द. आफ्रिकेविरुद्ध स्मृती-शेफालीची 292 धावांची विश्वविक्रमी सलामी!

भारतीय फलंदाजांनी केली द. आफ्रिकेच्या गोलंदाजांची धुऽ धुऽ धुलाई..
INDW vs SAW Test Match Smriti Mandhana Shefali Verma Century
द. आफ्रिकेविरुद्धच्या एकमेव कसोटी सामन्यात भारतीय महिला संघाच्या स्टार फलंदाज शेफाली वर्मा आणि स्मृती मानधना यांनी वादळी शतके फटकावली.Twitter

पुढारी ऑनलाईन डेस्क : Smriti Mandhana and Shefali Verma Century : द. आफ्रिकेविरुद्धच्या एकमेव कसोटी सामन्यात भारतीय महिला संघाने दमदार सुरुवात केली. संघाच्या स्टार फलंदाज शेफाली वर्मा (205) आणि स्मृती मानधना (149) यांनी पहिल्याच डावात विक्रमी सलामी देत इतिहास रचला. दोघींनी आफ्रिकन गोलंदाजांवर हल्लाबोल केला आणि पहिल्या विकेटसाठी 292 धावांची भागीदारी केली.

10 वर्षांनंतर कसोटी सामना

भारत आणि दक्षिण आफ्रिका महिला संघांमध्ये 10 वर्षांनंतर एकमेव कसोटी सामना खेळवला जात आहे. चेन्नई येथे खेळल्या जात असलेल्या या सामन्यात भारतीय कर्णधार हरमनप्रीत कौरने नाणेफेक जिंकले आणि प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. स्मृती आणि शेफाली यांनी आपल्या कर्णधाराला निराश केले नाही. या जोडीने डावाच्या सुरुवातीपासूनच आफ्रिकन गोलंदाजांवर आक्रमण केले. शेफालीने 113 चेंडूत 15 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने शतक झळकावले. हे तिचे कसोटी कारकिर्दीतील पहिले शतक ठरले. तर स्मृतीने 19 चौकारांच्या मदतीने 122 चेंडूत शतक पूर्ण केले. तिचे गेल्या चार आंतरराष्ट्रीय सामन्यांमधील हे तिसरे शतक आहे.

पाकिस्तान फलंदाजांचा व्रिकम मोडीत

स्मृती-शेफाली जोडीने पाकिस्तानच्या किरण बलोच आणि साजिदा शाह यांच्या 241 धावांच्या सलामी भागिदारीचा विक्रम मोडीत काढला. पाक फलंदाजांनी 20 वर्षांपूर्वी 2004 मध्ये झालेल्या वेस्ट इंडिजविरुद्ध कसोटी सामन्यात ही कामगिरी केली होती.

महिला कसोटीतील सर्वोच्च सलामी भागीदारी

292 - स्मृती मानधना आणि शेफाली वर्मा विरुद्ध दक्षिण आफ्रिका (चेन्नई, 2024)

241 - किरण बलोच आणि साजिदा शाह विरुद्ध वेस्ट इंडीज (कराची, 2004)

200 - कॅरोलिन ॲटकिन्स आणि ॲरॉन ब्रिंडल विरुद्ध भारत (लखनौ, 2002)

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news