Latest

बिहारमधील तुरुंगातील कैद्यानं क्रॅक केली IIT परीक्षा; सेल्फ स्टडी करत कोचिंगशिवाय मिळवलं यश!

दीपक दि. भांदिगरे

नवाडा (बिहार); पुढारी ऑनलाईन

तुरुंग असो वा जीवनाचा खेळ, जिंकतो तोच ज्याच्या आशा- आकांक्षा उंच असतात. अशीच एका व्यक्तीची कहाणी आहे ज्याने तुरुंगात राहून IIT संयुक्त प्रवेश परीक्षा (JAM) क्रॅक केली आहे. सूरज कुमार यादव असे त्याचे नाव आहे. बिहारमधील नवाडा उप कारागृहातील हा अंडरट्रायल कैदी आहे. मास्टर्स (JAM) साठी आयआयटी संयुक्त प्रवेश परीक्षा तो उत्तीर्ण झाला आहे. त्याने राष्ट्रीय स्तरावर ५४ वा क्रमांक मिळविला आहे. शास्त्रज्ञ बनण्याची आणि देशाच्या विकासात योगदान देण्याची त्याची महत्त्वाकांक्षा आहे.

विशेष म्हणजे सूरजने सेल्फ स्टडी आणि कोणत्याही कोचिंगशिवाय IIT परीक्षा क्रॅक केली आहे. या परिक्षेचा निकाल जाहीर होताच सूरजचा आनंद गगनात मावेना. त्याचे मोठे स्वप्न आता पूर्ण होणार आहे. सूरज हा खून प्रकरणातील आरोपी आहे. सूरजने त्याच्या यशाचे श्रेय नवादा जेलचे अधीक्षक अभिषेक पांडे यांना दिले आहे. ज्यांनी त्याला परीक्षा देण्यासाठी प्रोत्साहन दिले. त्यांनी त्याला अभ्यासासाठी आवश्यक असणारी पुस्तकेदेखील दिली होती.

अभिषेक पांडे यांनी सूरजसाठी खास जेवणाची व्यवस्थाही केली होती. यावर्षी १३ फेब्रुवारीला झालेल्या परीक्षेत यश मिळवण्यासाठी त्याला वैयक्तिक मार्गदर्शनदेखील केले होते. नवी दिल्ली येथे परीक्षा देण्यासाठी सूरजला न्यायालयाने एक महिन्याचा पॅरोल मंजूर केला होता.
सूरजला अटक होण्यापूर्वी राजस्थानमधील कोटा येथे तो प्रवेश परीक्षेचा अभ्यास करत होता. त्यानंतर तो नवाडा जिल्ह्यातील मोस्मा या त्याच्या मूळ गावी परतला होता. सूरज आणि त्याचा मोठा भाऊ बिरेंद्र यादव याला त्यांचा शेजारी संजय यादव यांच्या खुनाच्या आरोपाखाली अटक झाली. एप्रिल २०२१ पासून ते नवादा उपकारागृहात शिक्षा भोगत आहेत.

सूरजचे वडील अर्जुन यादव आणि संजयचे वडील बासो यादव यांच्यात गटारीच्या पाण्यावरुन दीर्घकाळ वाद सुरु होता. या वादातून संजय यादव याचा खून झाला होता. मोस्मा पंचायतीच्या संरपंच रेणू देवी यांनी, सूरजला या खून प्रकरणात विनाकारण गोवण्यात आल्याचे म्हटले आहे. विरोधी गटाच्या सूडाच्या भीतीने सूरजच्या पालकांनी गाव सोडले आहे. यामु‍‍ळे त्यांची शेतजमीन पडीक राहिली आहे. या खून प्रकरणातून सुटका झाल्यावर सूरज आयआयटी रुरकीमध्ये प्रवेश घेणार आहे.

हे ही वाचा :

पहा व्हिडिओ : वन्यजीवांचा अधिवास जपला पाहिजे : वन्यजीव अभ्यासक सुहास वायंगणकर | प्रयोग सोशल फाउंडेशन | दै. पुढारी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT