मुंबई : पुढारी वृत्तसेवा :शनिवारी मुलीचे लग्न असतानाही मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर (Vivek Phansalkar) यांनी आधी कर्तव्याला मान दिला आणि महामोर्चाच्या बंदोबस्तावर तैनात राहिले.
महाविकास आघाडीचा हल्लाबोल मोर्चात राज्यभरातून कार्यकर्ते येणार असल्याने प्रचंड बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. मोर्चाच्या ठिकाणी ०३ अप्पर पोलीस आयुक्त, •०८ ते १० पोलीस आयुक्त, सहायक पोलीस आयुक्त, पोलीस निरीक्षक, सहायक पोलीस निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक असे एकूण ३१७ पोलीस अधिकारी, ०१ हजार ८७० पोलीस अंमलदार तसेच, राज्य राखीव पोलीस बलाच्या २२ प्लाटुन, दंगल नियंत्रण पथक, अश्रुधुर पथक, वॉटर कॅनन, सीसीटीव्ही व्हॅन, राखीव पथके अशी एकूण ३० पथके तैनात होती. हा बंदोबस्त पाहता पोलीस आयुक्त फणसाळकर (Vivek Phansalkar) पूर्ण वेळ आपल्या परिवारासोबत राहून मुलीच्या लग्नाची जबाबदारी पार पाडू शकणार होते. तरीही त्यांनी आधी कर्तव्य महत्वाचे मानून पूर्णवेळ बंदोबस्ताचे नेतृत्व केले. मोर्चा आणि त्यानंतरची सभा पार पडल्यानंतरच फणसाळकर घरच्या लग्नसोहळ्याला रवाना झाले.
अत्यंत कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी म्हणून असलेला लौकीक फणसाळकर यांनी कायम राखला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही त्यांचे कौतुक केले आहे.
हेहा वाचा