T20 WC Final : जगज्जेता कोण? File Photo
स्पोर्ट्स

T20 WC Final : जगज्जेता कोण?

पुढारी वृत्तसेवा

2 जून रोजी 20 संघांनिशी सुरू झालेल्या यंदाच्या आयसीसी टी-20 विश्वचषक स्पर्धेतील फैसल्याची घडी आता उभी ठाकली असून भारत व दक्षिण आफ्रिका हे दोन तगडे, तुल्यबळ संघ आज फायनलच्या रणांगणात आपले सर्वस्व पणाला लावण्यासाठी सज्ज झाले आहेत. हे दोन्ही अपराजित संघ आज आमनेसामने उभे ठाकतील, त्यावेळी एकीकडे, दक्षिण आफ्रिकन संघ आयसीसीच्या कोणत्याही स्पर्धेतील आपल्या पहिल्यावहिल्या जेतेपदासाठी महत्त्वाकांक्षी असेल तर भारताला येथे खुणावत असेल तो 13 वर्षे सातत्याने हुलकावणी देत असलेला आयसीसीचा झळाळता विश्वचषक! घोडामैदान जवळच आहे!!

दोन्ही संघांमध्ये कोणत्या संघाची वाटचाल अधिक कठीण?

या स्पर्धेतील आतापर्यंतची वाटचाल पाहता, भारताचा अंतिम फेरीपर्यंतचा प्रवास अधिक कस लागलेला आहे. दक्षिण आफ्रिकेने साखळी फेरीत बांगला देश, श्रीलंका, नेदरलँड, नेपाळ यांच्याविरुद्ध तर सुपर-8 फेरीत अमेरिका व इंग्लंड यांच्याविरुद्ध विजय मिळवले. नंतर पहिल्या उपांत्य लढतीत अफगाणचा धुव्वा उडवत ते अंतिम फेरीत पोहोचले. त्या तुलनेत भारताने ऑस्ट्रेलिया, पाकिस्तानसारख्या तगड्या संघाला धूळ चारल्यानंतर उपांत्य फेरीत इंग्लंडचे आव्हान मोडीत काढत अंतिम फेरीत धडक मारली आहे.

कर्णधार रोहित शर्मा

भारतीय फलंदाजीचा भक्कम आधारस्तंभ, कर्णधार रोहित शर्मा यंदा विशेष बहरात असून त्याची ऑस्ट्रेलियाविरुद्ध 41 चेंडूंत 92 धावांची तडाखेबंद खेळी आणि त्यानंतर उपांत्य फेरीत प्रतिकूल परिस्थितीतील 57 धावांची जिगरबाज खेळी निव्वळ वाखाणण्याजोगी ठरली. आजही असाच फ्लाईंग स्टार्ट मिळवून देणे ही त्याची महत्त्वाकांक्षा पहिल्या षटकापासूनच दिसून येऊ शकते.

कर्णधार एडन मार्कराम

एडन मार्करामने 2014 मध्ये दक्षिण आफ्रिकेला 19 वर्षांखालील वयोगटात युवा विश्वचषक स्पर्धा जिंकून दिली होती. आता तोच पराक्रम वरिष्ठ स्तरावर गाजवण्याचा त्याचा बुलंद इरादा असणार आहे. यापूर्वी 2021 मध्ये त्याने मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये दक्षिण आफ्रिकेतर्फे सर्वाधिक धावा जमवण्याचा विक्रम नोंदवला होता.

भारताचे ट्रम्प कार्ड : जसप्रीत बुमराह

जागतिक स्तरावरील दिग्गज फलंदाजांना सळो की पळो करून सोडण्यात माहीर असणारा जसप्रीत बुमराह आजच्या लढतीत भारतीय क्रिकेट संघासाठी खर्‍या अर्थाने पुन्हा ट्रम्प कार्ड ठरू शकतो. या दिग्गज गोलंदाजाने आतापर्यंत खेळलेल्या 7 सामन्यांत 13 बळी घेतले आहेत.

दक्षिण आफ्रिकेचे ट्रम्प कार्ड : क्विंटन डी कॉक

यंदा दक्षिण आफ्रिकेला अंतिम फेरीत धडक मारून देण्यात यष्टिरक्षक-फलंदाज क्विंटन डी कॉकचा वाटा मोलाचा राहिला आहे. त्याने आतापर्यंत झालेल्या 8 सामन्यांत 143.66 च्या स्ट्राईक रेटने 204 धावांचे योगदान दिले असून हाच धडाका आजही कायम राखण्याची त्याची महत्त्वाकांक्षा असणार आहे.

कशी असेल खेळपट्टी?

बार्बाडोसमधील हा नववा सामना असणार आहे. येथील पहिला सामना सुपर ओव्हरपर्यंत रंगला होता. त्यानंतर मात्र येथील सर्व सामने एकतर्फी झाले आहेत. नंतरचे 4 पैकी 3 सामने प्रथम फलंदाजी करणार्‍या संघाने जिंकले आहेत. त्यानंतर चौथ्या लढतीत स्कॉटलंडने इंग्लंडविरुद्ध 10 षटकांत बिनबाद 90 धावा, अशी सुरुवात केल्यानंतर ती लढत पावसामुळे रद्द करावी लागली होती.

रोड टू फायनल्स

भारत व दक्षिण आफ्रिका हे दोन्ही संघ यंदाच्या स्पर्धेत अपराजित राहिले असून या दोन्ही संघांनी प्रथम साखळी फेरीत व नंतर बाद फेरीतील सर्व सामने जिंकले आहेत. हाच धडाका कायम राखत जेतेपदावर शिक्कामोर्तब करण्याचा दोन्ही संघांचा प्रयत्न असणार आहे.

भारत

  • आयर्लंडविरुद्ध 8 गड्यांनी विजयी

  • पाकिस्तानविरुद्ध 6 धावांनी विजयी

  • अमेरिकेविरुद्ध 7 गडी राखून विजयी

  • कॅनडाविरुद्ध सामना रद्द

  • अफगाणविरुद्ध 47 धावांनी विजयी

  • बांगला देशविरुद्ध 50 धावांनी विजयी

  • ऑस्ट्रेलियाविरुद्ध 24 धावांनी विजयी

  • इंग्लंडविरुद्ध 68 धावांनी विजयी

दक्षिण आफ्रिका

  • श्रीलंकेविरुद्ध 6 गडी राखून विजयी

  • नेदरलँडविरुद्ध 4 गडी राखून विजयी

  • बांगला देशविरुद्ध 4 धावांनी विजयी

  • नेपाळविरुद्ध एका धावेने विजय

  • अमेरिकेविरुद्ध 18 धावांनी विजयी

  • इंग्लंडविरुद्ध 7 धावांनी विजयी

  • विंडीजविरुद्ध 3 गड्यांनी विजयी

  • अफगाणविरुद्ध 9 गडी राखून विजय

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT