T20 World Cup Final : भारत की दक्षिण आफ्रिका? जगज्‍जेतेपदासाठी घमासान

टीम इंडियाच्या प्लेईंग इलेव्हनमध्ये बदल होण्याची शक्यता
IND vs SA T20 World Cup Final
टी-20 विश्वचषक स्पर्धा : अंतिम फेरीत भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात सामना रंगणार आहे फोटो सौजन्य : X/@BCCI, @ProteasMenCSA
Published on
Updated on

ब्रिजटाऊन-बार्बाडोस, वृत्तसंस्‍था : IND vs SA T20 World Cup Final : आयसीसी टी20 विश्‍वचषक स्‍पर्धेच्‍या अंतिम लढतीत शनिवारी भारत-दक्षिण आफ्रिका जेतेपदासाठी आमनेसामने भिडत असताना एकीकडे, रोहित शर्मा, विराट कोहली, जसप्रित बुमराहसारखे दिग्‍गज तर दुसरीकडे, एडन मार्कराम, क्‍विन्‍टॉन डी कॉक, कागिसो रबाडासारखो तगडे खेळाडू आपले सर्वस्‍व पणाला लावत असतील तर यात आश्‍चर्याचे कारण असणार नाही. भारतीय प्रमाणवेळेनुसार ही लढत रात्री 8 वाजता खेळवली जाणार आहे.

Summary
  • भारत-दक्षिण आफ्रिका जेतेपदासाठी आमनेसामने

  • रोहित शर्मा, विराट कोहली, जसप्रित बुमराह सर्वस्‍व पणाला लावणार

  • भारतीय प्रमाणवेळेनुसार लढत रात्री 8 वाजता

यंदा भारत व दक्षिण आफ्रिका हे दोन्‍ही संघ अपराजित असून हीच विजयी घोडदौड कायम ठेवत जेतेपदावर शिक्‍कामोर्तब करण्‍याचा दोन्‍ही संघांचा इरादा असेल. दक्षिण आफ्रिकेने यापूर्वी 1998 मध्‍ये चॅम्‍पियन्‍स चषक जिंकली. ती त्‍यावेळी आयसीसी नॉकआऊट ट्रॉफी या नावाने ओळखली जात असे. मात्र, इतका अपवाद वगळता या संघाला आजवर एकही आयसीसी स्‍पर्धा जिंकता आलेली नाही. आंतरराष्‍ट्रीय स्‍पर्धांमध्‍ये सातत्‍याने उपांत्‍य फेरीत पराभूत व्‍हावे लागले असून याचमुळे दक्षिण आफ्रिकेवर चोकर्सचा शिक्‍का बसला आहे. तो खोडून काढण्‍याचे त्‍यांचे आज लक्ष्‍य असेल.

एरवी, दक्षिण आफ्रिकन खेळाडूंसाठी आयपीएल जेतेपद हाच सर्वात मोठा पराक्रम असे समीकरण ठरत आले असले तरी येथे विश्‍वचषक जिंकता आला तर हा त्‍यांच्‍या कारकिर्दीतील अर्थातच सर्वोच्‍च क्षण असणार आहे. यापूर्वी भारतीय संघ गतवर्षी वन डे विश्‍वचषकाच्‍या अंतिम फेरीत पोहोचला होता. मात्र, पॅट कमिन्‍सच्‍या नेतृत्‍वाखालील ऑस्‍ट्रेलियाने भारताचा एकतर्फी धुव्‍वा उडवला होता. जेतेपदाची ती कसर येथे भरुन काढण्‍याचाही भारताचा प्रयत्‍न असणार आहे.

