

तासवडे टोलनाका : पुढारी वृत्तसेवा
कराड तालुक्यातील शिरवडेसह परिसरातील 214 महिलांना आवर्ती ठेवच्या नावाखाली पुण्याच्या एका कंपनीने तब्बल 20 लाखांचा गंडा घातल्याची धक्कादायक घटना घडली आहे. त्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पुण्यातील सॉहिल ग्रुप प्रॉपर्टीज अॅण्ड इस्टेट इंडिया कंपनीच्या प्रमुखावर तळबीड पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.
शिवाजीराव किसनराव जाधव (रा. प्रकाश हाऊसिंग सेवा सोसायटी थेरगाव, पुणे) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. याबाबतची फिर्याद शकुंतला नामदेव पेठकर (रा.शिरवड,े ता. कराड) यांनी दिली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, शकुंतला पेठकर यांच्याकडे प्रभाकर मोरे यांनी पुण्याच्या एका कंपनीत आरडीच्या स्वरूपात पैसे गुंतवणूक योजना मांडली होती. त्यानुसार शकुंतला पेठकर यांनी पुण्याच्या सॉईल ग्रुप प्रॉपर्टी कंपनीत पैसे भरले. जादा रक्कम भरल्यास जादा परतावा मिळणार होता. त्यामुळे पेठकर यांनी याबाबतची माहिती गावातील तसेच परिसरातील महिलांना दिली. त्यामुळे गावातील व परिसरातील महिलांनीही कंपनीत पैसे गुंतवले. 2013 पासून तब्बल 214 महिलांनी या कंपनीत लाखो रुपये भरले आहेत. दरम्यान, कंपनीचे सातारा येथील ऑफिस बंद झाल्यानंतर प्रभाकर मोरे यांच्याशी संपर्क साधण्याचा महिलांनी प्रयत्न केला. परंतु त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.
दरम्यान 2020 ला प्रभाकर मोरे यांचे निधन झाल्याचे महिलांना कळाले. त्यानंतर त्यांनी कंपनीचे प्रमुख शिवाजीराव जाधव यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांनी महिलांना पैसे देण्यास टाळाटाळ केली. आपली फसवणूक झाल्याचे महिलांच्या लक्ष येताच महिलांनी तळबीड पोलिस ठाणे गाठले. पुण्याच्या सॉईल प्रॉपर्टीज कंपनीचे प्रमुख शिवाजीराव जाधव यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास तळबीड सपोनि जयश्री पाटील करत आहेत.