दै. 'पुढारी' आयोजित : बारामतीच्या ग. दि. मा. सभागृहात साकारणार गीतरामायण

पुणे : पुढारी वृत्तसेवा : ‘महाराष्ट्राचे वाल्मीकी’ ग. दि. माडगूळकर यांनी रचलेले आणि भावगंधर्व सुधीर फडके यांनी स्वरसाज चढविलेले ‘गीतरामायण’ कितीही वेळा ऐकले, तरी त्याची गोडी कमी होत नाही. हेच गीतरामायण बारामतीकरांसमोर सादर करणार आहेत, ‘धूतपापेश्वर’ प्रस्तुत तसेच पॉवर्ड बाय श्री चैतन्य टेस्ट ट्यूब बेबी सेंटर, बारामती आणि दै. ‘पुढारी’ आयोजित हा बहारदार कार्यक्रम होणार आहे बारामती ग. दि. मा. सभागृहात शनिवार दि. २७ मे रोजी सायंकाळी ६ वाजता.
या देशाचे महाकाव्य असलेल्या रामचरित्रातील एकामागून एक अशा प्रसंगांवर उत्कट अशा रचना गदिमांनी केल्या अन् त्याला तितक्याच सुमधुर चाली सुधीर फडके म्हणजेच बाबूजींनी रचल्या. ‘गीतरामायण’च्या शब्दमाळेतील ५६ गीते मनाच्या विविध भावावस्थांनी ओथंबलेली काव्यफुलेच आहेत. ‘स्वयें श्रीरामप्रभू ऐकती…’ या गीतातील पंक्ती सुरू झाल्या, की मराठीजनांच्या माना नकळत डोलू लागतात. त्यानंतर मग ‘रामजन्मला ग सखी राम जन्मला…’ हे रामजन्माचे, ‘स्वयंवर झाले सीतेचे’ सारखे सीतास्वयंवराचे, ‘जेथे राघव तेथे सीता’ हे वनवासाला आपल्यालाही नेण्याची गळ घालणाऱ्या सीतेचे, ‘पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा’
हे मानवी जगण्याचे सार सांगणारे रामाने भरताच्या केलेल्या समजा- वणीचे, ‘मज आणून द्या तो हरीण अयोध्यानाथा’ हे सुवर्णमृग आणण्याचा हट्ट धरणाच्या सीतेचे गीत, या क्रमाने रामकथा उलगडत जाते. राम-रा- वणाच्या युद्धाचे, सीतेच्या अग्रिदिव्याचे अन् पुढे तिला वनवासाला सोडण्याचे मन हेलावणारे प्रसंग आपल्या प्रतिभेने गदिमांनी जिवंत केले आहेत.
ते ऐकताना मराठीजन आनंदतात, अश्रूंत बुडून जातात, भावभक्तीने गुणगुणू लागतात. बाबूजींचे सुपुत्र श्रीधर यांच्याकडून ‘गीतरामायण’ ऐकताना बाबूजींची आठवण होते. बारामतीच्या ग. दि. मा. सभागृहात होणाऱ्या या कार्यक्रमाला बारामतीकरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे. कार्यक्रम प्रवेशिका दै. पुढारी कार्यालय, नगरपरिषद उद्योगभवन, पहिला मजला, भिगवण चौक, बारामती येथे दि. २४ मेपासून उपलब्ध राहतील. अधिक माहितीकरिता संपर्क क्रमांक : ९८५०५५६००९.
- ग. दि. मा. सभागृह, विद्या प्रतिष्ठान इन्स्टिट्यूटजवळ, भिगवण रोड, बारामती. शनिवार, दि. २७ मे २०२३ रोजी सायंकाळी ६ वाजता.