न्यूयॉर्क : 7 एप्रिलला 'वर्ल्ड हेल्थ डे'च्या आधी जागतिक आरोग्य संघटनेने एक चकीत करणारे संशोधन केले आहे. त्यामध्ये म्हटले आहे की, जगातील 99 टक्के लोकसंख्या अशुद्ध हवेत श्वास घेत आहे. याचा अर्थ पृथ्वीवरील 797 कोटी लोक हवेच्या प्रदूषणाच्या विळख्यात अडकलेले आहेत.
'हु'च्या टीमने 117 देशांमधील सहा हजारांपेक्षाही अधिक शहरांच्या हवेच्या गुणवत्तेचे निरीक्षण केले. त्यामधून जे निष्कर्ष आले ते धक्कादायक होते. सध्या अनेक देश हवेच्या गुणवत्तेवर पूर्वीच्या तुलनेत अधिक लक्ष देत असले तरीही हवेचे प्रदूषण कमी झालेले नाही. लोकांच्या शरीरात श्वासाच्या माध्यमातून नायट्रोजन डायऑक्साईड आणि अतिशय सूक्ष्म कण जात आहेत. गरीब आणि मध्यम उत्पन्न असलेल्या देशांमध्ये ही समस्या अधिक दिसून आली आहे.
नायट्रोजन डायऑक्साईड हा एक विषारी वायू आहे. जीवाश्म इंधनाच्या ज्वलनातून हा वायू उत्सर्जित होतो. वाहनांच्या धुरातून, ऊर्जा प्रकल्पांतून किंवा अन्य मार्गाने हा वायू हवेत मिसळतो. या वायूमुळे अस्थमासारखे श्वासाशी निगडित आजार निर्माण होतात. हवेतील 'पार्टिक्युलेट मॅटर' (पीएम) म्हणजेच सूक्ष्म कण हे फुफ्फुसांसाठी विषापेक्षा कमी घातक नाहीत. 'हु'च्या टीमने 'पीएम 10' आणि 'पीएम 2.5'ची तपासणी केली. हवेतील हे कण आकाराने 10 मायक्रोमीटर किंवा त्यापेक्षा कमी तसेच 2.5 मायक्रोमीटर किंवा त्यापेक्षा कमी आकाराचे असतात. या कणांमुळे अकाली मृत्यू होऊ शकतो.