

IPL 2026 : Harsha Bhogle on IPL Pitches
इंडियन प्रीमियर लीग (IPL) म्हणजे चौकार-षटकारांची आतिषबाजी आणि धावांचा पाऊस... हे समीकरण आता इतकं टोकाला गेलंय की २६४ सारखी विशाळकाय लक्षंही सहज गाठली जात आहेत. धावांच्या या शर्यतीत क्रिकेटचा मूळ आत्मा हरवतोय का? 'मैदानावर प्रेक्षक फक्त बॅटर्सची फटकेबाजी पाहायला येतात की काय?' असे सवाल आता अस्सल क्रिकेटप्रेमी विचारू लागले आहेत. सध्याच्या खेळपट्ट्या म्हणजे फलंदाजांची 'चंगळ' आणि गोलंदाजांची 'कत्तल' ठरत आहेत; पण क्रिकेटच्या भविष्यासाठी हा 'धोक्याचा इशारा' आहे का? प्रसिद्ध क्रिकेट समालोचक हर्षा भोगले यांनी याच मुद्द्यावर अत्यंत रोखठोक भाष्य केलं आहे. खेळपट्ट्यांबाबात त्यांचं मत? जाणून घेऊया...
प्रसिद्ध क्रिकेट समालोचक आणि विश्लेषक हर्ष भोगले यांनी सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये म्हटलं आहे की, "मी असे मुळीच म्हणत नाही की खेळपट्ट्या इतक्या कोरड्या किंवा संथ असाव्यात की चेंडू बॅटवर येणारच नाही. तसे झाल्यास केवळ १२५-१३० धावांचा नीरस सामना होतो, जो कोणालाच नको आहे. पण,
प्रसिद्ध क्रिकेट समालोचक आणि विश्लेषक हर्ष भोगले यांनी सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये म्हटलं आहे की, "मी असे मुळीच म्हणत नाही की खेळपट्ट्या इतक्या कोरड्या किंवा संथ असाव्यात की चेंडू बॅटवर येणारच नाही. तसे झाल्यास केवळ १२५-१३० धावांचा नीरस सामना होतो, जो कोणालाच नको आहे. पण, आपण खेळपट्टीवर थोडासा हिरवा गवतभाग का ठेवू शकत नाही? एखादा सामना जसा २०० धावांचा होतो, तसाच एखादा सामना वळण घेणाऱ्या खेळपट्टीवर १५० धावांचा का होऊ शकत नाही?"'
सध्याच्या आयपीएलमध्ये गोलंदाजांची ज्या प्रकारे यथेच्छ धुलाई होत आहे, त्याबद्दल बोलताना भोगले यांनी प्रशासक आणि प्रेक्षकांना एक महत्त्वाचा सल्ला दिला. "ज्या खेळपट्टीवर गोलंदाजांना शून्य मदत मिळते, अशा खेळपट्टीला पाहून 'व्वा, काय जबरदस्त खेळपट्टी आहे!' असे म्हणणे आपण सर्वांनी आता थांबवले पाहिजे. गोलंदाज केवळ मैदानात मार खाण्यासाठीच उतरत असतील, तर त्या क्रिकेटच्या दर्जावर प्रश्नचिन्ह उपस्थित होते," असेही भोगले यांनी स्पष्ट केले.
हर्ष भोगले यांनी 'उत्कृष्ट' खेळपट्टीची व्याख्या स्पष्ट करताना सांगितले की, जर खेळपट्टी गोलंदाजांना काहीच मदत करत नसेल, तर ती नक्कीच वाईट आहे. जर खेळपट्टीने गोलंदाजांना सर्वकाही दिले आणि फलंदाजांसाठी काहीच ठेवले नाही, तरीही ती वाईटच ठरते. चला, आता खेळपट्टीवर गोलंदाजांसाठीही काहीतरी मदत शिल्लक ठेवूया, असे आवाहन करत अशा खेळपट्टीवर फलंदाज आणि गोलंदाज यांच्यात समसमान लढत पाहायला मिळेल, असा विश्वासही हर्षा भोगले यांनी व्यक्त केला आहे.