Mumbai Ncb : नामी शक्कल लढवत परदेशात नेणारे १३ कोटींचे ड्रग्स जप्त | पुढारी

Mumbai Ncb : नामी शक्कल लढवत परदेशात नेणारे १३ कोटींचे ड्रग्स जप्त

मुंबई ; पुढारी ऑनलाईन : कॉर्डेलिया क्रुझ ड्रग्ज पार्टी प्रकरणानंतर वादाच्या भोवर्‍यात सापडलेल्या केंद्रीय अंमली पदार्थ नियंत्रण विभागाच्या (एनसीबी) मुंबई पथकाने पुन्हा एकदा धडक कारवाई सुरु केली आहे. एनसीबीने मुंबईतील अंधेरी आणि डोंगरीमध्ये आठ ठिकाणांवर छापेमारी करुन स्टेथोस्कोप, मायक्रोवेव्ह ओव्हन, सायकलिंग हेल्मेट, बांगड्यां, नळीच्या पाईप, टाय बॉक्स आणि हार्डडिस्कमध्ये लपवून विदेशात पाठविण्यात येणारे 13 कोटींचे ड्रग्ज जप्त केले आहे. एनसीबीने या कारवाईत सहा गुन्हे दाखल केले आहेत. (Mumbai Ncb)

बॉलीवूडचा किंग खान शाहरुख याचा मुलगा आर्यन खान याच्यावरील कारवाईनंतर एनसीबी आणि एनसीबी मुंबईचे प्रमुख समीर वानखेडे प्रचंड यांच्यावर आरोपांचे सत्र सुरु झाले. यात अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या.

त्यानंतर एनसीबीच्या आणि मुंबई पोलिसांच्या विशेष समित्यांमार्फत याची चौकशी सुरु करण्यात आली आहे. त्यामुळे एनसीबीची कारवाई काही काळ थंड पडली होती.

Mumbai Ncb : एका नायझेरियन नागरिकाला अटक

एनसीबी मुंबईच्या पथकाने 10 डिसेंबर रोजी अंधेरी (पूर्व) येथे छापेमारी करुन 490 ग्रॅम अँफेटामाईन हे ड्रग्ज जप्त केले. हे ड्रग्ज स्टेथोस्कोपमध्ये लपवण्यात आले होते. हे ड्रग्ज डोंगरी येथून ऑस्ट्रेलियाला पाठवले जात होते. त्या आधीच एनसीबीने कारवाई करुन हे ड्रग्जचे पार्सल जप्त केले. एनसीबीने या प्रकरणात एका नायझेरियन नागरिकाला अटक केली आहे.

एनसीबी या कारवाईच्या आधारे केलेल्या दुसऱ्या कारवाईमध्ये अंधेरी (पूर्व) येथेच छापेमारी करुन मायक्रोवेव्ह ओव्हनमध्ये लपवून ठेवलेले 3.906 किलो अफू जप्त केले आहे. हे ड्रग्ज अंधेरी येथून मालदीव येथे पाठवले जात होते.

तर, एनसीबीने तिसऱ्या कारवाईमध्ये 2.525 किलो झोलपीडेम ड्रग्ज जप्त केले.

अंधेरी (पूर्व) परिसरात खाण्यापिण्याच्या वस्तू आणि किराणा मालाच्या माध्यमातून या नशेच्या गोळ्यांची तस्करी करण्यात येत होती.

अंधेरी येथून या गोळ्या अमेरिकेत पाठवल्या जात असताना एनसीबीने त्या जप्त केल्या आहेत.

एनसीबीकडून कारवाईचा धडाका

एनसीबी मुंबईच्या पथकाने चौथ्या कारवाईमध्ये एकूण 941 ग्रॅम अँफेटामाइन जप्त केले आहे.

अंधेरी (पूर्व) येथे सायकलिंग हेल्मेट आणि बांगड्यांमध्ये हे ड्रग्ज लपवण्यात आले होते.

हे ड्रग्जसुद्धा येथून ऑस्ट्रेलियाला पाठवले जाणार होते.

पाचव्या कारवाईमध्ये एनसीबीने एकूण 848 ग्रॅम अॅम्फेटामाइन जप्त केले आहे.

जे नळीच्या पाईप आणि टाय बॉक्समध्ये लपवून डोंगरी येथून दुबई, यूएई आणि न्यूझीलंड येथे पाठवले जात होते.

तसेच एनसीबीने अंधेरी येथे सहावी कारवाई करत 17 ग्रॅम अॅम्फेटामाइन जप्त केले.

एक टीबी हार्ड डिस्कमध्ये हे ड्रग्ज लपवण्यात आले होते. हे ड्रग्ज अंधेरी येथून स्वित्झर्लंडला पाठवले जात होते, असे एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

Back to top button