पुढारी ऑनलाईन डेस्क : पाकिस्तानमध्ये वेगाने घडणार्या राजकीय घडामोडीचे पडसाद लंडनमध्ये उमटत आहेत. माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांच्यावर हल्ल्याची घटना ताजी असतानाच आता त्यांच्या लंडनमधील कार्यालयावर हल्ला झाला आहे. यामध्ये तीन जण जखमी झाले आहेत, अशी माहिती पाकिस्तानमधील माध्यमांनी दिली. नवाझ शरीफ यांच्या कार्यालयावरील हल्ला हा इम्रान खान यांच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनीच केल्याचा आराेप हाेत आहे.
शरीफ हे २०१९ पासून वैद्यकीय कारणास्तव लंडनमध्ये वास्तव्यास आहेत. पाकिस्तानमधील दुनिया न्यूजने आपल्या वृत्तात म्हटलं आहे की, १५ ते २० हल्लेखोरांनी रविवारी लंडन येथील त्यांच्या कार्यालयावर हल्ला केला. या सर्वांचे चेहरे मास्कने झाकलेले हाेते. हल्ल्यात शरीफ यांच्या पीएमएल-एन पक्षाचे तीन कार्यकर्ते जखमी झाले. हल्लेखोर हे इम्रान खान यांच्या पीटीआय पक्षाचे कार्यकर्ते असल्याचा दावाही शरीफ समर्थकांनी केला आहे. याप्रकरणी दोन हल्लेखोरांसह पीएमएल-एनचे दोन कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली आहे.
पाकिस्तानमधील सरकारविरोधातील अविश्वास प्रस्तावावरील मतदानापूर्वी एक दिवस आधी लंडनमध्ये नवाझ शरीफ यांच्यावर एका युवकाने हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता. हल्लेखाराने त्यांना फोन फेकून मारला होता. यासंदर्भातील माहिती पाकिस्तानमधील पत्रकार अहमद नुरानी यांनी ट्विटरच्या माध्यमातून दिल होती. . इम्रान खान यांच्या पक्ष तहरीक-ए-इन्साफच्या कार्यकर्ता शायिन अली याने कृत्य केले असून, यामध्ये शरीफ यांचा सुरक्षा रक्षक जखमी झाल्याचा दावा त्यांनी केला होता.पाकिस्तानमधील सत्ताधारी पक्ष हा हिंसाचाराचे समर्थन करत आहे. अशा पक्षाच्या नेत्यांना अटक करण्यात यावी. इम्रान खान यांच्यावरही देशद्रोहचा गुन्हा दाखल करण्यात यावी, अशी मागणी नवाझ शरीफ यांच्या कन्या मरियम यांनी केली होती.
रविवारी इम्रान खान सरकारविरोधातील अविश्वास प्रस्ताव मतदानापूर्वीच संसदेच्या उपसभापतींनी फेटाळून लावला. यांनतर पंतप्रधान इम्रान खान यांनी संसद बरखास्त करण्याची विनंती राष्ट्रपती आरिफ अल्वी यांना केली. त्यांनीही त्याला तत्काळ मान्यता देत संसद बरखास्त केली. या निर्णयाविरोधात विराधी पक्ष नेत्यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. यावर आज दुपारी एकवाजता पाकिस्तान सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे.
पाकिस्तानमधील राजकीय संघर्षावर सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीशांनी रविवारी आपल्या सहकार्यांबरोबर चर्चा केली. यानंतर या याचिकांवरील सुनावणीसाठी विशेष खंडपीठाची स्थापनाही केली आहे. या खंडपीठासमोर आज दुपारी एक वाजता सुनावणी होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. दरम्यान, याचिकांवर व्यापक खंडपीठासमोरच सुनावणी व्हावी, अशी मागणी विरोधी पक्षाच्या नेत्यांनी केली आहे. आजच्या सुनावणीकडे पाकिस्तानसह जगाचे लक्ष वेधले आहे.
हेही वाचलं का?