औरंगाबाद ; पुढारी वृत्तसेवा : एमआयएमचे नेते आमदार अकबरोद्दीन ओवेसी हे जिल्हा दौर्यावर असताना त्यांनी औरंगजेबच्या कबरीचे दर्शन घेतले. त्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईतील सभेत जोरदार टीका केली. त्यावर आता एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष खासदार इम्तियाज जलील यांनी पलटवार केला आहे. मुख्यमंत्री ठाकरे, फडणवीस यांना वेळ आल्यावर त्यांच्याच भाषेत उत्तर दिले जाईल, असे जलील (Imtiaz Jalil) यांनी म्हटले आहे. तसेच भाजपने केलेल्या पाण्याच्या आंदोलनावरही त्यांनी सडकून टीका करताना हा निवडणुकीचा फंडा असल्याचे म्हटले आहे.
राज्यात शिवसेना, भाजप यांच्यात चांगलीच जुंपली आहे. त्यात एमआयएमचे नेते आ. ओवेसी यांनी जिल्हा दौऱ्यात औरंगजेबच्या कबरीवर माथा टेकल्याने राजकीय वातावरण आणखीच तापले आहे. राज्यात सेनेचे मुख्यमंत्री असताना औरंगजेबच्या कबरीवर जाऊन ओवेसी दर्शन घेतोच कसा, असे म्हणत जोरदार टीका केली. तर मुख्यमंत्री ठाकरे यांनी कोण ओवेसी, औरंगजेबाच्या थडग्यावर माथा टेकून आला. ही सर्व भाजपची एबी आणि सी टीम असून राज्य अशांत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत, असे म्हटले होते.
दरम्यान, या वक्तव्याला उत्तर देताना खासदार जलील यांनी मुख्यमंत्री ठाकरे, फडणवीस यांना त्यांच्या भाषेतच किंबहूना त्यापेक्षा अधिक चांगल्या भाषेत उत्तर देणार आहोत. अगोदरच सांगितले की, आमलाही तोंड आहे, आम्हालाही बोलता येते आणि त्यांच्यापेक्षा अधिक चांगले बोलता येते. त्यामुळे आता आम्ही बालू तेव्हा आमच्यावर कोणीच कारवाई करू शकणार नाही. कारण सुरूवात त्यांनी केली आहे. असेही जलील (Imtiaz Jalil) म्हणाले.
एमआयएम नेते अकबरोद्दीन ओवेसी यांनी औरंगजेबच्या कबरीवर माथा टेकवल्याने जिल्ह्यातूनच नव्हे, तर राज्यभरातून संताप व्यक्त होत आहे. हिंदूत्वादी संघटनांच्या बहुतांश नेते, कार्यकर्त्यांनी सोशल मीडियावरून आणि खा. जलील यांच्या मोबाईलवर धमक्या आणि शिव्या देखील दिल्या. यास दुजोरा देत खा. जलील म्हणाले की, या घटनेनंतर असे वाटले होते. गृहमंत्रालय काही कारवाई करेल. परंतु तसे झाले नाही. धमक्या देणाऱ्यांना आपण महत्त्व देत नसल्याचे ते म्हणाले.
शहरातील पिण्याच्या पाण्याच्या समस्येला शिवसेना आणि भाजप या दोन्ही पक्षाचे नेते आणि महापालिकेतील त्यांचे पदाधिकारी जबाबदार आहेत. आता निवडणुका जवळ आल्याने माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पाण्यासाठी आंदोलन करत आहेत. हेच मुळात हस्यास्पद असल्याचे सांगून त्यांच्यामुळेच शहरावर पाणी संकट कायम असल्याचा आरोप जलील यांनी केला. दरम्यान, फडणवीस यांच्यात जर खरंच हिंमत असेल, तर त्यांनी एकाही कार्यकर्त्यांला सोबत न घेता एकट्याने शहराच्या कुठल्याही एका वसाहतीत जाऊन दाखवावे, असे आव्हानही त्यांनी दिले.
हेही वाचलंत का ?