पुढारी ऑनलाईन डेस्क : व्हिडिओ गेम आणि स्मार्ट फोनवरील व्हिडिओमुळे मुलांच्या मानसिकतेवर परिणाम होतो, हे यापूर्वीच्या अनेक संशोधनात स्पष्ट झालं आहे. मात्र व्हिडीओ गेम आणि YouTube वरील व्हिडिओमुळे मुलांना ऑब्सेसिव्ह कम्पलसिव्ह डिसऑर्डर (ओसीडी) या मानसिक विकाराची भीती आहे, असे नवीन संशोधनात आढळलं आहे. मुलांना होणार्या ऑब्सेसिव्ह कम्पलसिव्ह डिसऑर्डर (ओसीडी) या मानसिक विकारासंदर्भात कॅलिफोर्निया युनिव्हर्सिटीमध्ये संशोधन झालं. याचा अहवाल 'जर्नल ऑफ अॅडोलसेंट हेल्थ'मध्ये प्रकाशित करण्यात आला आहे. ( Kids and OCD ) जाणून घेवूया या नवीन संशोधनाविषयी….
ओसीडी हा एक मानसिक विकार आहे. एखादी कृती वारंवार करणे. उदाहरण. वारंवार हात धुणे. मुलांना हा विकार झाल्यास त्याचे परिणाम पुढील आयुष्यातही होतात, असे यापूर्वीच्या संशोधनात स्पष्ट झाले आहे. त्यामुळे व्हिडिओ गेम आणि स्मार्ट फोनवरील व्हिडिओचा 'ओसीडी' संबंधावर सखोल संशोधन करण्यात आले.
कॅलिफोर्निया युनिव्हर्सिटीने ९ ते १० वयोगटातील ९ हजार मुलांना सर्वेक्षणासाठी निवडलं. यामध्ये मुलं आणि मुली या दोघांचाही समावेश होता. विशेष म्हणजे ही मुलं वेगवेगळ्या वांशिक गटातील होती. मुलांना टीव्ही किंवा चित्रपट पाहणे, व्हिडिओ पाहणे, व्हिडिओ गेम खेळणे, सोशल मीडियावरील चॅटिंग, यासह विविध प्रकारच्या स्क्रीन टाइमवर साधारणपणे किती तास घालवता आदी प्रश्न विचारण्यात आले. या माहितीचा वापर मुलांनी ठराविक दिवशी किती स्क्रीन वेळ घालवला याचा अभ्यास करण्यात आला.
संशोधन टीमचे प्रमुख व कॅलिफोर्निया युनिव्हर्सिटी ऑफ अॅडॉलेसेंट अँड यंग अॅडल्ट मेडिसिन विभागातील बालरोगशास्त्राचे सहाय्यक प्राध्यापक डॉ. जेसन नगाटा यांनी म्हटलं आहे की, दररोज व्हिडीओ गेम खेळण्याचा मुलांच्या मानसिकतेवर थेट परिणाम होतो. अशा मुलांना 'ओसीडी'चा धोका १५ टक्क्यांनी वाढतो. तसेच जी मुलं YouTube वर व्हिडिओ पाहतात त्यांनाही ही शक्यता ११ टक्के एवढी असते. या मुलांना 'ओसीडी'चा धोका वाढतो, असेही संशोधनात स्पष्ट झाले.
ज्या मुलांनी व्हिडिओ गेम खेळण्यात बराच वेळ घालवला त्यांना सातत्याने व्हिडिओ गेमच खेळावे असे वाटत राहिले. इच्छा असूनही ते व्हिडिओ गेमपासून परावृत्त होवू शकले नाहीत. त्यांच्या मनात सातत्याने केवळ व्हिडिओ गेमचाचा विचार होता, असे डॉ. जेसन नगाटा यांनी सांगितले. हाच त्रास यू ट्यूबवर व्हिडिओ पाहणार्या मुलांनाही झाला. विशेष म्हणजे पारंपरिक टीव्ही पाहणार्या मुलांना ओसीडीचा संदर्भातील कोणतीहील लक्षणे आढळली नाहीत. तसेच सोशल मीडियाचा आणि ओसीडी यांच्यातील परस्पर संबंध थेट दिसला नसला नाही. कारण संशोधनात ९ ते १० वर्षातील मुलांचा समावेश होता. सोशल मीडिया वापरत असलेल्या मुलांपेक्षा हा लहान वयोगट असल्याने याचा परिणाम दिसला नाही, असेही डॉ. नगाटा यांनी म्हटलं आहे.
हेही वाचा :