

पुढारी ऑनलाईन डेस्क : मुंबई इंडियन्स संघासाठी रोहितचा फॉर्म खूपच महत्त्वाचा होता; पण अखेरीस चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध सामन्यात रोहित शर्मा आपल्या फॉर्मात परतला आणि मुंबईसाठी मॅचविनिंग खेळी करत संघाला विजय मिळवून दिला. तो सामन्याचा सामनावीरदेखील ठरला. रोहित शर्माच्या नावाचे स्टँड वानखेडेच्या मैदानावर तयार होणार आहे. याबाबत रोहितला विचारले असता तो म्हणाला, माझ्यासाठी ही खूप सन्मानाची गोष्ट आहे. मी लहान असताना या स्टेडियममध्ये आम्हाला येण्याची परवानगीदेखील नव्हती. आता माझ्या नावाचे स्टँड इथे होणार आहे, ही खरेच भावुक करणारी आणि सन्मानाची गोष्ट आहे. (rohit sharma stand in wankhede stadium)
सामनावीर म्हणून रोहित शर्माचे नाव घोषित होताच वानखेडे स्टेडियममध्ये रोहित...रोहित नावाचा जयजयकार दुमदुमला. फक्त मुंबई इंडियन्स नव्हे, तर ‘सीएसके’चे पिवळ्या जर्सीमधील चाहतेदेखील रोहितच्या नावाचा जयजयकार करताना दिसले. रोहित चर्चा करण्यासाठी आला तेव्हा हर्षा भोगलेंनी रोहितला सांगितले की, ‘सीएसके’चे चाहतेही त्याच्या नावाचा जयघोष करताना दिसत आहेत, यावर रोहित शर्मा म्हणाला, हे क्रिकेटवर प्रेम करणारे चाहते आहेत आणि हिच वानखेडेची खासियत आहे. चाहत्यांना चांगल्या क्रिकेटचा आनंद घ्यायचा असतो आणि आमच्यासाठी आजचा सामना खूपच चांगला होता.
रोहित शर्मा त्याच्या फॉर्मबद्दल बोलताना म्हणाला, गेल्या कित्येक वर्षांपासून क्रिकेट खेळत आहे. त्यामुळे फॉर्मात नसताना स्वत:वर शंका घेणे आणि अविश्वास दाखवत वेगळे काहीतरी ट्राय करणे ही खूप साधी गोष्ट आहे. आपल्याला कसे खेळायचे आहे आणि खेळी कशी पुढे न्यायची आहे, याचा विचार करणे खूप महत्त्वाचे असते.
इम्पॅक्ट प्लेअर म्हणून रोहित शर्मा 15 व्या किंवा 17 व्या षटकात येतो; पण चेन्नईविरुद्ध सामन्यात तो थेट फलंदाजीला उतरला, याबद्दल रोहित म्हणाला, आम्ही याबद्दल चर्चा केली; पण 2-3 षटकांसाठी मैदानात येण्याने फारसा काही फरक पडत नाही; पण तुम्ही 17 षटके फिल्डिंग केलेली नसते आणि अचानक मैदानावर येऊन फिल्डिंग करता हे सोपे नसते; पण जर संघ व्यवस्थापनाला मी थेट फलंदाजीला यावे अशी इच्छा असेल तरीही मला चालेल.