शिवम दुबेला या स्‍पर्धेत फारसा सूर सापडला नसला तरी या महत्‍वाच्‍या लढतीत भारत मागील विजयी संघात बदल करणार का, हे पहावे लागेल. शिवम दुबे येथे फिरकीपटू केशव महाराज व तबरेझ शमसी यांना कसा सामोरे जाईल, यावर देखील बरीच समीकरणे अवलंबून असू शकतात. गोलंदाजीच्‍या आघाडीवर भारताला जलद व फिरकी अशा दोन्‍ही आघाड्यांवर अजिबात चिंता नाही. भारताच्‍या तुलनेत दक्षिण आफ्रिकेला सरावासाठी एक अतिरिक्‍त दिवस मिळाला आहे. शुक्रवारी त्‍यांनीही कसून सराव केला.

दक्षिण आफ्रिकेची क्‍विन्‍टॉन डी कॉक, हेन्‍ड्रिक्‍सवर भिस्‍त

या लढतीत क्‍विन्‍टॉन डी कॉक व रिझा हेन्‍ड्रिक्‍स या दोन्‍ही सलामीवीरांवर दक्षिण आफ्रिकेची प्रामुख्‍याने भिस्‍त असणार आहे. सुपर-8 फेरीत कर्णधार एडन मारक्रम बड्या संघांविरुद्ध फारसा यशस्‍वी ठरला नव्‍हता, ही मात्र त्‍यांच्‍यासाठी चिंतेची बाब ठरली आहे. हेन्‍रिच क्‍लासेनसारखा मर्यादित षटकातील विस्‍फोटक फलंदाज या संघात आहे. मात्र, त्‍यालाही भारतीय फिरकीपटूंचे बीमोड करण्‍यासाठी विशेष रणनीती आखावी लागेल.

अलीकडील कालावधीत भारताला आयसीसी स्‍पर्धेत लक्षवेधी यश मिळवता आले नसले तरी यंदा परिस्‍थिती वेगळी आहे. प्रतिस्‍पर्धी दक्षिण आफ्रिकेचा संघ बराच कमकुवत आहे आणि याचा लाभ भारताला होऊ शकतो.

पॅट कमिन्‍स (ऑस्‍ट्रेलियाचा माजी विश्‍वचषक विजेता कर्णधार)

द्रविड यांच्‍या प्रशिक्षकपदाची गोड सांगता होणे अपेक्षित

विद्यमान मुख्‍य प्रशिक्षक राहुल द्रविड यांच्‍यासाठी प्रशिक्षक या नात्‍याने ही शेवटची स्‍पर्धा असेल. यामुळे, आजच्‍या लढतीत जेतेपदावर शिक्‍कामोर्तब करत द्रविड यांच्‍या प्रशिक्षकपदाच्‍या कारकिर्दीची यथोचित सांगता करण्‍याचा रोहितसेनेचा प्रयत्‍न असणार आहे.

फायनलमध्‍ये दिसू शकेल विराटचा सर्वोत्तम खेळ!

या विश्‍वचषकात माजी कर्णधार विराट कोहलीला अजिबात सूर सापडलेला नाही. रोहित शर्माने मात्र विराटला पाठबळ दर्शवले असून विराट आपला सर्वोत्तम खेळ फायनलसाठी राखून ठेवत असेल, असे प्रतिपादन केले. स्‍वत: रोहितने या स्‍पर्धेत प्रतिस्‍पर्धी गोलंदाजांवर उत्तम वर्चस्‍व गाजवले आहे आणि फायनलमध्‍ये आणखी एक तडाखेबंद खेळी साकारण्‍यासाठी तो अर्थातच बुलंद इराद्याने मैदानात उतरणार आहे.

रोहित शर्मा

पावसाचा व्‍यत्‍यय आल्‍यास राखीव दिवसाचा अवलंब

शनिवारी बार्बाडोसमध्‍ये पावसाचा व्‍यत्‍यय येईल, असे संकेत स्‍थानिक हवामान खात्‍याने वर्तवले आहेत. पावसाचा व्‍यत्‍यय आल्‍यास आयसीसीने राखीव दिवस निश्‍चित केला आहे. त्‍यामुळे, शनिवारी हा सामना पूर्ण होऊ न शकल्‍यास रविवारी खेळवला जाऊ शकतो.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news