नगर: तीन वर्षांत चांगल्या कामात विघ्न, आ. शिंदेंचा पवारांवर घणाघात; सभापतींच्या पाठीशी उभे राहण्याची ग्वाही | पुढारी

नगर: तीन वर्षांत चांगल्या कामात विघ्न, आ. शिंदेंचा पवारांवर घणाघात; सभापतींच्या पाठीशी उभे राहण्याची ग्वाही

जामखेड (नगर), पुढारी वृतसेवा: कोरोना काळात मुदत संपणार्‍या राज्यातील अनेक बाजार समितींच्या संचालक मंडळाला तत्कालीन मविआ सरकारने मुदतवाढ दिली. मात्र जामखेडच्या बाजार समितीला मुदतवाढ न देता 2 वर्षे प्रशासक आणत आ. रोहित पवार यांनी कारभार केला आहे. चांगल्या कामाला आडकाठी आणायची हिच पद्धत मागील अडीच/तीन वर्षात सुरू असल्याचा घणाघात आ. राम शिंदे यांनी राष्ट्रवादीचे आ. रोहित पवार यांच्यावर केला. शेतकर्‍यांच्या अडचणी सोडविण्यासाठी बाजार समितीचे नूतन सभापती व संचालक मंडळाच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहणार असल्याची ग्वाही आ. शिंदे यांनी दिली.

नवनिर्वाचित सभापती शरद कार्ले यांनी पदभार घेतल्यानंतर आ. राम शिंदे बोलताना म्हणाले, खर्डा येथील रस्त्याचा प्रश्न मार्गी न लावता रात्री बंगल्यावर बोलावून रस्त्याला निधी देत आहेत. रस्ता आडविणार्‍या कार्यकर्त्यांना तेथेच प्रश्न मार्गी लागणे अपेक्षित असते, परंतु आ. पवारांची, ‘तिथेच बसा, मी चाललो दुसर्‍या गाडीत’ ही वर्तवणूक असंवेदनशील आहे. आमदाराची गाडी थांबवा, रस्ता मिळावा अशी आ. पवारांची परिस्थिती झाल्याचा टोला आ. शिंदे यांनी लगावला.

लोकांना आडवायचं आणि बोलावून घेत काम करून द्यायचे, हाच कार्यक्रम गत अडीच वर्षांत सुरू आहे. विकासाच्या नावाने काहीच काम नाही आणि सोशल मिडीयावर आव आणायचा असा घणाघात आ. शिंदे यांनी केला. सभापती निवडणुकीत परमेश्वरानेही ईश्वर चिठ्ठीच्या माध्यमातून कौल दिला आहे. मी कुणाला त्रास दिला नाही आणि देणारही नाही, परंतु आता विरोधकांचे काम करायचे की नाही हा विचार नक्की करणार असल्याचे शिंंदे म्हणाले. सभापती शरद कार्ले, रवी सुरवसे, डॉ. भगवान मुरूमकर, अजय काशीद, सचिन घायवळ, अमित चिंतामणी, कैलास माने, उगले, बापूसाहेब ढवळे, सचिन घुमरे, सोमनाथ राळेभात, नंदू गोरे, विष्णू भोंडवे, डॉ. ज्ञानेश्वर झेंडे, तुषार पवार, सलीम भगवान, आजीनाथ हजारे, पांडुरंग उबाळे, महेंद्र बोरा, प्रवीण सानप, सोमनाथ पाचारणे, अभिजित राळेभात, उद्धव हुलगुंडे, शहाजी राजेभोसले, मोहन गडदे, उमेश रोडे, जालिंदर चव्हाण, यावेळी उपस्थित होते.

‘माझी नजर पडली की सोने होते’

सभापती झालेले शरद कार्ले निवडणूक लढविण्याच्या मनस्थितीत नव्हते. मात्र माझी नजर सच्चा कार्यकर्त्यांवर कायम आहे. निवडणूक लढवायाची असे म्हणताच ते तयार झाले. सर्वाधिक मतांनी ते निवडून आले. माझी नजर कार्यकर्त्यावर पडली की त्याचे सोने निश्चित होते, असे आ. शिंदे म्हणाले.

शेतकर्‍यांच्या अडचणी सोडविण्यासाठी कटिबध आहे. आ. शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली शेतकर्‍यांना सोईसुविधा दिल्या जातील.
– शरद कार्ले, नवनिर्वाचित सभापती

बाजार समितीच्या निवडणुकीच्या वेळी आ. पवार म्हणत होते की, शहाजी राजेभोसलेंमागे कोणी नाही. आता निकाल लागला आहे. कोण कुणाचे मागे, हे कळाले असेल. कुणाला कमी लेखू नका, गर्वाचे घर खाली होते.
– शहाजीराजे भोसले, तालुकाध्यक्ष, काँग्रेस

Back to top button