चांदोली धरण : ४ हजार ८८३ क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू | पुढारी

चांदोली धरण : ४ हजार ८८३ क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू

वारणावती; आष्पाक आत्तार : चांदोली धरण परिसरात मुसळधार पाऊस कोसळत आहे. बुधवार सकाळी आठ ते आज गुरुवार सकाळी आठ वाजेपर्यंत 24 तासात 185 मिलिमीटर पावसाची नोंद झाली.

आज (दि. २२) सकाळी आठ ते दुपारी 4 वाजेपर्यंत आठ तासात 75 मिलिमीटर असा 32 तासात एकूण 260 मिलिमीटर पाऊस येथे बरसला आहे.

अधिक वाचा :

गेल्या तीन दिवसांपासून अतिवृष्टी कायम आहे. त्यामुळे धरणाच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ झाली आहे. परिणामी आज दुपारी तीन वाजता धरणाचे दोन दरवाजे उघडून 4 हजार 883 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग नदीपात्रात सुरू करण्यात आला आहे.

वीज निर्मिती केंद्रातून 1125 कयु सेक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे. धरण व वीजनिर्मिती असा दोन्ही मिळून सहा हजार आठ क्युसेक्स पाण्याचा विसर्ग नदीपात्रात सुरू आहे.

गतवर्षी सहा ऑगस्ट रोजी धरणाचे दरवाजे उघडण्यात आले होते यंदा 14 दिवस अगोदरच धरणाचे दरवाजे उघडून पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला आहे.

धरणात 24 हजार 441 कयु सेक्स पाण्याची आवक होत आहे.धरण क्षेत्रात पडणारा मुसळधार पाऊस आणि पाणलोट क्षेत्रात येणाऱ्या पाण्याची आवक यामुळे गेल्या 24 तासात धरणाची पाणीपातळी दोन मीटरने वाढली आहे.

मुसळधार पाऊस तसेच धरणातील मुख्य दरवाजातून तसेच वीज निर्मिती केंद्रातून करण्यात आलेल्या विसर्गामुळे वारणा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे.

अधिक वाचा :

नदी दुथडी भरून वाहू लागली आहे.काही ठिकाणी नदीचे पाणी पात्राबाहेर गेले आहे.परिसरातील जनजीवन विस्कळीत झाले आहे.

धरण पाणलोट क्षेत्रात तसेच चांदोली परिसरात पावसाचा जोर कायम आहे. त्यामुळे धरणातील विसर्ग कोणत्याही क्षणी आणखी वाढवण्याची शक्यता आहे. त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क रहावे असे आवाहन हे धरण प्रशासनामार्फत करण्यात आले आहे.

आज दुपारी चार वाजता चांदोली धरणाची पाणी पातळी 622.15 मीटर इतकी आहे. धरणात 29.61 टीएमसी पाणीसाठा असून धरण 82.57 टक्के भरले आहे.

आज अखेर 1093 मिलिमीटर पावसाची येथे नोंद झाली आहे. तर गतवर्षी आजच्या तारखेला एकूण 1354 मिलिमीटर पावसाची नोंद झाली होती.

गतवर्षीच्या तुलनेत पाऊस यंदा कमी आहे तरीही चौदा दिवस अगोदरच पाण्याने सांडवा पातळी घातली आहे त्यामुळे धरणाचे दरवाजे उघडण्यात आले आहेत.

Back to top button