MI vs SRH Rohit Sharma Completes 8000 Runs in Winning T20 Matches
मुंबई : IPL 2025 मध्ये मुंबई इंडियन्स संघाने सनरायझर्स हैदराबाद संघाचा 7 विकेट्सने पराभव केला. या सामन्यात मुंबईसाठी रोहित शर्माने शानदार कामगिरी केली. त्याने अर्धशतक झळकावले आणि संघाला सामना जिंकून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. त्याने 70 धावांच्या खेळीत 8 चौकार आणि 3 षटकार ठोकले.
हिटमॅन रोहितने अर्धशतक झळकावून टी-20 क्रिकेट करिअरमधील जिंकलेल्या सामन्यांमध्ये 8000 धावा पूर्ण केल्या आहेत. अशी कामगिरी करणारा तो पहिला भारतीय फलंदाज ठरला आहे. त्याच्या आधी कोणीही हा पल्ला पार करू शकलेला नाही. त्याच्या खात्यात एकूण 8056 धावा जमा झाल्या आहेत.
चालू हंगामात, रोहित शर्माचे हे सलग दुसरे अर्धशतक आहे. त्याने एसआरएचविरुद्धच्या आधी चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध 45 चेंडूत 76 धावा केल्या होत्या. त्या खेळीत त्याने चार चौकार आणि सहा षटकारांचा ठोकले होते. या सामन्यातील शानदार कामगिरीसाठी रोहितला सामनावीराचा पुरस्कारही मिळाला. आता आयपीएलमध्ये 9 वर्षांनंतर रोहित शर्माने सलग दोन सामन्यांमध्ये अर्धशतके झळकावली आहेत. यापूर्वी, 2016 मध्ये त्याने सलग दोन सामन्यांमध्ये अर्धशतके झळकावली होती. त्या हंगामात त्याने केकेआरविरुद्ध 68 आणि रायझिंग पुणे सुपरजायंट्सविरुद्ध 85 धावा कुटल्या होत्या.
मुंबई इंडियन्सविरुद्ध सनरायझर्स हैदराबादच्या फलंदाजांना चांगली कामगिरी करता आली नाही. फक्त हेन्रिक क्लासेनने 71 धावा केल्या आणि त्यामुळे या संघाला 100 धावांचा टप्पा ओलांडता आला. एसआरएचने प्रथम फलंदाजी करत एकूण 143 धावा केल्या. यानंतर, मुंबई इंडियन्सकडून रोहित शर्माने दमदार अर्धशतक झळकावले. सूर्यकुमार यादवने 19 चेंडूत 40 धावा केल्या आणि संघाला विजय मिळवून दिला. मुंबईकडून ट्रेंट बोल्टने शानदार गोलंदाजी केली. त्याने चार षटकांत 26 धावा देत चार विकेट्स घेतल्या.