भाई गणपतराव देशमुख : संघर्षाची लाल मशाल हरपली | पुढारी

भाई गणपतराव देशमुख : संघर्षाची लाल मशाल हरपली

सांगोला : अशोक बनसोडे

शेकापचे ज्येष्ठ नेते तथा माजी आमदार भाई गणपतराव देशमुख यांच्या जाण्याने जणू संघर्षाची लाल मशालच हरपली. आबांच्या रुपाने राजकारणातले चालते बोलते विद्यापीठच हरपल्याची भावना सर्वांमध्ये निर्माण झाली आहे. कष्टकरी, मजूर, कामगार या नाही रे वर्गासाठी आबांनी आपल्या संपूर्ण आयुष्यभराचे यज्ञच केला. या दीनदुबळ्याच्या नेत्याने शुक्रवारी सर्वांचा अखेरचा निरोप घेतला.

लोकनायक माजी आ गणपतराव उर्फ आबासाहेब देशमुख हे सांगोला विधानसभा मतदारसंघातून १९६२ ला पहिल्यांदा विधानसभेत निवडून गेले. १९७२ व १९९५ चा अपवाद वगळता त्यांनी राजकारणात मागे वळून कधीच पाहिले नाही. राज्यात ज्येष्ठ आमदार म्हणून त्यांची गणना केली गेली 1962 ते 2019 या दरम्यान राज्यातील सर्व मुख्यमंत्र्यांचा कारभार त्यांनी जवळून पाहिला आपल्या साध्या राहणीमुळे राज्याच्या कानाकोपर्‍यातील प्रत्येक लोकप्रतिनिधी त्यांच्या चरणी नतमस्तक होत यातच आबांच्या व्यक्तिमत्वाविषयी असलेला आदरभाव दिसून येतो.

भाई गणपतराव देशमुख

११ वेळेस विधानसभा जिंकल्यामुळे वर्ल्ड गिनीज बुकमध्ये आबांच्या कारकिर्दीची नोंद झाली आहे. तामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री कै एम करूणानिधी हे १० वेळेस विजयी झाले. देशात आबांसाहेबांचा ज्येष्ठ आमदार म्हणून पहिला क्रमांक लागतो. सांगोला मतदारसंघातून ११ व्यांदा त्यांनी विक्रमी विजय मिळविला आहे. अत्यंत साध्या रहाणीतील आबा हे तब्बल ५५ वर्षांपासून सांगोला तालुक्याचे प्रतिनिधित्व केले २०१२ मध्ये आमदार म्हणून विधानसभेतील त्यांच्या सहभागास ५० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल विधानसभा सभागृहात राज्य सरकारने त्यांचा यथोचित गौरव केला. हा सत्कार माझा नसून तालुक्यातील सर्वसामान्य जनतेचा सत्कार असल्याचे आवर्जून सांगितले. आपल्या 55 वर्षाच्या कार्यकाळात आबासाहेब हे बहुतांशी काळ विरोधी बाकांवरच होते, १९७८ मध्ये शरद पवार यांनी पुलोद सरकारमध्ये आणि १९९९ मध्ये शेकापने कॉंग्रेस आघाडी सरकारला पाठिंबा दिला तेव्हा, अशा दोन वेळा त्यांनी मंत्रिमंडळात काम केले.

कृषी मंत्री म्हणून शेती क्षेत्राला त्यांनी मोठे योगदान दिले आहे. १९९९ च्या मध्ये कॉंग्रेसशी मतभेद झाल्यानंतर शेकापने सरकारचा जेव्हा पाठिंबा काढून घेतला तेव्हा. आबांनी त्याचक्षणी मंत्रीपदाचा राजीनामा देवून मुंबईहून थेट सांगोल्यात दाखल झाले होते पश्चिम महाराष्ट्रात प्रस्थापितांच्या राजकारणात एकाच मतदारसंघातून, एकाच पक्षाच्या निशाणीवर तब्बल अकरा वेळा निवडून येण्याची किमया आबांनी दाखवून दिली आहे.

कायमस्वरूपी दुष्काळाच्या सावटाखाली असलेला सांगोल्याचा आज जो काही कायापालट झाला, त्याच्यामागे आबांसाहेबांचे भगिरथ प्रयत्न आहेत,हे सत्य कुणीच नाकारू शकणार नाही. प्रत्येक विषयाचा गाढा अभ्यास करण्याबरोबर चिकाटीने काम करण्याची जिद्द त्यांच्यात आहे. साठच्या दशकात संयुक्त महाराष्ट्राच्या यशस्वी आंदोलनानंतर राजकारणाचा बाज हा पक्षाची ध्येयधोरणे व वैचारिक पायावर आधारित होता.

भाई गणपतराव देशमुख

मार्क्सवादी विचारांना प्रमाण मानणार्‍या शेकापच्या माध्यमातून त्यांनी सातत्याने गरीब , कष्टकरी, शेतकरी, शेतमजूर आणि उपेक्षितांच्या प्रश्नावर आवाज उठविला. वैयक्तिक स्वार्थ व लाभ मिळविणे हा आमदारांचा एकमेव उद्देश कदापि असू शकत नाही, हे त्यांनी सहा दशकांच्या ध्येयवादी राजकारणातून दाखवून दिले आहे. विधेयकांच्या चर्चेत सहभागी होऊन अभ्यासू संसदपटूची ओळख त्यांनी निर्माण केली.

सांगोला मतदारसंघात धनगर आणि मराठा या दोन समाजाचे प्राबल्य आहे. पण त्यांनी सर्व समाजाला सोबत घेऊन काम केले. धनगर समाजाच्या आरक्षणाच्या प्रश्नावर त्यांनी कधीही आक्रस्ताळेपणाची भूमिका घेतली नाही. सभागृहात व सभागृहाबाहेर प्रश्नांची मुद्देसूद मांडणी व वैचारिक पायांच्या आधारावर त्यांनी ध्येयनिष्ठ राजकारण कायम केले. सध्याच्या राजकारणातील दुर्मिळ अशी गोष्ट म्हणजे स्वच्छ प्रतिमा आणि साधी रहाणी तसेच सर्व सामान्य जनतेसाठी २४ तास काम करणारा राजकारणी आज शोधावा लागतो.परंतु माजी आ गणपतराव देशमुख त्याला अपवाद ठरतील. त्यामुळेच मतदारांनी सातत्याने त्यांना पाठबळ दिले आहे. आमदार म्हणून ५५ वर्षे काम करत असताना त्यांच्यावर भ्रष्टाचाराचा एकही डाग लागला नाही व साधा आरोपही झालेला नाही.

सहकार क्षेत्रातही त्यांचे कार्य अजोड आहे. सांगोलासारख्या माळरानावर त्यांनी दोन सूतगिरण्या लोकसहभागातून उभ्या केली. विशेष म्हणजे राज्यातील एकमेव ही सूत गिरणी महिलांद्वारे चालवली जाते. महिलांच्या सबलीकरणासाठी त्यांनी अनेक गोष्टी केल्या आहेत. देशमुख यांच्या कार्यालयात गेल्यावर लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी शक्य ते प्रयत्न केले जातात, असा अनुभव अनेक लोक बोलून दाखवत असतात.

विशेष म्हणजे त्यांच्या मतदारसंघात कायदा आणि सुव्यवस्थेचा कोणतीही समस्या आजपर्यंत उद्भवलेली नाही. डीसीसी बँकेवर मार्गदर्शक म्हणून काम करताना त्यांनी फळबागांचा विकास करण्याचा ध्यास घेतला व त्यांच्या रेट्यामुळेच डाळींबबागांना अर्थसहाय्य देण्याचे धोरण बँकेला घेणे भाग पडले. त्यातूनच आज सांगोल्याची डाळिंब व अन्य भागातले द्राक्षे. सीताफळ या फळ उत्पादानांची आज परदेशात निर्यात होत आहे दुष्काळी सांगोला तालुक्याला टेंभू व म्हैसाळ योजनेचे पाणी आबांच्या प्रयत्नातून मिळाले आहे. ‘शेकाप’ला तीन ऑगस्ट २०१२ रोजी ६५ वर्ष पूर्ण झाली. याच वर्षी आबांच्या आमदारकीच्या कारकिर्दीला विधिमंडळात ५० वर्ष पूर्ण झाली. त्याचबरोबर हेच वर्ष संयुक्त राष्ट्रसंघाने ‘सहकाराचं वर्ष’ म्हणून घोषित केले होते आणि योगायोग असा की, सहकाराचा पाया रचणारे राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांचंही हे जन्मशताब्दी वर्ष होते.

भाई गणपतराव देशमुख

महाराष्ट्राचे शिल्पकार तथा पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्यापासून ते सध्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे काम जवळून पाहणारे आबा म्हणजे या राज्याच्या सामाजिक व राजकीय क्षेत्रातील चालते-बोलते विद्यापीठच म्हणता होते घरची परिस्थिती अत्यंत प्रतिकूल होती. स्वातंत्र्य चळवळीचा लढ्यातून रक्त सळसळल्यानंतर सांगोल्याचा हा सुपुत्र त्या यज्ञकुंडात उतरला आणि समाजकारणाची धुरा हाती घेत त्याने कायद्याची पदवी प्राप्त केली.

उभ्या देशातील राजकीय क्षेत्रात आबांसाहेबांचे नाव घेतल्यानंतर सांगोल्यातील लोकांचा ऊर भरून येतो 2019 च्या विधानसभा निवडणुकीत कार्यकर्त्यांची इच्छा असूनही त्यांनी प्रकृती अस्वास्थ्याने निवडणूक लढविण्यास ठाम नकार दिला होता वयोमानामुळे व कोरोना परिस्थितीमुळे गेल्या दीड वर्षांपासून सार्वजनिक कार्यक्रमास जाणे टाळत होते मला तालुक्यातील जनतेने भरभरून प्रेम दिले आहे मी राजकारणातून बाहेर असलो तरी समाजकारण शेवटच्या श्वासा पर्यंत सोडणार नाही मी जनतेची सेवा करत राहीन असे नेहमी बोलत असत सांगोल्याच्या इतिहासात त्यांचे नाव सुवर्णाक्षरांनी लिहले जाईल यात शंका नाही तालुक्यातील सर्व समाजातील लोकांशी थेट नाळ जोडलेला व भेदभाव न करता सर्वाना बरोबर घेऊन जाणार असा लोकनेता तालुक्यात पुन्हा होणे नाही अशा लोकनेत्यास लाल सलाम लाल सलाम…. …

Back to top button