कमोडिटी ट्रेडिंगच्या अंतरंगात... | पुढारी

कमोडिटी ट्रेडिंगच्या अंतरंगात...

प्रत्येक व्यक्ती आपल्या दैनंदिन गरजा पूर्ण करण्यासाठी शेअर बाजारात खरेदी- विक्री करत असतो. यानुसार कमोडिटीचे देखील खरेदी-विक्री व्यवहार कमोडिटी एक्स्चेंजमार्फत करता येतात. फरक एवढाच आहे की, कमोडिटीतील व्यवहार हे दररोजच्या गरजा पूर्ण करण्यासाठी केले जात नाहीत. याउलट कमोडिटी मार्केटमध्ये केली जाणारी उलाढाल ही बहुतांशवेळा नफ्यासाठीच केली जाते.

ज्याप्रमाणे शेअरची ट्रेडिंग करण्यासाठी मुंबई शेअर बाजार आणि नॅशनल स्टॉक एक्स्चेंजसारखे प्लॅटफॉर्म उपलब्ध आहेत. त्याचप्रमाणे कमोडिटी ट्रेडिंगसाठीदेखील सरकारने काही प्लॅटफॉर्म तयार केले आहेत. त्यात नॅशनल कमोडिटी अँड डेरिव्हेटिव्ह एक्स्चेंज, इंडियन कमोडिटी एक्स्चेंज, नॅशनल मल्टी कमोडिटी एक्स्चेंज, युनिव्हर्सल कमोडिटी एक्स्चेंज आणि मल्टी कमोडिटी एक्स्चेंज आदी प्लॅटफॉर्मचा समावेश आहे.

कशात होते गुंतवणूक

कमोडिटी एक्स्चेंजमध्ये अनेक प्रकारच्या घटकांचा व्यवहार केला जातो. परंतु आपण यास चार श्रेणीत वर्गीकरण करू शकतो. मौल्यवान धातू, बेस मेटल, एनर्जी, कृषी घटक आदी. मौल्यवान धातूच्या श्रेणीत सोने, चांदी आणि प्लॅटिनमचा बाजार केला जातो. त्याचवेळ बेस मेटलमध्ये कॉपर, झिंक, निकल, लिड, टिन आणि अ‍ॅल्युमिनियमसारख्या मेटलची ट्रेडिंग करू शकता. याप्रमाणे एनर्जी सेक्टरमध्ये क्रुड ऑईल, एटीएफ, नैसर्गिक गॅस आणि गॅसोलिन याची ट्रेडिंग करता येते. कृषी घटकाच्या श्रेणीत लाल मिरची, विलायची, चिरा, हळद, धने, मेंथा ऑईल, गहू, डाळी, मिरे आदी ट्रेडिंग केली जाते.

फ्यूचर ट्रेडिंग म्हणजे काय?

कमोडिटी एक्स्चेंजमध्ये फ्यूचर ट्रेडिंगअंतर्गत दोन व्यक्तीदरम्यान कोणत्याही घटकांत भविष्यातील एखाद्या निश्चित तारखेसाठी आणि मूल्यांसाठी व्यवहार केला जातो. त्यानुसार भविष्यातील त्याच तारखेला निश्चित केलेले व्यवहार पूर्ण करणे गरजेचे असते.

व्यवहाराचा कालावधी हा सर्वसाधारपणे एक ते तीन महिन्यांचा असतो. यासाठी एक उदाहरण पाहू. आपण 15 मे रोजी एक महिन्यांसाठी 65 हजारे किलोची चांदी खरेदी करण्यासाठी समोरील व्यक्तीशी करार केल्यास, या करारापोटी मार्जिन रूपातून काही रक्कम भरावी लागते. एक महिन्यानंतर चांदीची कितीही रक्कम असली तरी आपल्याला एक किलो चांदी 65 हजारानेच मिळेल. चांदीची किंमत ही 70 हजार रुपये असेल तरी ती चांदी आपल्याला 65 हजार किलोनेच चांदी मिळेल. आपण त्याची डिलिव्हरी देखील घेऊ शकता आणि वाटल्यास त्याची विक्री करून त्यातून पाच हजारांचा लाभही मिळवू शकता. अशा रितीची ट्रेडिंग सर्व घटकांत केली जाते.

कमोडिटीसाठी तज्ज्ञांची मदत घ्या

कमोडिटी ट्रेडिंग करणार्‍या प्रत्येक गुंतवणूकदाराने तज्ज्ञ आणि विश्लेषकांची मदत घ्यायला हवी. उदा. सध्याच्या काळात गव्हाची किंमत कमी आहे आणि यासाठी आपण एक महिन्यांसाठी काही रक्कम गुंतवली आहे, असे गृहीत धरू. आगामी काळात गव्हाचे पीक बंपर येईल आणि त्यामुळे त्याचे भाव खाली येतील, तर अशा वेळी आपल्याला नुकसान सहन करावे लागेल. यासाठी कोणत्याही घटकांची ट्रेडिंग करताना आपण तज्ज्ञांची आणि विश्लेषकांचे मत आवश्यक घ्यायला हवे.

स्टॉक ट्रेडिंग आणि कमोडिटी ट्रेडिंगमधील फरक

ट्रेडिंग एक्स्चेंजच्या माध्यमातून शेअर व्यवहार आणि कमोडिटीच्या व्यवहारात बराच फरक आहे. शेअर आपण एकदा खरेदी केल्यानंतर तो कितीही काळासाठी आपल्याकडे ठेवता येऊ शकतो. तो कधीही विकता येतो. यात गुंतवण्यात येणार्‍या रकमेला मर्यादा नसते आपण कितीही वर्षं शेअर ठेवू शकतो. मात्र कमोडिटी ट्रेडिंगमध्ये आपण कोणत्याही कमोडिटीत केवळ काही महिन्यांसाठीच गुंतवणूक करू शकता. कमोडिटी ट्रेडिंगमध्ये बहुतांश बाजार हा फ्यूचर ट्रेडिंग स्वरूपातीलच असतो.

डिलिव्हरी करार कसा असतो?

फ्यूचर ट्रेडिंगमध्ये आपण कोणताही व्यवहार न करता त्याचा निपटारा करू शकता. परंतु डिलिव्हरी आधारित करारात आपण ज्या घटकांत करार करतो, तो करार पूर्ण करावा लागतो. यासाठी आपल्याला गोदाम आदींचीदेखील गरज भासते. शेवटी फ्यूचर ट्रेडिंगवरच अशा लोकांचा भर राहतो.

कमोडिटी ट्रेडिंगने लाभ

कमोडिटी मार्केटमध्ये लहान रकमेतदेखील गुंतवणूक करता येते. मार्जिन मनीच्या माध्यमातून मोठे व्यवहारदेखील करू शकता. मार्जिन मनी ही खूपच कमी असते. याशिवाय शेतकरी, निर्माता किंवा खुल्या बाजारात व्यवहार करण्यासाठी मोठे व्यापारी कमोडिटी मार्केटमध्ये गुंतवणूक करतात. पण यावेळी ‘ट्रेडिंग हेजिंग’च्या पद्धतीचे अनुकरण करत खुल्या बाजारातील किमतीतील चढउताराची जोखीम काही प्रमाणात कमी करता येऊ शकते.

सुधीर मोकाशे 

Back to top button