म्हापसा; पुढारी वृत्तसेवा : Goa accident : बार्देश तालुक्यातील हडफडे येथे खाडीत कार बुडाल्याने झालेल्या भीषण अपघातात महाराष्ट्रातील पुणे येथील दोघा युवक-युवतीचा मृत्यू झाला. यातील प्रवासी आम्हाला वाचवा, आम्हाला वाचवा अशी आर्त हात देत होते. परंतु, पहाटेची वेळ असल्यानेच त्यांना वेळेत मदत मिळू शकली नाही.
सदर अपघात सोमवारी (२० सप्टेंबर) पहाटे ५.३०च्या सुमारास घडला. पिळर्ण अग्नीशमन दलाच्या जवानांनी हे दोन्ही मृतदेह पाण्याबाहेर काढले असून उत्तरीय तपासणीसाठी मृतदेह गोमेकॉत पाठविले आहेत.
शुभम देडगे (२८) व ईश्वरी देशपांडे (२५) अशी मयतांची नावे आहेत. हा अपघात पार्क रिव्हर हॉटेलनजीकच्या खाडीजवळ घडला. यावेळी सदर भरधाव गाडीने अगोदर एका झाडाला धडक दिल्यानंतर कारने पन्नास ते साठ मीटरपर्यंत कोलांट्या घेत ती जवळील खाडीत बुडाली.
अपघातानंतर वाहनामधील या मयत युवतीने आम्हाला वाचवा, आम्हाला वाचवा अशी मदतीची साद घातली. असे घटनास्थळी प्रत्यक्षदर्शीचे म्हणणे आहे. मात्र, पहाटेची वेळ असल्याने कुणालाच नेमकी मदत करता आली नाही, अशी प्राथमिक माहिती मिळत आहे. (Goa accident)
या घटनेची माहिती पिळर्ण अग्नीशमक दलाला दिली असता जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. परंतु, जवानांना संबंधितांना वाचविता आले नाही. अग्नीशमन दलाने या वाहनांचे लॉक मोडून दोघांचे मृत्यूदेह बाहेर काढले. तसेच हणजूण पोलिसांनी पंचनामा करीत क्रेनच्या साहाय्याने कार पाण्याबाहेर काढली.