‘हत्ती जाणार; पण शेपूट राहणार !’ सांगवी-पणदरे रस्त्याची स्थिती | पुढारी

‘हत्ती जाणार; पण शेपूट राहणार !’ सांगवी-पणदरे रस्त्याची स्थिती

सांगवी(पुणे); पुढारी वृत्तसेवा : सांगवी-पणदरे रस्त्याचे रुंदीकरण सुरू आहे. परंतु, सांगवीकडील बाजूस अंदाजे एक किलोमीटर अंतरावरील कामासाठी निधीच मिळाला नसल्याने ‘हत्ती जाणार; पण शेपूट राहणार’ अशी वेळ आली आहे. अपूर्ण कामासाठी सांगवी ग्रामपंचायत सदस्य विजय तावरे यांनी विरोधी पक्षनेते अजित पवारांना रविवारी (दि. 21) निवेदन दिले आहे.

बारामती तालुक्यातील रस्त्यांसाठी विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या पाठपुराव्यामुळे कोट्यवधी रुपयांचा निधी मिळतो. सांगवी-पणदरे या 11 किलोमीटर रस्त्यासाठी तीस वर्षांत एकदाही सलग निधी मिळाला नव्हता. वर्षभरापूर्वी तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रुंदीकरणासाठी निधी दिला. गेल्या वर्षी पणदरेपासून मानाजीनगरपर्यंत पाच किलोमीटर रुंदीकरण पूर्ण झाले आहे. यंदा मानाजीनगर ते सांगवीपर्यंत सहा किलोमीटरवरील काम होणे अपेक्षित होते. परंतु, पाचच किलोमीटर अंतरावरील रुंदीकरणासाठी निधी मिळाला.

उर्वरित एक किलोमीटर रस्तारुंदीकरणाचे काम रखडणार आहे. सांगवी-पणदरे रस्त्यावरून पाचभाईवस्ती, तावरेवस्ती, 18 फाटा, अहिल्यानगर, धुमाळवाडी, कोकरेवस्ती, इरिगेशन बंगला, आबाजीनगर, मानाजीनगर, भिकोबानगर, पवईमाळ, जगतापवस्ती व पणदरे आदी ठिकाणी विद्यार्थी, ऊस, दूध व तरकारीची वाहतूक मोठ्या प्रमाणावर असते. वारंवार या रस्त्यावर वाहतूक कोंडी होत असल्यानेच रस्तारुंदीकरण होणार आहे.

जूननंतर निधी उपलब्ध होणार

सांगवी-पणदरे उर्वरित सहा किलोमीटर रस्तारुंदीकरणासाठी निधीची तरतूद केली होती. परंतु, जी.एस.टी. व डांबराचे दर वाढल्यामुळे सुमारे एक किलोमीटर अंतरावरील रुंदीकरणाचे काम कमी होणार आहे. जूनमध्ये त्यासाठी निधी उपलब्ध होणार असल्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाचे शाखा अभियंता स्वप्निल तांबे यांनी सांगितले.

Back to top button