T20 WC 2024
'परतफेड'साठी टीम इंडिया आज मैदानात उतरणार Twitter
स्पोर्ट्स

'परतफेड'साठी टीम इंडिया सज्‍ज!, क्रिकेट जगताचे लक्ष सेमी फायनलकडे

पुढारी वृत्तसेवा

जॉर्जटाऊन; वृत्तसंस्था : आक्रमक फलंदाजीची कवचकुंडले व बुमराहसारखे गोलंदाजीतील हुकमी अस्त्र ताफ्यात असल्याने या स्पर्धेत विशेष बहरात राहिलेला भारतीय संघ गुरुवारी आयसीसी टी-20 विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्य लढतीत इंग्लंडविरुद्ध उभा ठाकेल, त्यावेळी मागील पराभवाचा वचपा काढणे, हे मुख्य लक्ष्य असणार आहे. यापूर्वी 2022 मध्ये हेच संघ आमने सामने उभे ठाकले, त्यावेळी इंग्लंडने एकतर्फी विजय संपादन केला होता. यंदा मात्र रोहितसेना विशेष बहरात असून, त्या पार्श्वभूमीवर भारतीय संघाने दिमाखदार विजय मिळवणे अपेक्षित आहे.

जॉर्जटाऊन स्टेडियमवरील या लढतीत रोहितसेना कागदावर अधिक मजबूत दिसून येते आणि हेच भारताचे बलस्थानही ठरू शकते. या मैदानावर फिरकी गोलंदाजांना अधिक मदत मिळत आली असून, भारताचा कुलदीप यादव व इंग्लंडचा आदिल राशीद या बाद फेरीच्या लढतीत आपले वर्चस्व पणाला लावत असतील, तर त्यात आश्चर्याचे कारण नसेल.

या मैदानावर अगदी जलद गोलंदाजांनादेखील विशेष मदत मिळत आली असून, अफगाणचा स्पीडस्टार फझलहक फारुकीचा न्यूझीलंडविरुद्ध सामना जिंकून देणारा एक स्पेल याचे उत्तम उदाहरण आहे. आश्चर्य म्हणजे येथे 8 जूननंतर एकही सामना खेळवला गेला नसून, यामुळे क्युरेटरने येथील खेळपट्टीवर अधिक मेहनत घेणे शक्य झाले आहे. सुपर-8 फेरीपर्यंत भारताने दर्जेदार कामगिरी साकारली असली, तरी उपांत्य लढतीचे दडपण असल्याने भारताला येथे सर्व आघाड्यांवर सावध राहावे लागेल, हे साहजिकच आहे.

रोहित शर्माने पॉवर प्लेच्या षटकांत तुटून पडणे हाच आपला प्राधान्यक्रम असेल, असे यापूर्वीच स्पष्ट केले आहे. मधल्या फळीत शिवम दुबेने अपेक्षा पूर्ण केलेल्या नाहीत. या लढतीत आदिल राशीदला सामोरे जाताना त्याचा पवित्रा कसा असेल, यावर बरेच काही अवलंबून असेल. यजुवेंद्र चहल इंग्लंडच्या फिल सॉल्ट, जोस बटलर, हॅरी ब्रूक व जॉनी बेअरस्टो या उजव्या फलंदाजांविरुद्ध प्रभावी मारा करू शकेल, अशी आशा असली तरी भारतीय संघात या लढतीत कोणतेही बदल केले जाणार का, याबाबत अद्याप साशंकता आहे. चहलला या स्पर्धेत अद्याप एकही संधी मिळालेली नाही. त्यामुळे या लढतीत रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप याच त्रिकुटावर पुन्हा विश्वास ठेवला जाईल का, याचे औत्सुक्य असेल. जसप्रीत बुमराह उत्तम बहरात असून, त्याच्या गोलंदाजीला सामोरे जाताना इंग्लंडला सावध राहावेच लागेल. याशिवाय हार्दिक पंड्याने आतापर्यंत उत्तम अष्टपैलू योगदान दिले असल्याने हीदेखील भारताची आणखी एक जमेची बाजू असणार आहे.

सामना रद्द झाल्यास भारताला फायदा

सामना रद्द झाल्यास भारताला फायदा

भारत विरुद्ध इंग्लंड सेमी फायनल सामन्याला पावसाचा फटका बसला, तर दोन्ही संघांना प्रत्येकी 1 गुण दिला जाणार आहे. त्यामुळे सध्या गुणतालिकेत अव्वल स्थानावर असणार्‍या टीम इंडियाला त्याचा फायदा होणार असून, पावसामुळे सामना रद्द झाला, तर भारतीय संघ थेट फायनलमध्ये धडक मारणार आहे.

इंग्लंडसाठी प्रतिकूल परिस्थिती

इंग्लंडसाठी प्रतिकूल परिस्थिती

भारतीय संघ या स्पर्धेच्या उपांत्य लढतीत अपराजित धडक मारण्यात यशस्वी ठरला असताना दुसरीकडे, इंग्लंडसाठी मात्र अतिशय प्रतिकूल परिस्थिती आहे. सुपर-8 मध्ये उत्तम कामगिरी साकारण्यापूर्वी त्यांना दक्षिण आफ्रिकेविरुद्ध धक्कादायक पराभवाचा सामना करावा लागला होता.

बटलर-सॉल्टला पॉवर प्लेपूर्वीच बाद करणे महत्त्वाचे

बटलर-सॉल्टला पॉवर प्लेपूर्वीच बाद करणे महत्त्वाचे

कर्णधार बटलरने अमेरिकेविरुद्ध सुपर-8 फेरीत उत्तम फलंदाजी साकारली होती आणि येथील खेळपट्ट्यांवर तो लवकर जुळवून घेऊ शकत असल्याने सामन्याचा निकाल बदलण्याची ताकद त्याच्यात असेल. सहकारी सलामीवीर फिल सॉल्टदेखील काही वेळा धडाकेबाज फलंदाजी करण्यात यशस्वी झाला असून, यामुळे या दोन्ही फलंदाजांना पॉवर प्लेच्या आधीच बाद करणे भारतासाठी महत्त्वाचे ठरणार आहे.

कॉलिंगवूड म्हणतो, इंग्लंडला चमत्कार घडवावा लागेल!

कॉलिंगवूड म्हणतो, इंग्लंडला चमत्कार घडवावा लागेल!

2022 आयसीसी विश्वचषकाच्या उपांत्य लढतीत इंग्लंडने भारताला नमवले असले तरी यंदा मात्र त्याची पुनरावृत्ती होईल, असे वाटत नाही, असे माजी इंग्लिश क्रिकेटपटू कॉलिंगवूडने म्हटले आहे. प्रामाणिकपणे सांगायचे, तर भारत यंदा पराभूत होईल, असे मला अजिबात वाटत नाही. बुमराह अतिशय बहरात आहे. त्यामुळे भारताला नमवायचे असेल तर इंग्लंडला चाकोरीबाहेरचा खेळ साकारणे भाग असेल, याचा त्याने येथे उल्लेख केला.

फलंदाजीच्या आघाडीवर भारतीय संघाला विराट कोहलीकडून अधिक अपेक्षा असतील.

रोहितप्रमाणेच विराटनेही तुटून पडण्याची अपेक्षा!

फलंदाजीच्या आघाडीवर भारतीय संघाला विराट कोहलीकडून अधिक अपेक्षा असतील. विराटला त्याच्या लौकिकानुरूप अद्याप कामगिरी साकारता आलेली नाही. त्या तुलनेत धडाकेबाज, आक्रमक खेळ साकारण्यात रोहित कमालीचा यशस्वी ठरत आला आहे आणि तोच धडाकेबाज खेळ त्याच्याकडून आजही अपेक्षित असणार आहे. रोहितची ऑस्ट्रेलियाविरुद्ध 42 चेंडूंत 92 धावांची खेळी प्रदीर्घकाळ संस्मरणात राहणारी अशीच आहे. रोहित व विराट या दोघांसाठीही हा शेवटचा टी-20 वर्ल्डकप ठरण्याची शक्यता आहे.

संभाव्य संघ :

भारत : रोहित शर्मा , हार्दिक पंड्या, यशस्वी जैस्वाल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, संजू सॅमसन, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, यजुवेंद्र चहल, अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज.

इंग्लंड : जोस बटलर- कर्णधार, मोईन अली, जोफ्रा आर्चर, जॉनी बेअरस्टो, हॅरी ब्रूक, सॅम करण, बेन डकेट, टॉम हार्टली, विल जॅक्स, ख्रिस जॉर्डन, लियाम लिव्हिंगस्टोन, आदिल राशीद, फिल सॉल्ट, रीस टोपले, मार्क वूड.

SCROLL FOR NEXT