कोल्हापूर; गौरव डोंगरे : कोल्हापूर मध्ये मोटारीत पत्नीचा मृतदेह…. आठ तासांचा प्रवास…. मागील सीटवर दोन चिमुकली… पत्नीच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार कुठे करायचे अशा विचारात पतीने कोल्हापूर गाठले. मध्यरात्री अडीच वाजता लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्याच्या आलेल्या या कुटूंबातील सुवासिनीचा पोलिसांच्या साक्षीने अंत्यसंस्कार झाला. 'जन्म कुठेही घ्यावा पण मृत्यू कोल्हापूर मध्ये यावा' याचा पुन्हा प्रत्यय आला.
धार्मिक कार्यासाठी पुण्याहून पती,पत्नी आणि दोन मुले असे कुटूंब सीमाभागातील गावात आले होते. सात-आठ दिवस नातेवाईकांजवळ राहिलेल्या या कुटूंबातील महिला आजारी पडली. तिला धापेचा त्रास होवू लागल्याने कर्नाटकातील रुग्णालयात नेण्यात आले. तिथेच तिचा उपचारदरम्यान मृत्यू झाला.
हे ही वाचा :
कोरोनाचे निदान झाल्याने मृतदेह सोबत न्यायचा की कसे? असा प्रश्न पतीसमोर होता. तिथेही अंत्यसंस्काराची व्यवस्था नाही अन नातेवाईकांच्या घरातही मृतदेह नेता येत नाही अशी चिंता पतीला सतावत होती.
पत्नीच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यासाठी पुण्यालाच परतायचा विचार पतीने केला. पण कोरोनाबाधित मृतदेह कसा न्यायचा म्हणून त्याच्या पॅकींगसाठी तो कित्येक ठिकाणी फिरला. आठ तासांचा प्रवास करुन ही गाडी कोल्हापुरात आली.
मोटारीचा आठ तासांचा प्रवास करुन चिंताग्रस्त चेहर्याने आणि मदतीच्या आशेवर कुटूंबप्रमुख लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्याच्या दारात आला होता. पत्नीचा मृतदेह पॅकींग करुन मिळावा अशी विनवणी त्याने पोलिसांना केली. ड्युटीवर असणारे सहायक फौजदार भगवान गिरीगोसावी, निवास पाटील यांनी थेट पोलिस निरीक्षक अनिल गुजर यांना प्रसंग सांगितला.
पोलिसांनी या कुटूंबाची करुण कहानी ऐकून घेवून कोल्हापुरातच मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्याची विनंती केली. आठ तास मृतदेह घेवून चाललेल्या या प्रवासाला पोलिसांमुळे माणुसकीची किनार मिळाली. "जन्म कोठेही झाला तरी मृत्यू कोल्हापुरात व्हावा" असे का म्हटले जाते याचाही प्रत्यय पुन्हा आला.