

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारतीय क्रिकेट संघाचा स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहला प्रतिष्ठित विस्डेन क्रिकेटर्स अल्मनॅक 2025 मध्ये जगातील सर्वोत्तम पुरुष क्रिकेटपटू म्हणून घोषित करण्यात आले. त्याचबरोबर भारतीय महिला क्रिकेटपटू स्मृती मानधना हिला वर्षातील सर्वोत्तम महिला क्रिकेटपटूचा सन्मान देण्यात आला आहे. तर, सर्वोत्तम टी-20 क्रिकेटपटूचा मान निकोलस पूरनला मिळाला आहे.
जसप्रीत बुमराहने गेल्या वर्षी 20 पेक्षा कमी सरासरीने 200 विकेट्स घेतल्या आहेत. अशी कामगिरी करणारा तो इतिहासातील पहिला कसोटी गोलंदाज ठरला. यामुळेच विस्डेनचे संपादक लॉरेन्स बूथ यांनी जसप्रीत बुमराह याचा ‘स्टार ऑफ द इयर’ म्हणून उल्लेख केला.
ऑस्ट्रेलियातील बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये बुमराहने शानदार गोलंदाजी केली. त्याने एकट्याने भारताच्या गोलंदाजीचे नेतृत्व केले आणि 13.06 च्या सरासरीने 32 विकेट्स घेतल्या. 2024 मध्ये त्याने 21 सामन्यांमध्ये 13 च्या सरासरीने 86 विकेट्स घेतल्या. बूथने यांनी जसप्रीत बुमराहला सर्वात घातक गोलंदाज म्हटले आहे. याशिवाय, तो जगातील महान खेळाडूंपैकी एक असल्याचाही त्यांनी दावा केला. याशिवाय, बुमराहने मागील वर्षी जूनमध्ये अमेरिका आणि कॅरिबियन बेटांवर झालेल्या टी-20 विश्वचषकात भारताच्या विजेतेपदातही त्याने महत्त्वाची भूमिका बजावली. तथापि, या शानदार वर्षानंतर, पाठीच्या दुखापतीमुळे तो चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारताच्या ऐतिहासिक विजयाचा भाग होऊ शकला नाही.
स्मृती मानधना हिला विस्डेनने जगातील सर्वोत्तम महिला खेळाडू म्हणून घोषित केले. मानधनाने 2024 मध्ये सर्व फॉरमॅटमध्ये एकूण 1 हजार 659 धावा केल्या, जे आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या एका कॅलेंडर वर्षात महिला खेळाडूने केलेल्या सर्वाधिक धावा आहेत. यात चार एकदिवसीय शतकांचाही समावेश आहे, जो आणखी एक विक्रम आहे. जूनमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळण्यात आलेल्या टी-20 सामन्यात भारताने दहा विकेट्सने विजय मिळवला. या सामन्यात मानधनाने तिचे दुसरे कसोटी शतक (149 धावा) झळकावले.
सरे काउंटीतील तीन खेळाडू गस अॅटकिन्सन, जेमी स्मिथ आणि डॅन वॉरल यांचा विस्डेनच्या वर्षातील पाच क्रिकेटपटूंमध्ये समावेश करण्यात आला. याशिवाय, हॅम्पशायरच्या लियाम डॉसन आणि इंग्लंडची खेळाडू सोफी एक्लेस्टोन यांनाही हा प्रतिष्ठित सन्मान देण्यात आला.
भारताविरुद्ध पुणे कसोटीत न्यूझीलंडच्या मिचेल सँटनरने घेतलेल्या 13 विकेट्समुळे किवी संघाने मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी घेतली. दरम्यान, 2012 नंतर भारताने पहिल्यांदाच घरच्या मैदानावर कसोटी मालिका गमावली. या कामगिरीसाठी सँटनरला विस्डेन ट्रॉफी देण्यात आली.
दरम्यान, वेस्ट इंडिजचा फलंदाज निकोलस पूरन याला जगातील आघाडीचा टी-20 खेळाडू म्हणून घोषित करण्यात आले. 2024 मध्ये, पूरनने 21 सामन्यांमध्ये 25.77 च्या सरासरीने आणि 142.33 च्या स्ट्राईक रेटने 464 धावा केल्या. तो आयपीएल 2025 मध्ये 8 सामन्यांमध्ये 368 धावा करून आतापर्यंत दुसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक धावा करणारा खेळाडू आहे.
विस्डेन फाइव्हमध्ये समावेश होणे ही क्रिकेटमधील सर्वात प्रतिष्ठित कामगिरींपैकी एक मानली जाते. क्रिकेटर्स ऑफ द इयर पुरस्कार 1889 मध्ये सुरू झाला आणि 1891 पासून तो पाच खेळाडूंपुरता मर्यादित होता. तेव्हापासून युद्ध आणि इतर काही अपवादात्मक परिस्थिती वगळता दरवर्षी पाच खेळाडूंना हा सन्मान देण्यात येतो. हा पुरस्कार खेळाडूला पुन्हा जिंकता येत नाही.