

जयपूर : आयपीएल 2025 मध्ये प्लेऑफमध्ये कोणते चार संघ आपले स्थान निश्चित करतील हे अद्याप निश्चित झालेले नसले तरी, या शर्यतीतून बाहेर पडणा-या दोन संघांवर शिक्कामोर्तब झाला आहे. यामध्ये पहिला चेन्नई सुपर किंग्ज आणि त्यानंतर राजस्थान रॉयल्स यांचा समावेश आहे.
मुंबई इंडियन्सने नुकताच आयपीएलच्या 50व्या सामन्यात राजस्थान रॉयल्सला 100 धावांनी मात दिली. हा आरआरचा 11 सामन्यांमधील सहावा पराभव ठरला. राजस्थान संघाच्या खराब कामगिरीचे सर्वात मोठे कारण म्हणजे त्यांच्या प्रमुख खेळाडूंनी अपेक्षेनुसार कामगिरी केली नाही, त्यापैकी एक नाव शिमरॉन हेटमायरचे आहे. हेटमायरने मॅच फिनिशरच्या भूमिकेत सर्वांना पूर्णपणे निराश केले.
आयपीएल 2025 च्या मेगा लिलावापूर्वी राजस्थान रॉयल्स संघाने त्यांच्या रिटेन केलेल्या खेळाडूंची यादी जाहीर केली तेव्हा त्यांनी वेस्ट इंडिजचा आक्रमक फलंदाज शिमरॉन हेटमायरलाही रिटेन केले. याच्यासाठी फ्रँचायझीने कॅरेबियन फलंदाजावर 11 कोटी रुपये खर्च केले. या हंगामात फ्रँचायझीला हेटमायरकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा होती, परंतु त्याने अपेक्षाभंग केला.
हेटमायरने 11 सामने खेळले ज्यामध्ये त्याला 10 डावांमध्ये फलंदाजीची संधी मिळाली. यात तो 20.78 च्या सरासरीने फक्त 187 धावा करू शकला. यामध्ये फक्त एका अर्धशतकी खेळीचा समावेश राहिला.
11 सामन्यांपैकी काही सामन्यांमध्येच हेटमायरला सामना संपवण्याची संधी मिळाली, परंतु यातही तो अपयशी ठरला. ज्यामुळे राजस्थानने विजयाच्या उंबरठ्यावर पोहचूनही अगदी कमी धावांच्या फरकाने सामने गमावले. आता आरआर आयपीएलच्या पुढील हंगामासाठी लिलावापूर्वी हेटमायरला कायम ठेवण्याचा निर्णय घेते की त्याला रिलीज करते हे पाहणे मनोरंजक ठरेल.