कोयना धरण : पायथा वीजगृहातून होणार पाण्याचा विसर्ग | पुढारी

कोयना धरण : पायथा वीजगृहातून होणार पाण्याचा विसर्ग

पाटण ; पुढारी वृत्तसेवा : कोयना धरण पायथा वीजगृहातून पाण्याचा विसर्ग करण्यात येणार आहे.

कोयना धरण अंतर्गत विभागात अचानकपणे पावसाचा जोर वाढल्याने धरणातील पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होत आहे. आगामी काळात पडणारा पाऊस, धरणात येणाऱ्या पाण्याचे प्रमाण व पाणी सामावून घेण्याची क्षमता लक्षात घेता गुरुवार, २२ जुलै रोजी गुरुवारी सकाळी 11 वाजता कोयना धरण पायथा वीजगृहातील 20 मेगावॉट क्षमतेची दोन जनित्राद्वारे वीज निर्मिती करून प्रतिसेकंद २१०० क्युसेक पाणी पूर्वेकडे कोयना नदीपात्रात सोडण्यात येणार असल्याची माहिती धरण व्यवस्थापनाकडून देण्यात आली आहे.

सातारा जिल्ह्यात विशेषतः पाटण आणि कराड तालुक्यात सध्या सर्वच विभागात संततधार पाऊस सुरू असल्याने कोयनेसह अन्य नद्या ,ओढे, नाले ओसंडून वाहत आहेत .कोयना नदी पात्रातही पाणी पातळीत मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे.

धरणातून वीज निर्मिती करून सोडण्यात आलेल्या पाण्यानंतर नदीच्या पाणी पातळीत धोकादायक वाढ होण्याची शक्यता असल्याने नदीकाठच्या गावांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. नदीकाठची गावे ,घरे ,लोकवस्त्या पिण्याच्या व शेतीच्या पाणी योजना, सार्वजनिक मालमत्ता यांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.

धरणात सध्या प्रतिसेकंद ३३ हजार ९१४ क्युसेक इतक्‍या पाण्याची आवक होत असून त्यापैकी प्रतिसेकंद २१०० क्युसेक पाणी कोयना नदीपात्रात सोडण्यात येणार आहे .

पूर्वेकडे सध्या कोयना नदी पात्रात पाणी सामावून घेण्याची क्षमता असल्याने संभाव्य पुराची तीव्रता कमी असल्यानेच हा निर्णय घेण्यात येणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे .

Back to top button