

Manu Bhaker On Vaibhav Sooryavanshi: भारताची ऑलिम्पिक पदक विजेती नेमबाज मनू भाकरला युवा क्रिकेटर वैभव सूर्यवंशीबाबत प्रश्न विचारण्यात आला. मनू भाकरला हा प्रश्न दिल्लीत झालेल्या राष्ट्रीय रायफल असोसिएशने ऑफ इंडियाच्या ७५ व्या वार्षिक कार्यक्रमावेळी विचारण्यात आला होता.
दरम्यान, एका युवा नेमबाजपटूला एका युवा क्रिकेटरबाबत विचारलं अन् तिनं त्याबाबत उत्तर दिल्यानं विषयाला एक वेगळीच कलाटणी मिळाली आहे. मनू भाकरच्या यश आणि कामगिरीवरून फोकस दुसरीकडे गेल्यानं सोशल मीडियावर याची चांगलीच चर्चा रंगली. माध्यमांनी देखील चुकीच्या ठिकाणी चुकीचा प्रश्न विचारला त्याबद्दल देखील चर्चा सुरू झाली आहे.
मनू भाकरला कार्यक्रमावेळी माध्यमांनी १५ वर्षाचा क्रिकेटपटू वैभव सूर्यवंशीबाबत प्रश्न विचारला त्यावेळी तिने या प्रश्नाचे उत्तर विचारपूर्वक देत वयापेक्षा मेंटॉर अन् आजूबाजूचे लोक कसे आहेत याला जास्त महत्व दिलं.
मनू भाकर म्हणाली, 'मी असं म्हणेन की मेंटॉरशिप जर चांगली असेल, चांगल्या सोबतींचा सहवास लाभला तर ते त्याच्यासाठी चांगले होईल. ज्यावेळी तुमच्या अवती भवतीचे लोक चांगले असतात त्यावेळी वय हा फक्त एक आकडा असतो. गुणवत्तेला कोणतेही वय नसते.'
ऑलिम्पिक पदक विजेती मनू भाकर म्हणाली, 'चांगल्या गोष्टी ही वयाच्या साठाव्या वर्षी देखील होतात किंवा वयाच्या सहाव्या वर्षी देखील होतात. जर त्याच्या अवती भवतीची लोकं चांगल्याप्रकारे त्याला मेंटॉर करतील त्याला योग्य मार्गदर्शन करतील तर तो पुढचा सुपरस्टार असेल अशी मला खात्री आहे.'
मनू भाकरने या प्रशानेचे उत्तर जरी मॅच्युअरली दिलं असलं तरी मनू भाकरलाच हा प्रश्न का विचारण्यात आला यावरून समाज माध्यमांवर चर्चा सुरू झाली आहे. या प्रश्नामुळं मनू भाकरची ऑलिम्पिकमधील कामगिरी बाजूला पडली असा एक मतप्रवाह आहे.
केकेआर टीमचे संचालक आणि सोशल मीडियावरील प्रभावशाली व्यक्ती असलेल्या जॉय भट्टाचार्य यांनी याबाबत आपलं मत व्यक्त केलं. ते म्हणाले, 'ती एक ऑलिम्पिक मेडलिस्ट आहे. तिला तू वैभव सूर्यवंशीबाबत काय विचार करतेस असा प्रश्न विचारणं हे तिच्या कामगिरीच्या दृष्टीकोणातून आणि तिच्या खेळाच्या दृष्टीकोणातून योग्य नाही.'
ते पुढे म्हणाले, 'क्रिकेट हा या देशातील एक पॅशिनेट गेम आहे. तुमच्या स्पोर्ट्स एडिटरला हेडलाईनसाठी सूर्यवंशीबद्दल अजून एका सेलिब्रेटी कोटची गरज नाहीये. पुढच्यावेळी वैभव सूर्यवंशीला मनू भाकरबाबत विचारा तुम्हाला काय मिळतं बघू.'
इतर सोशल मीडिया युजर्सनी देखील अशाच प्रकारची मते व्यक्त केली. अनेकवेळा इतर खेळातील खेळाडूंना क्रिकेट सेंट्रिक नॅरेटिव्हमध्ये ओढलं जातं. याद्वारे कॅची हेडलाईन मिळवण्याचा प्रयत्न केला जातो.