनी राजकारणामध्ये एक आदर्श निर्माण केला, जो वर्षानुवर्षे एक मापदंड म्हणून राजकीय विश्वात राहील, असेही ते म्हणाले.
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी ट्विट केले असून ते म्हणतात, 'कष्टकरी, शेतकरी, शेतमजूर व उपेक्षितांच्या प्रश्नांवर सातत्याने
आवाज उठविणारे ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांच्या निधनाचे वृत्त दुःखद आणि क्लेशदायक आहे.
महाराष्ट्राच्या चार पिढ्यांच्या मतदारांशी घट्ट नाळ जुळलेला गणपतरावांसारखा लोकप्रतिनिधी खरंच विरळा म्हणावा लागेल.
लोकाभिमुख राजकारणाची कास धरत सांगोला मतदारसंघातून ११ वेळा निवडून येण्याची किमया गणपतरावांनी साधली.
त्यांच्या निधनामुळे जनसामान्यांचे आणि कार्यकर्त्यांचे निस्सीम प्रेम लाभलेला स्वच्छ प्रतिमेचा, ध्येयवादी नेता आज आपण गमावला आहे. भावपूर्ण श्रद्धांजली!
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणतात, 'ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांच्या निधनाने सामान्य माणसाचे असामान्य नेतृत्व हरपले आहे.
विधानसभेने एक अतिशय चांगला मार्गदर्शक गमावला आहे. माझे त्यांच्याशी अतिशय जवळचे संबंध होते. त्यामुळे त्यांचे जाणे ही माझी वैयक्तिक हानी आहे.
त्यांनी कधी कोणती तडजोड केली नाही. गणपतराव देशमुख यांच्या भाषणांचा एक वेगळा प्रभाव असायचा. संपूर्ण सभागृह त्यांचे भाषण तन्मयतेने ऐकायचे.
ते भाषण म्हणजे एक शिकवण असायची. त्यांनी संघर्ष केलेल्या दुष्काळी भागात आम्ही पाणी पोहोचविले तेव्हा आम्हाला आशीर्वाद देताना त्यांनी मागे-पुढे पाहिले नाही.
त्यांनी माझ्यावर खूप प्रेम केले. दुसरे गणपतराव देशमुख आता होणे नाही. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो.
त्यांचे आप्तस्वकीय आणि असंख्य चाहत्यांच्या दुःखात मी सहभागी आहे.
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणतात, 'साधी राहणीमान, उच्च विचार, एकाच मतदारसंघातून, एकाच पक्षाच्या निशाणीवर
तब्बल ११ वेळा विधानसभेत निवडून येण्याची किमया शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांनी केली होती.
आम्ही एक जेष्ठ नेता गमावला आहे.