Riyan Parag : जबरदस्‍त..! 6 चेंडू, 6 षटकार, रियान परागने IPLमध्‍ये नोंदवला 'खास' विक्रम!

KKR vs RR : मोईन अलीच्‍या षटकात ५ चेंडूवर सलग पाच षटकार
Riyan Parag
रियान परागने आयपीएल २०२५ मध्ये खळबळ उडवून दिली आहे. राजस्थान रॉयल्सकडून खेळताना परागने केकेआरविरुद्ध सलग ६ चेंडूत ६ षटकार ठाेकले.(Image source- X)
Published on
Updated on

Riyan Parag

आंद्रे रसेलचे दमदार अर्धशतक आणि शेवटच्या षटकात रिंकू सिंगच्या स्फोटक खेळीच्या मदतीने कोलकाता नाईट रायडर्सने राजस्थान रॉयल्ससमोर २०७ धावांचे लक्ष्य ठेवले आहे. या मोठ्या लक्ष्‍याचा पाठलाग करताना राजस्‍थानचा स्‍टार फलंदाज रियान पराग याने कोलकाताच्‍या गोलंदाजांना बेदम चोपले. त्‍या दमदार कामगिरीच्‍या जोरावर त्‍याने आयपीएलमध्‍ये नवा विक्रमही नोंदवला आहे. अवघ्‍या एक धावाने राजस्‍थानने सामना गमावला तरीही रियानची खेळी कर्णधारपदाला साजेसी ठरली

६ चेंडूत ६ षटकार..

१३ वे षटक टाकण्यासाठी आलेल्या फिरकी गोलंदाज मोईन अलीला रियानने लक्ष्य केले. मोईनच्या या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर शिमरॉन हेटमायरने धाव घेतली. स्ट्राईकला रायनला आला. यानंतर त्‍याने सलग चार चेंडूंवर षटकार मारले आणि पाचवा चेंडू वाइड झाला. मोईनच्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवरही रायनने षटकार मारला. यानंतर, वरुण चक्रवर्ती १४ वे षटक टाकण्यासाठी आला. हेटमायरने पहिल्याच चेंडूवर एक धाव घेतली. मग स्ट्राईक रायनकडे होता आणि त्याने वरुणच्या चेंडूवर षटकार मारला. अशाप्रकारे रायनने सलग सहा चेंडूंवर सहा षटकार मारले.

रियान परागच्‍या नावावर खास विक्रम

धडाकेबाज फलंदाजीमुळे रियान पराग याचा समावेश खास यादीत झाला आहे. आयपीएलच्या एका षटकात सलग पाच षटकार मारणारा रियान पाचवा फलंदाज ठरला आहे. तसेच सलग सहा चेंडूवर सहा षटकार मारणार ताे आयपीएलमधील पहिला फलंदाज ठरला आहे.

आयपीएलमध्ये ५ चेंडूत ५ षटकार मारणारे फलंदाज

  • ख्रिस गेल (2012)

  • राहुल तेवतिया (2020)

  • रवींद्र जडेजा विरुद्ध हर्षल पटेल ( 2021)

  • रिंकू सिंग विरुद्ध यश दयाल (2023)

  • रियान पराग विरुद्ध मोईन अली (2025)

कोलकाताने राजस्‍थानला दिले २०७ धावांचे लक्ष्‍य

आंद्रे रसेलचे दमदार अर्धशतक आणि शेवटच्या षटकात रिंकू सिंगच्या स्फोटक खेळीच्या मदतीने कोलकाता नाईट रायडर्सने राजस्थान रॉयल्ससमोर २०७ धावांचे लक्ष्य ठेवले आहे. रसेलने २५ चेंडूत चार चौकार आणि सहा षटकारांसह नाबाद ५७ धावा केल्या, तर रिंकूने सहा चेंडूत एक चौकार आणि एका षटकारासह नाबाद १९ धावा केल्या. या दोन्ही फलंदाजांच्या शानदार खेळीमुळे केकेआरने २० षटकांत चार गडी गमावून २०६ धावा केल्या.

रियानचे शतक हुकले

लक्ष्याचा पाठलाग करताना राजस्थानची सुरुवात चांगली झाली नाही. संघाने ७१ धावांवर पाच विकेट गमावल्या. यानंतर हेटमायर आणि रायन यांनी निर्णायक भागीदारी केली. हेटमायर आणि रियान पराग यांनी सहाव्या विकेटसाठी ९२ धावांची भागीदारी केली. एकेकाळी राजस्थान कठीण परिस्थितीत दिसत होते; पण रियान आणि हेटमायरने संघाला अडचणीतून वाचवले. हर्षित राणाने हेटमायरला बाद करून राजस्थानला सहावा धक्का दिला आणि ही भागीदारी मोडली. हेटमायरने २३ चेंडूत एका चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने २९ धावा काढल्या आणि तो बाद झाला. त्याच वेळी, हर्षितने रायनला त्याचे शतक पूर्ण करू दिले नाही. रायन ४५ चेंडूत सहा चौकार आणि आठ षटकारांसह ९५ धावा काढल्यानंतर बाद झाला.

नाणेफेक जिंकून कोलकाताचा प्रथम फलंदाजीचा निर्णय

IPL 2025 मधील आजच्‍या सामन्‍यात नाणेफेक जिंकून कोलकाताने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. संघाला १३ धावांवर पहिला धक्‍का बसला. सुनील नारायणने नऊ चेंडूत एका चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने ११ धावा केल्या. युधवीर सिंगने सुनील नारायणला बाद केले. कर्णधार अजिंक्य रहाणे आणि रहमानुल्लाह गुरबाज यांनी दुसऱ्या विकेटसाठी केलेली भागीदारी निर्णायक ठरली. गुरबाज चांगल्या फॉर्ममध्ये दिसत होता पण महेश टिक्षणाने त्याला बाद करून ही भागीदारी मोडली. गुरबाज २५ चेंडूत चार चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने ३५ धावा काढून बाद झाला.

रसेलचे २२ चेंडूत अर्धशतक

रहाणेने डाव नियंत्रणात ठेवला आणि त्याला अंगकृष रघुवंशीने चांगली साथ दिली. रहाणेला ४४ धावा काढल्यानंतर रियान परागने बाद केले. यानंतर रसेलने स्फोटक फलंदाजी केली. राजस्थानच्या गोलंदाजांना लक्ष्य करताना तो जुन्या फॉर्ममध्ये दिसला. रसेलने २२ चेंडूत अर्धशतक पूर्ण केले. या हंगामातील त्याचे हे पहिले अर्धशतक ठरले आहे. आकाश माधवालने शेवटच्‍या षटकात पहिले तीन चेंडू वाईड टाकले. यानंतर रिंकूने स्फोटक फलंदाजी करत एक चौकार आणि दोन षटकार मारले आणि संघाचा धावसंख्या २०० पार नेली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news