नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : कोरोना महारोगराईचे संकट वाढतच चालले आहे. या पार्श्वभूमीवर देशाची राजधानी दिल्लीला लागून असलेल्या ग्रेटर नोएडामध्ये भरणारा ऑटो एक्स्पो लांबणीवर टाकण्यात आला आहे.
सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमोबाईल मॅन्युफॅक्चरर्सकडून (सियाम) सोमवारी ही माहिती देण्यात आली.
२ ते ९ फेब्रुवारी २०२२ या कालावधीत ऑटो एक्स्पो – दि मोटार शो चे आयोजन करण्यात आले होते. मात्र कोरोना संकटामुळे हे आयोजन पुढे ढकलण्यात आले आहे.
ऑटो एक्स्पोची नवीन तारीख आगामी काही महिन्यात जाहीर केली जाणार आहे. दर दोन वर्षांनी ऑटो एक्स्पोचे आयोजन केले जाते.
वाहन कंपन्यांकडून तयार केली जाणारी नवीन वाहने, ऑटो उत्पादने, ओरिजिनल इक्यूपमेंट उत्पादकांना (ओईएम) आपल्या उत्पादनांचे प्रदर्शन करण्याची मोठी संधी या एक्स्पोमुळे मिळत असते.
देश-विदेशातून लाखो लोक ऑटो एक्स्पोला हजेरी लावत असतात. याआधी २००० साली भारतात ऑटो एक्स्पो भरला होता. ऑटो एक्स्पोची तयारी करण्यासाठी सुमारे एक वर्षाचा कालावधी लागतो.
सध्याची कोरोना संकटाची परिस्थिती पाहता निश्चित कालावधीमध्ये ऑटो एक्स्पो घेणे शक्य नाही, त्यामुळे नियोजित तारीख पुढे ढकलली जात असल्याचे सियामचे महासंचालक राजेश मेनन यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे सांगितले आहे.