Pimpri: DB squad sluggish 1500 accused wanted 
Latest

पुणे जिल्ह्यात पाच नवीन पोलिस ठाणी : एक उपविभाग

अमृता चौगुले

पुणे : पुढारी वृत्तसेवा : पुणे जिल्हा ग्रामीण पोलिस अधीक्षकांच्या कार्यक्षेत्रामध्ये पाच नवीन पोलिस ठाणी तर एक उपविभाग निर्मितीस राज्यसरकारने मंगळवारी (दि.14) मान्यता दिली. त्यातील दोन पोलिस ठाण्यांना मागील आठवड्यात मंजूुरी मिळाली आहे. त्यामुळे आता पुणे ग्रामीणमध्ये सायबर पोलिस ठाण्यासह एकूण 35 पोलिस ठाणी झाली आहेत. बारामती तालुक्यातील माळेगाव, सुपे, हवेली तालुक्यातील उरुळी-कांचन आणि इंदापुर तालुक्यातील निरा- नृसिंहपूर, आंबेगाव तालुक्यातील पारगाव (कारखाना), या ठिकाणी नवीन पोलिस ठाणी होणार आहेत. तर शिरूर हा नवीन पोलिस उपविभाग होणार आहे.

बारामतीत २ ठाणी

बारामती तालुका पोलिस ठाण्याचे विभाजन करून माळेगाव आणि वडगावनिंबाळकर पोलिस ठाण्याचे विभाजन करून सुपे अशा दोन पोलिस ठाण्यांची बारामती तालुक्यात निर्मिती करण्यात आली आहे. त्यातील माळेगावसाठी पोलिस निरीक्षक, सहायक पोलिस निरीक्षक यांच्यासह 80 पदे व 35 लाख 41 हजार 500 अनावर्ती खर्चास मान्यता देण्यात आली आहे. इंदापूर पोलिस ठाण्याचे विभाजन करून नवीन निरा-नृसिंहपूर या नवीन पोलिस ठाण्याची निर्मिती करण्यात आली असून, या ठिकाणी पोलिस निरीक्षक, सहायक पोलिस निरीक्षक यांच्यासह 55 पदे व 35 लाख 41 हजार 500 अनावर्ती खर्चास मान्यता देण्यात आली आहे.

हवेली तालुक्यातील पुणे पोलिस आयुक्तालयाच्या कक्षेतील लोणी काळभोर या पोलिस ठाण्याचे विभाजन करून नवीन उरुळी कांचन पोलिस ठाण्याच्या निर्मितीस मान्यता देण्यात आली आहे. त्या ठिकाणी पोलिस निरीक्षक, सहायक पोलिस निरीक्षक यांच्यासह 100 पदे व 35 लाख 41 हजार 500 अनावर्ती खर्चास मान्यता देण्यात आली आहे. आंबेगाव तालुक्यातील मंचर पोलिस ठाण्याचे विभाजन करून नवीन पारगाव (कारखाना) पोलिस ठाण्याची निर्मिती करण्यात आली आहे. त्या ठिकाणी पोलिस निरीक्षक, सहायक पोलिस निरीक्षक यांच्यासह 55 पदे व 40 लाख 41 हजार 500 अनावर्ती खर्चास मान्यता देण्यात आली आहे.

दाैंड विभागाचे विभाजन

ग्रामीण पोलिस अधीक्षकांच्या कक्षेतील शिरूर तालुक्यातील वाढता आवाका पाहता तसेच औद्योगिकीकरण आणि नागरीकरणामुळे शिरूर तालुक्यात पोलिस यंत्रणेवर येणारा ताण लक्षात घेता दौंड पोलिस उपविभागाचे विभाजन करून नवीन शिरूर उपविभाग निर्माण करण्यात आला आहे. या विभागाअंतर्गत शिरूर, शिक्रापूर, रांजणगाव एमआयडीसी, या तीन पोलिस ठाण्यांचा समावेश करण्यात आला आहे. राज्यात पुणे जिल्ह्यातील ग्रामीण पोलिसांची सर्वांत मोठी हद्द आहे. या ठिकाणी शहरीकरणाचा वेगदेखील जास्त आहे. मात्र, ग्रामीण पोलिसांना अवघ्या 2 हजार 550 पोलिसांमध्ये नागरिकांच्या सुरक्षिततेवर लक्ष ठेवावे लागते. राज्यातील इतर जिल्ह्यांपेक्षाही हे मनुष्यबळ कमी असल्याने कायदा व सुव्यवस्था आणि गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलिसांना कसरत करावी लागत होती. त्या पार्श्वभूमीवर ही पोलिस ठाणी निर्माण करण्यात आली आहेत.

पुणे ग्रामीणमध्ये सध्या 30 पोलिस ठाणी आहेत. तसेच स्थानिक गुन्हे शाखा, आर्थिक गुन्हे शाखा, विशेष शाखा, वाहतूक शाखा, महिला सहायता कक्ष, असे विभाग आहेत. सध्या बारामती, दौंड, भोर, हवेली, जुन्नर, खेड आणि लोणावळा येथे उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालये आहेत. त्यामध्ये आणखी एक उपविभागीय कार्यालय शिरूर येथे मंजूर झाले आहे.

''सध्या ग्रामीण पोलिस दलासाठी 3 हजार 100 मनुष्यबळ मंजूर आहे. त्यातील 2 हजार 550 मनुष्यबळ कार्यरत आहे. मागील आठवड्यात दोन पोलिस ठाण्यांना, तर मंगळवारी तीन पोलिस ठाण्यांना मंजुरी मिळाली आहे. ग्रामीण पोलिस दलात तुलनेने मनुष्यबळ कमी आहे. त्याबद्दलही शासकीय बैठकी झाल्या आहेत. वाढते नागरीकरण, शहरीकरण पाहता नवीन पोलिस ठाण्यांमुळे पोलिसांवरील काहीसा ताण कमी होण्यास मदत होणार आहे.''

                                                                                                           – डॉ. अभिनव देशमुख, ग्रामीण पोलिस अधीक्षक

हेही वाचा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT