आयपीएल स्‍पर्धेत 'प्लेऑफ'मध्‍ये धडक मारण्‍यासाठी पाच संघांमध्‍ये स्‍पर्धा आहे. File Photo
स्पोर्ट्स

IPL Playoffs Qualification : 'प्लेऑफ'साठी रस्‍सीखेच! काेणत्‍या संघाचे पारडे जड?

54 सामन्‍यानंतर अजूनही पाच संघांना आहे १८ गुण पात्र करण्‍याची संधी!

पुढारी वृत्तसेवा

IPL Playoffs Qualification

इंडियन प्रिमियर लीग (आयपीएल) २०२५ हंगाम आता खर्‍या अर्थाने रंजक झाला आहे. यंदाच्‍या हंगामात आतापर्यंत ५४ सामने खेळले गेले आहेत. अंतिम टप्‍प्‍यात 'फ्‍लेऑफ'साठी पात्र ठरणार्‍या अव्‍वल चार संघ कोणते असतील? यावर क्रिकेटप्रेमींमध्‍ये खल सुरु आहे. आठपैकी चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स हे संघ फ्‍लेऑफच्‍या शर्यतीमधून बाहेर पडले आहेत. तसेच अद्याप कोणताही संघ अधिकृतपणे प्लेऑफसाठी पात्र ठरलेला नाही हे विशेष. जाणून घेवूया आयपीएल 'फ्‍लेऑफ'चे नवे समीकरण...

आरसीबीचे फ्‍लेऑफसाठी तिकिट 'फायनल'

आरसीबी संघ १६ गुण मिळवत सध्‍या आयपीएलच्‍या गुणतालिकेत अव्‍वल स्‍थानी आहे.

आयपीएलमध्‍ये १६ गुण मिळवणारा संघ पात्रता फेरीत अपयशी ठरला असे आजवर तरी झालेले नाही. त्‍यामुळे सध्‍या अव्‍वल स्‍थानी असणार्‍या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (आरसीबी) संघ फ्‍लेऑफसाठी पात्र असल्‍याचे मानले जात आहे. चेन्‍नईसीएसकेविरुद्धच्या विजयासह आरसीबीने गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावले आहे. आता या संघाला फ्‍ले ऑफमध्‍ये जाण्‍यासाठी आणखी केवळ दोन गुणांचीच गरज आहे. जरी दोन्‍ही सामन्‍यात पराभूत व्‍हावे लागले तरी हा संघ नेट रन रेटवर अवलंबून न राहता १६ गुणांसह फ्‍लेऑफसाठी पात्र ठरू शकतो. विशेष म्‍हणजे आरसीबीचे उर्वरीत दोन्‍ही सामने हे होम ग्राउंड म्‍हणजे चिन्‍नास्‍वामी स्‍टेडियमवरच होणार आहे. त्‍यामुळे हा संघ जर-तरच्‍या समीकरणात न अडकता फ्‍लेऑफमध्‍ये धडक मारणारा पहिला संघ ठरण्‍याची शक्‍यता आहे. आतापर्यंत संघाने ११ सामने खेळले असून १६ गुण आपल्‍या नावावर केले आहेत.

पंजाब किंग्‍जला तीन पैकी दोन सामने जिंकणे अनिवार्य

पंजाब किंग्‍जने लखनौ सुपर जायंट्सविरुद्धच्या सामन्‍या विजय मिळवत गुणतालिकेत १५ गुणांसह दुसरे स्‍थान पटकावले आहे.

पंजाब किंग्‍जने लखनौ सुपर जायंट्सविरुद्धच्या सामन्‍या विजय मिळवत गुणतालिकेत १५ गुणांसह दुसरे स्‍थान पटकावले आहे. या संघाचे आणखी तीन सामने बाकी आहेत. या तीन पैकी दोन सामन्‍यातील विजय हा पंजाब संघाचा फ्‍लेऑफमधील मार्ग मोकळा करणारा असेल. मात्र पंजाबचा उर्वरीत तिन्‍ही सामन्‍यात पराभव झाला तर त्‍यांना इतर संघांच्‍या निकालावर आणि सारेकाही जर-तरवर अलंबून राहावे लागणार आहे.

गुजरात टायटन्स नेट रन रेटमध्‍ये भारी

गुजरात टायटन्सने पुढील चार सामन्‍यातील विजय मिळवला तर हा संघ पहिल्या दोनमध्येही आपले स्थान पक्के करू शकतो.

आयपीएलच्‍या यंदाच्‍या हंगामात गुजरात संघाचे अजूनही चार सामने शिल्‍लक आहेत. संघाच्‍या नावावर १४ गुण आहेत. विशेष म्‍हणजे या संघाचा नेट रन रेट हा मुंबई इंडियन्‍सनंतर दुसर्‍या क्रमाकांचा आहे. पुढील चार सामन्‍यातील विजय मिळवला तर हा संघ पहिल्या दोनमध्येही आपले स्थान पक्के करू शकतो. चारपैकी दोन सामने हे घरच्‍या मैदानावर असल्‍याने फ्‍लेऑफमध्‍ये धडक मारण्‍याची संधी या संघाला सर्वाधिक असल्‍याचे मानले जाते.

मुंबई इंडियन्स जबरदस्‍त फॉर्ममध्‍ये

मुंबई संघाने सलग सहा सामन्‍यांमध्‍ये विजय मिळवत जबरदस्‍त पुनरागमन केले आहे.

यंदाच्‍या आयपीएल हंमागात मुंबई इंडियन्‍स संघाची सुरुवात खराब झाली होती. सलगच्‍या पराभावामुळे यंदाही हा संघ पिछाडवर पडणार, अशीही चर्चा सुरु झाली. मात्र मुंबई संघाने सलग सहा सामन्‍यांमध्‍ये विजय मिळवत जबरदस्‍त पुनरागमन केले. त्‍यामुळे आता हा संघ पहिल्‍या चारमध्‍ये स्‍थान मिळवणार हे जवळपास निश्‍चित झाले आहे. संघाचा असाच फॉर्म कायम राहिला तर पहिल्‍या दोन संघांमध्‍ये स्‍थान मिळण्‍याची शक्‍यता आहे. मुंबई संघाचा नेट रन रेट सर्वोत्तम आहे. तसेच आता उर्वरीत तीनपैकी दोन सामने घरच्या मैदानावर आहेत. यंदाच्‍या हंगामात मुंबई संघाने घरच्या मैदानावर आतापर्यंत पाच पैकी चार जिंकले आहेत. मुंबईचे १४ गुण असले तरी संघ अजूनही पहिल्या चारमध्ये पोहोचू शकतो, परंतु यासाठी त्याला इतर निकालांवर आणि नेट रन रेटवर अवलंबून राहावे लागेल. त्याला १८ किंवा त्याहून अधिक गुण मिळवण्याचीही संधी आहे.

दिल्ली कॅपिटल्सची गाडी पुन्‍हा रुळावर येणार?

सुरुवातीला एकेकाळी अव्वल स्थानावर असलेला दिल्ली संघ आता पाचव्या स्थानावर घसरला आहे.

यंदा दिल्‍ली कॅपिटल्‍स संघाने दमदार सुरुवात केली होती. पहिल्‍या सहापैकी पाच सामन्‍यात विजय मिळवले होते. मात्र गेल्या चारपैकी तीन सामने गमावले आहेत. यामुळेच सुरुवातीला अव्वल स्थानावर असलेला दिल्ली संघ आता पाचव्या स्थानावर घसरला आहे. आता आज (दि. ५ मे) दिल्‍लीचा संघ घरच्या मैदानावर सनरायझर्स हैदराबादशी सामना करेल. घरच्या मैदानावर संघाला सहापैकी फक्त तीन सामने जिंकता आले आहेत. इतर संघांप्रमाणे दिल्ली १८ गुणांसह प्लेऑफमध्ये पोहोचेल याची खात्री नाही; परंतु १४ गुणांसह ते पूर्णपणे समीकरणाबाहेर जाणार नाहीत. इतर संघाच्‍या कामगिरीवरही हा संघ प्लेऑफमध्येही पोहोचू शकतो. तथापि, संघाचे लक्ष्‍य हे आपल्‍या नावावर १६ गुण करण्‍यावर असेल.

रविवारी (दि.४ मे) राजस्थानवर मिळवलेल्‍या विजयामुळे कोलकाता (केकेआर) संघाला चार संघांच्या शर्यतीत आपले स्थान कायम ठेवण्‍यास यश आले आहे.

कोलकाताच्‍या 'फ्‍लेऑफ'चे आव्‍हान कायम

रविवारी (दि.४ मे) कोलकाता (केकेआर) संघाने राजस्थानविरुद्धच्या अवघ्‍या एका धावेने थरारक विजय मिळवला. या विजयामुळे चार संघांच्या शर्यतीत आपले स्थान कायम ठेवण्‍यास यश आले आहे. यंदाच्‍या हंगामात ११ सामन्यांत ११ गुणांसह कोलकाता संघ सहाव्या स्थानावर आहे. सध्या पाच संघांना १८ किंवा त्याहून अधिक गुण मिळवणे शक्य आहे. याचा अर्थ केकेआरचे प्लेऑफमध्ये पोहोचणे निश्चित नाही. संघाने उर्वरित तीनही सामने जिंकले तरी पंजाबप्रमाणे १५ गुण केकेआरला प्लेऑफच्या शर्यतीत ठेवतील; परंतु १३ गुणांमुळे त्यांचा यंदाच्‍या हंगामातील प्रवास थांबेल.

लखनौची सारी मदार 'जर-तर'वर

सलग तीन पराभवाला सामोरे जावे लागल्‍याने लखनौ संघ गुणतालिकेत सातव्या स्थानावर घसरला आहे.

सलग तीन पराभवाला सामोरे जावे लागल्‍याने लखनौ संघ गुणतालिकेत सातव्या स्थानावर घसरला आहे. पहिल्या चारमध्ये पोहोचण्याची त्यांची शक्यता खूपच कमी आहे. आता या संघाला इतरांच्‍या निकालांवर अवलंबून राहावे लागले. तसेच त्यांनी उर्वरित तीन सामने जिंकावे लागतील. यातील दोन सामने अव्वल चारमधील संघांविरुद्ध आहेत. पुढील तिन्‍ही सामने जिंकले तरी लखनौ संघाला १६ गुण मिळवता येतील. प्लेऑफच्या शर्यतीत आठ संघांमध्ये लखनौचा नेट रन रेटमध्‍ये सातव्‍या क्रमाकांवर आहे.

हैदराबादसाठीही मोठे आव्‍हान

फ्‍लेऑफमध्‍ये धडक मारणे हैदराबाद संघासाठी मोठे आव्‍हान असणार आहे.

हैदराबाद संघाचे चार सामने बाकी आहेत. हे चारीही सामने जिंकले तर या संघाचे गुण १४ होतील. यानंतर त्‍यांना अव्‍वल चारपैकी दोन संघांचा पराभव झाला तरच हैदराबादला संधी आहे. मात्र चौथ्या स्थानासाठी नेट रन रेटही महत्त्‍वपूर्ण ठरणार आहे. हैदराबादचा सध्याचा नेट रन रेट -१.१९२ असून तो नेट रन रेटबाबत तळाला आहे. त्‍यामुळे फ्‍लेऑफमध्‍ये धडक मारणे संघासाठी मोठे आव्‍हान असणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT