वैभव सूर्यवंशी.  Pudhari
स्पोर्ट्स

Vaibhav Suryavanshi celebration |"ते काय होते हे मलाच...": वैभव सूर्यवंशीच्या 'त्‍या' सेलिब्रेशनवर नेमकं काय म्‍हणाला?

लखनऊविरुद्धच्‍या सामन्‍यात अवघ्या ३८ चेंडूंत ९३ धावांची तुफानी खेळी

पुढारी वृत्तसेवा

Vaibhav Suryavanshi celebration

नवी दिल्‍ली : यंदाच्‍या 'इंडियन प्रीमियर लीग' (IPL 2026) हंगामात राजस्थान रॉयल्सचा वैभव सूर्यवंशी आपल्‍या झंझावती खेळींमुळे चर्चेत आहे. अवघ्‍या १५ वर्षांचा असणारा या क्रिकेटपटूची खेळ प्रतिस्‍पर्धी संघाला धडकी भरविणारी ठरली आहे. मंगळवारी राजस्थान रॉयल्सला लखनऊ सुपर जायंट्सविरुद्ध कोणत्याही परिस्थितीत विजय आवश्यक होता. अशा दबावाच्या परिस्थितीत, या १५ वर्षीय वादळाने अवघ्या ३८ चेंडूंत ९३ धावांची तुफानी खेळी साकारत २२१ धावांचे डोंगराएवढे आव्हान पार करून दिले. आता या सामन्‍यावेळी त्‍याने केलेल्‍या सेलिब्रेशनची चर्चा सोशल मीडियावर सुरु आहे. मात्र आपल्‍या खास सेलिब्रेशनवर वैभने सामना संपल्‍यानंतर खुलासा केला.

"आपल्याबद्दल काय लिहिलं जातंय याचा विचार करत नाही"

राजस्थान रॉयल्स आता प्ले-ऑफपासून अवघा एक विजय दूर असताना, स्वतःभोवती असलेल्या प्रचंड प्रसिद्धीबाबत आणि कौतुकाबाबत सूर्यवंशी कमालीचा शांत आणि संयमी दिसला. आपल्याबद्दल काय लिहिले जातेय या प्रश्नावर समालोचक मुरली कार्तिकशी बोलताना वैभाव हसत म्हणाला, "मी वृत्तपत्रे वगैरे वाचत नाही, मी सोशल मीडिया किंवा बातम्या जास्त पाहत नाही आणि वृत्तपत्रेही वाचत नाही. त्यामुळे मी याचा जास्त विचार करत नाही. मी फक्त एवढाच विचार करतो की ही तर फक्त सुरुवात आहे. माझी कारकीर्द मोठी झाली आणि मी दीर्घकाळ खेळलो, तर लोक अजून बऱ्याच गोष्टी बोलतील. माझे पूर्ण लक्ष फक्त खेळावर असायला हवे आणि मला माझा हा प्रवास पूर्ण करायचा आहे."

घाई न करता सामना शेवटपर्यंत नेण्याचा माझा प्रयत्न होता

तो म्हणाला, "जेव्हा आमची गोलंदाजी सुरू होती आणि मी बाहेर बसलो होतो, तेव्हाच मी विचार केला होता की ही खेळपट्टी फलंदाजीसाठी खूप चांगली आहे. मी ठरवले होते की आज सुरुवातीला अजिबात घाई करायची नाही; थोडा वेळ खेळपट्टीवर टिकून राहायचे. मी जर जास्त वेळ फलंदाजी केली, तर त्याचा दुसऱ्या टोकावर असलेल्या फलंदाजालाही फायदा होईल, हाच माझा विचार होता. मला माहित आहे की मी कधीही २-३ चौकार किंवा षटकार मारू शकतो, त्यामुळे मी थोडा वेळ घेऊ शकत होतो. घाई न करता सामना शेवटपर्यंत नेण्याचा माझा प्रयत्न होता."

"ते काय होते हे माझे मलाच माहित नाही"

मैदानावरील त्याच्या एका हटके 'सेलिब्रेशन' बद्दल विचारले असता, सूर्यवंशी म्हणाला की तो रोज काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न करतो. "ते काय होते हे माझे मलाच माहित नाही; अगदी मागच्या सामन्यातील सेलिब्रेशनचाही काही अर्थ नव्हता . मी फक्त काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न करत असतो."

कर्णधार यशस्वी जयस्वालकडून भरभरून कौतुक

राजस्थान रॉयल्सचा कर्णधार यशस्वी जयस्वालने वैभवच्‍या खेळीचे भरभरून कौतुक केले. तो म्हणाला, "वैभवने ज्या पद्धतीने फलंदाजी केली, त्याने सामना पूर्णपणे आमच्या बाजूने फिरवला . मला फक्त चांगले क्रिकेटिंग शॉट्स खेळायचे होते आणि लय पकडायची होती. वैभव आणि मी ठरवले होते की आमच्या दोघांपैकी एकाने शेवटपर्यंत खेळायचे आणि त्याने तर सामनाच संपवून टाकला."

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT