Latest

Stock Market Closing Bell | यूस फेडच्या निर्णयापूर्वी सेन्सेक्स २८३ अंकांनी घसरला, मार्केटमध्ये काय घडलं?

दीपक दि. भांदिगरे

पुढारी ऑनलाईन : अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हच्या व्याजदराच्या निर्णयापूर्वी गुंतवणूकदारांनी सावध भूमिका घेतली आहे. तसेच परदेशी गुंतवणूकदारांकडून होत असलेल्या विक्रीच्या पार्श्वभूमीवर आज बुधवारी सेन्सेक्स आणि निफ्टी सलग दुसऱ्या सत्रात घसरले. सेन्सेक्स २८३ अंकांनी घसरून ६३,५९१ वर बंद झाला. निफ्टी ९० अंकांच्या घसरणीसह १८,९८९ वर स्थिरावला. (Stock Market Closing Bell)

संबंधित बातम्या 

हेल्थकेअर, ऑईल, गॅस आणि रियल्टी वगळता ऑटो, कॅपिटल गुड्स, मेटल, आयटी आणि पॉवर प्रत्येकी ०.५ ते १.५ टक्क्यांनी घसरले. इतर सर्व क्षेत्रीय निर्देशांकांतही घसरण दिसून आली. बीएसई मिडकॅप निर्देशांक ०.४ टक्क्यांनी घसरला, तर स्मॉलकॅप निर्देशांक सपाट झाला.

सेन्सेक्स (Sensex Today) आज ६३,८२९ वर खुला झाला होता. त्यानंतर तो ६३,५६२ पर्यंत खाली आला. सेन्सेक्सवर एशियन पेंट्सचा शेअर २ टक्क्यांनी घसरून २.९३३ रुपयांपर्यंत खाली आला. त्याचबरोबर टाटा स्टील, मारुती, जेएसडब्ल्यू स्टील, नेस्ले इंडिया, एचसीएल टेक, एनटीपीसी, इन्फोसिस, एलटी, टीसीएस, ॲक्सिस बँक हे शेअर्स १ ते २ टक्क्यादरम्यान घसरले. कोटक बँक, टेक महिंद्रा, अल्ट्राटेक सिमेंट, पॉवर ग्रिड, आयटीसी, हिंदुस्तान युनिलिव्हर या शेअर्सही लाल चिन्हात बंद झाले. तर सन फार्माचा शेअर टॉप गेनर ठरला. हा शेअर २.६७ टक्क्यांनी वाढून १,११७ रुपयांवर पोहोचला. बजाज फिनसर्व्ह, रिलायन्स हे शेअर्सही काही प्रमाणात वाढले.

जागतिक बाजार

आशियाई बाजारांतील सेऊल, टोकियो, शांघाय आणि हाँगकाँग येथील निर्देशांकांनी हिरव्या चिन्हात व्यवहार केला. जपानचा निक्केई २२५ निर्देशांक २.४१ टक्क्यांनी म्हणजेच ७४२ अंकांनी वाढून ३१,६०१ वर पोहोचला. तर टॉपिक्स निर्देशांक २.५३ टक्क्यांनी वाढून २,३१० वर गेला. तर मंगळवारी अमेरिकेच्या बाजारात सकारात्मक वातावरण राहिले होते. फेडरल रिझव्‍‌र्हच्या निर्णयाकडे गुंतणूकदारांचे लक्ष लागून राहिल्याने बुधवारी सुरुवातीच्या व्यवहारात युरोपीय बाजारातील प्रमुख निर्देशांक वाढले होते. आंतरराष्ट्रीय तेल बेंचमार्क ब्रेंट क्रूड ०.०५ टक्क्यांनी घसरून प्रति बॅरल ८७.४१ डॉलरवर आला आहे.

परदेशी गुंतवणूकदारांकडून विक्री कायम

एक्सचेंजच्या आकडेवारीनुसार, ३१ ऑक्टोबर रोजी परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी (FII) भारतीय बाजारात ६९६.०२ कोटी रुपयांच्या शेअर्सची विक्री केली. तर देशांतर्गत गुंतवणूकदारांनी (DII) ३४०.२५ कोटी रुपयांचे शेअर्स खरेदी केले. (Stock Market Closing Bell)

रुपया वर्षातील निच्चांकी पातळीवर

भारतीय रुपया (Indian rupee) बुधवारी अमरिकेच्या डॉलरच्या तुलनेत ८३.२८५० वर राहिला. रुपयाची ही एका वर्षातील सर्वात कमकुवत पातळी आहे. बहुतांश आशियाई चलनांच्या घसरणीमुळे रुपयावरही दबाव निर्माण झाला आहे.

हे ही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT