स्पोर्ट्स

टोकियो ऑलिम्पिक : अरे बापरे! कोरोना चाचणीसाठी सात तास…‘आरीगातो…’

Arun Patil

रियोनंतर कोरोना परिस्थितीमुळे टोकियो ऑलिम्पिक कुंभमेळ्यासाठी जूनअखेरपर्यंत माझी तयारी नव्हती. 3 दिवस विलगीकरणाचा नवा नियम येताच दौरा निश्चित केला.

विस्ताराच्या विमानात बसण्यापूर्वी पुण्यातूनच टोकियोतील कोरोना नियमांची झलक अनुभवली. सलग सात दिवस कोरोना चाचणी, जपानी आरोग्य खात्यानुसार निगेटिव्ह रिपोर्ट चेक करूनच दिल्लीचे तिकीट हाती आले.

दिल्लीत आमच्या एका पत्रकार मित्राला पासपोर्टनुसार जपानी प्रमाणपत्रात नाव नसल्याने अडविण्यात आले. कोरोनामुळे हे ऑलिम्पिक समस्यांची मालिका असणार हेच दिसून आले. ऑलिम्पिक म्हटले की, सर्वच उत्साहाचे उधाण असते.

टोकियो ऑलिम्पिक साठी विमानात पाऊल ठेवताच रिकाम्या खुर्च्या नजरेत भरल्या. साडेतीनशे जणांच्या विमानात आम्ही कसेबसे 80 प्रवासी होतो. त्यात ऑलिम्पिकसाठी जाणारे हाताच्या बोटावर मोजण्याइतकेच. जपानला जाणार्‍यासाठी भारतीयांना कडक नियमावली असल्याने मूळात जपानला विमानेच उडत नाहीत.

परदेशी पाहुण्यांना जपानी ऑलिम्पिकचे दरवाजे बंद केल्याने सार्‍या जगातून जपानकडे जाणार्‍या विमानात हेच चित्र दिसते. यामुळे मराठमोळ्या राही सरनोबतच्या पालकांची ऑलिम्पिक वारी हुकली. गतवेळी रियोसाठी भारतातून 80 स्वयंसेवक गेले होते. यावेळी एखाद दुसराच असावा.

सात तासांच्या प्रवासानंतर ऑलिम्पिकनगरीत पाऊल ठेवले. तोच कोरोना चाचणीसाठी कागदपत्रांची व जपानी खात्याच्या आरोग्य विभागाच्या 'ओच्या अ‍ॅप'ची तपासणी झाली. माझ्यासह अमेरिका, जर्मनी आणि क्रोएशियातील 8 पत्रकारांना 'ओच्या अ‍ॅप'वर बारकोड आला नव्हता. इस्रायलच्या खेळाडूंची ही अशीच स्थिती होती.

स्वयंसेवकांनी आम्हा सर्वांची कागदपत्रे तपासली. पासपोर्ट, ऑलिम्पिक अधिस्वीकृती पत्र, जपानच्या आरोग्य विभागाचे विलगीकरणाचे पत्र सारेकाही नियमानुसार होते. छोट्या तांत्रिक अडचणीमुळे आम्हाला थांबविण्यात आले. तेव्हा जपानमध्ये तीन वाजले होते. तासभरात हिरवा कंदील मिळेल असे वाटले.

जर्मनीच्या महिला पत्रकारच्या कागदपत्रक पूर्ततेस दोन तास लागले. पुढच्या तासात इस्रायलचा खेळाडूही चाचणीसाठी गेला. पत्रकारांमध्ये भारताचे आम्ही दोघे, अमेरिका व क्रोएशियाचे एक ज्येष्ठ पत्रकार राहिलो. पाहता पाहता सात वाजले सूर्यांस्त झाला.

अखेर ऑलिम्पिक समितीच्या पत्रकार समन्वयला मेल पाठवून वस्तुस्थिती कळवली. 6 तास झाले तरी आमचे सामान पडून कसे राहिले. यामुळे विस्तरा विमानाचे कर्मचारीही आम्हाला शोधीत आले. दरम्यान, चार विमाने आली. त्यातून ऑस्ट्रेलिया, उझबेकिस्तानचे खेळाडू, पदाधिकारी उतरले. अखेर सात तासांच्या प्रतीक्षेनंतर मला हिरवा कंदील दाखविण्यात आला. माझ्यासह स्वयंसेवकांनीही आनंद साजरा केला.

थोड्याच वेळेत अमेरिकेच्या पत्रकारांनाही 'ओके' कळविण्यात आले. मात्र, वय वर्षे 55 असणार्‍या क्रोएशियाचा पत्रकार पुढच्या एका तासात दिसला नाही. खरे तर जपानी पाहुणचार अनुभवा असे म्हटले जाते. पहिला अनुभव नेमका उलटा होता.

संयोजन समिती व जपान प्रशासनामध्ये समन्वयाचा अभाव असल्याने असे प्रकार रोजच घडत आहेत. पहिली कोरोना चाचणी निगेटिव्ह झाली, तोच आम्हा पत्रकारांचे पुढील 15 दिवसांचे मंगळसूत्र अधिस्वीकृती कार्ड गळ्यात पडले.

पासपोर्टवर ऑलिम्पिकचा विशेष व्हिसा चिकटविण्यात आला. ऑलिम्पिकच्या अधिस्वीकृती असणार्‍या पाहुण्यांना त्यांच्या देशात व्हिसा काढावा लागत नाही. केवळ ऑलिम्पिक आणि आशियाई स्पर्धेला हा मान देण्यात आला आहे.

तिसर्‍यांदा ऑलिम्पिकचा मी अधिस्वीकृती पत्रकार झालो होतो. 'आरीगातो…' म्हणतच धन्यवाद देत – देत मी रात्री उशिरा निवासस्थानाकडे प्रस्थान केले. मीडियाच्या बसमधून जात असताना मार्गावर कोठेच ऑलिम्पिकच्या पाऊलखुणा नव्हत्या. मात्र, वैभवशाली जपानचे दर्शन सारा थकवा दूर करणारे होते.

संजय दुधाणे

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT