जसप्रीत बुमराह  
स्पोर्ट्स

Jasprit Bumrah IND vs ENG Test Series : बुमराहचा होणार पत्ता कट! नेतृत्वाच्या शर्यतीत शुभमन गिल मारणार बाजी, इंग्लंड दौऱ्यासाठी नवा मास्टरप्लॅन

जसप्रीत बुमराह इंग्लंड दौऱ्यावर पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील सर्व सामने खेळणार नाही. याच कारणास्तव निवडकर्ते त्याला भारतीय संघाचे उपकर्णधारपद देऊ इच्छित नाहीत.

रणजित गायकवाड

मुंबई : भारतीय क्रिकेट संघाच्या वेगवान माऱ्याचा प्रमुख आणि उपकर्णधार जसप्रीत बुमराह आता इंग्लंड दौऱ्यावर नेतृत्व करताना दिसणार नाही. जूनच्या अखेरीस सुरू होणाऱ्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी टीम इंडिया नवी रणनिती आखत असून, बुमराहला सर्व सामन्यांत खेळवले जाणार नसल्याचे संकेत मिळाले आहेत.

भारतीय संघाचा इंग्लंड दौरा इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल)च्या चालू हंगामाच्या समाप्तीनंतर सुरू होणार आहे. या दौऱ्यात भारतीय संघाला यजमान संघाविरुद्ध 5 सामन्यांची कसोटी मालिका खेळायची आहे. या मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा अद्याप झालेली नाही. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात संघाची घोषणा करेल अशी शक्यता आहे.

...तर बुमराह मोजकेच सामने खेळणार

इंग्लंड दौऱ्यापूर्वी एक मोठी अपडेट येत आहे. वृत्तानुसार, जसप्रीत बुमराह या दौऱ्यात पाचही कसोटी सामने खेळू शकणार नाही. निवडकर्ते वर्कलोड मॅनेजमेंट अंतर्गत हा निर्णय घेऊ शकतात. अशा परिस्थितीत बुमराहला या दौऱ्यात उपकर्णधारपदाची जबाबदारी दिली जाणार नाही.

सूत्रांनी सांगितले की, ‘टीम इंडियाच्या संघ व्यवस्थापनाला असा खेळाडू हवा आहे जो पाचही कसोटी सामन्यांसाठी उपलब्ध असेल आणि तो उपकर्णधारपदाची जबाबदारी सांभाळू शकेल. बुमराह पाचही सामन्यांत खेळण्याची शक्यता कमी आहे, त्यामुळे निवड समितीला वेगवेगळ्या सामन्यांसाठी वेगवेगळे उपकर्णधार नियुक्त करायचे नाहीत. कर्णधार आणि उपकर्णधार हे निश्चित असावेत आणि सर्व पाच कसोटी सामने खेळावेत, हेच योग्य ठरेल.’

बुमराहच्या दुखापतीबद्दल BCCI चिंतेत

बुमराहच्या दुखापतींच्या रेकॉर्डबद्दल बीसीसीआय चिंतेत आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर सिडनी कसोटीदरम्यान त्याला पाठीला दुखापत झाली, ज्यामुळे तो चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 सह 3 महिने क्रिकेटपासून दूर राहिला. तो आयपीएलच्या पहिल्या टप्प्यातही खेळू शकला नाही. अशा परिस्थितीत, बोर्ड त्याच्यावर सतत सामन्यांचा दबाव टाकण्याऐवजी त्याला महत्त्वाच्या सामन्यांमध्ये खेळवण्यावर लक्ष केंद्रित करत आहे. अशा परिस्थितीत बुमराहला नेतृत्वाची जबाबदारी दुस-या खेळाडूकडे सोपवली जाऊ शकते.

गिल होणार भारतीय संघाचा उपकर्णधार

रिपोर्टनुसार, निवड समिती एका युवा खेळाडूला उपकर्णधार म्हणून नियुक्त करण्यास उत्सुक आहे, जो भविष्यात संघाचे नेतृत्व देखील करेल. अशा परिस्थितीत शुभमन गिलला या दौऱ्यावर भारतीय संघाचा उपकर्णधार बनवता येण्याची दाट शक्यता आहे. गिल हा सध्या आयपीएल 2025 मध्ये गुजरात टायटन्स (जीटी) संघाचे नेतृत्व करत आहे.

बुमराह यशस्वी कर्णधार

बुमराहने ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर सर्व पाच कसोटी सामने खेळले. बुमराहने 2024 च्या अखेरीस ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर भारताला एकमेव विजय मिळवून दिला. याशिवाय त्याने इतर दोन कसोटी सामन्यांमध्ये संघाचे नेतृत्व केले. तो शेवटच्या कसोटी सामन्यात जखमी झाला. त्यावेळी वर्कलोड हे त्याच्या दुखापतीचे कारण सांगितले गेले. पाठदुखीच्या दुखापतीमुळे बुमराह 2025 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये खेळू शकला नाही. तथापि, त्याने फिट होऊन जबरदस्त पुनरागमन केले. बुमराहने आयपीएल 2025 मध्ये मुंबई इंडियन्स (MI) साठी आतापर्यंत 7 सामने खेळून 6.96 च्या इकॉनॉमी रेटने 11 विकेट्स घेतल्या आहेत.

रोहितच कर्णधार! शमीचीही होणार एंट्री

रिपोर्टनुसार, इंग्लंड दौऱ्यावर भारतीय संघाचे नेतृत्व रोहित शर्माकडेच सोपले जाऊ शकते. त्याचबरोबर वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीलाही ब-याच कालावधीनंतर कसोटी संघात स्थान मिळू शकते. शमी दुखापतीमुळे काही काळ आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर होता. मात्र यावर्षी फेब्रुवारीमध्ये इंग्लंडविरुद्ध झालेल्या व्हाइट बॉल मालिकेतून त्याने पुनरागमन केले. त्यानंतर शमीने चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये देखील शानदार प्रदर्शन करत 9 बळी घेतले.

भारत-इंग्लंड मालिकेचे वेळापत्रक

  • 20 ते 24 जून : पहिली कसोटी, हेडिंग्ले

  • 2 ते 6 जुलै : दुसरी कसोटी, बर्मिंगहॅम

  • 10 ते 14 जुलै : तिसरी कसोटी, लॉर्ड्स

  • 23 ते 27 जुलै : चौथी कसोटी, मँचेस्टर

  • 31 जुलै 4 ऑगस्ट : पाचवी कसोटी, द ओव्हल

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT