Latest

धुळ्यात पाणी प्रश्न पेटला, शिवसेनेच्या ठाकरे गटाचा महानगरपालिकेवर मोर्चा

गणेश सोनवणे

धुळे : पुढारी वृत्तसेवा 

धुळे शहरातील विशेषतः देवपूर भागातील संतप्त महिलांनी, नागरिकांनी शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या नेतृत्वात आज धुळे महानगरपालिका आयुक्त यांच्या कार्यालयात हंडा मोर्चा काढला. भाजपचे खासदार व महापौर सातत्याने पाणीपुरवठ्याच्या समस्येवर चुकीचे व खोटे आश्वासन देऊन धुळेकर जनतेची दिशाभूल करीत असल्याचा आरोप यावेळी शिवसेना पदाधिकारी व आंदोलकांनी केला. शहरातील पाणीपुरवठ्याच्या स्त्रोतांमध्ये मुबलक पाणी असताना देखील नियोजन अभावी व मनपाचे प्रशासनावर नियंत्रण नसल्याकारणाने धुळेकर नागरिकांना पाणी देऊ शकत नसल्याची टीका यावेळी आंदोलकांनी केली.

शहरात मुबलक पाणी नसल्याने धुळेकर नागरिकांना पाण्यासाठी त्राही त्राही फिरावे लागत आहे. यास सर्वस्वी अकार्यक्षम प्रशासन व निष्ठूर सत्ताधारी जबाबदार आहेत अशी भावना नागरिकांकडून यावेळी व्यक्त करण्यात आली.

शासनाकडून आलेल्या 154 कोटीच्या पाणीपुरवठा योजनेत सत्ताधारी भाजप पक्षातील काही पदाधिकारी, प्रशासनातील काही संबंधित अधिकारी यांनी ठेकेदाराशी केलेल्या संघनमतामुळे, पाणीपुरवठा योजनेअंतर्गत झालेल्या कामात कोट्यावधीचा भ्रष्टाचार झालेला आहे. सुमारे चार वर्षां पेक्षा जास्त कालावधीपासून अपूर्ण अवस्थेत व रखडलेली पाणीपुरवठा योजने अद्याप चालू करण्यात आलेली नाही. याचे मूळ कारण म्हणजे या योजनेत झालेल्या भ्रष्टाचारामुळे, सदर पाणीपुरवठा योजना फेल गेल्याचे चित्र जवळपास स्पष्ट झाले आहे. भ्रष्टाचार व कोट्यावधीची योजना फेल गेल्याची वस्तुस्थिती धुळेकर नागरिकांपासून लपवण्याच्या हेतूने भाजप पदाधिकाऱ्यांकडून टोलवाटोलवी करण्यात येत आहे. तसेच चुकीचे व भंपक विधाने करून सुमारे वर्षभरापासून भाजप खासदार व वेळोवेळी आलेल्या महापौरांनी दिशाभूल केली असल्याचा आरोप यावेळी आंदोलकांनी केला.

पाणी घ्यावं लागतय विकत 

तब्बल दहा ते पंधरा दिवस पाणी मिळत नसल्याकारणाने, नागरिकांना पिण्याचे पाणी विकत घ्यावे लागत आहे. त्यासाठी मोठ्या प्रमाणावर पैसे मोजावे लागत आहे. पाणीटंचाईचा गैरफायदा घेऊन, काही लोक पाण्याचा काळाबाजार ही करीत आहेत. पिण्याच्या पाण्याचे जार च्या किमतीत प्रचंड वाढ झालेली दिसत आहे. याव्यतिरिक्त वापराच्या पाण्यासाठी नागरिकांना दूरवर जाऊन ड्रम च्या साह्याने लांब अंतरावरून पाणी वाहून आणावे लागत आहे. नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत. तसेच वापरण्याच्या पाण्यासाठी नागरिकांना पाण्याचे टँकर मागावे लागत आहे. त्यासाठी ही मोठ्या प्रमाणावर पैसे मोजावे लागत आहे. तसेच तब्बल दहा ते पंधरा दिवस पाणी येत नसल्याकारणाने पाणी साठवण्यासाठी नागरिकांना अतिरिक्त साठवणीचे ड्रम इत्यादी घ्यावी लागत आहे.

 धुळे शहराची बदनामी 

आखाजी सणानिमित्त तसेच सुट्टी असल्या कारणाने महाराष्ट्र तसेच देशातून धुळेकरांच्या नातेवाईकांकडून धुळ्यात येण्यासाठी नकार दिला जात असल्याचे अनेक नागरिकांनी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांकडे तक्रार केली आहे. याचे प्रमुख कारण म्हणजे "धुळ्यात दहा-पंधरा दिवस पाणी येत नसल्याने पिण्यासाठी तसेच आंघोळीसाठी पाणी उपलब्ध होत नाही. या कारणास्तव आम्ही धुळ्यात येणार नाही." असे सांगण्यात येत असल्याची माहिती यावेळी ठाकरे गटाच्या पदाधिका-यांनी दिली. धुळे शहरात दोन दिवसात पाणी न मिळाल्यास शिवसेनेच्या वतीने तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल असा इशारा महापालिका प्रशासनाला यावेळी देण्यात आला.

संगीता जोशी, मनीषा शिंपी, उज्वला कोतकर, केसरताई राठोड, शिल्पा जाधव, जिल्हाप्रमुख अतुल सोनवणे, उपजिल्हाप्रमुख किरण जोंधळे, महानगर प्रमुख ङाॅ. सुशील महाजन, धीरज पाटील, ललित माळी, संगिता जोशी, पिंटु शिरसाठ, भरत मोरे, देविदास लोणारी,  युवा सेनेचे हरीष माळी, विनोद जगताप, हिमांशु परदेशी, महादु गवळी, भटु गवळी,  सिध्दार्थ करनकाळ,  मोहित वाघ, अक्षय पाटील, शुभम रणधीर आदी उपस्थित होते.

हेही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT