

IPL 2025 Kuldeep Yadav slaps Rinku Singh Viral Video
दिल्ली : दिल्ली कॅपिटल्स आणि कोलकाता नाईट रायडर्स (केकेआर) यांच्यात मंगळवारी झालेल्या आयपीएल सामन्यानंतर कुलदीप यादवने कोलकाता नाईट रायडर्सचा खेळाडू रिंकू सिंहला एकामागून एक अशा दोन थप्पड मारल्या. हरभजन सिंग आणि श्रीशांत यांच्या बहुचर्चित थप्पड मारण्याच्या घटनेसारखी ही घटना नव्हती, परंतु दुसऱ्या थप्पडीनंतर रिंकू संतापला. याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर बीसीसीआयकडे कुलदीपवर बंदी घालण्याची मागणी सोशल मीडियावर केली जात आहे.
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये कुलदीप यादव, रिंकू सिंह आणि इतर काही खेळाडू सामन्यानंतर हसताना आणि विनोद करताना दिसत आहेत. अचानक कुलदीप यादवने रिंकूच्या गालावर थप्पड मारली. त्याला जोरदार धक्का बसतो आणि तो कुलदीपकडे पाहतो. त्यानंतर कुलदीप पुन्हा त्याला थप्पड मारतो. यावेळी रिंकू काहीसा रागाने त्याच्याकडे पाहतो आणि काहीतरी म्हणतो. कुलदीपच्या या कृतीवर रिंकू खूप संतापलेला दिसत आहे. पुढे काय झाले ते व्हिडिओमध्ये नाही. व्हिडिओला आवाज नाही, त्यामुळे तिथे नेमकी काय चर्चा सुरू होती हे समजणे कठीण आहे.
कोलकाता नाईट रायडर्सने 'आयपीएल २०२५'मध्ये मंगळवारी दिल्ली कॅपिटल्सवर १४ धावांनी विजय मिळवून पॉईंट टेबलचे गणित रंजक बनवले आहे. फाफ ड्युप्लेसिस व अक्षर पटेल ही जोडी मैदानावर असेपर्यंत दिल्ली कॅपिटल्सला विजयाची आशा होती; पण सुनील नारायणने त्याच्या दोन षटकांत ३ विकेटस् घेऊन मॅच फिरवली आणि त्यानंतर वरुण चक्रवर्तीने सलग दोन विकेटस् घेऊन मॅच 'केकेआर'च्या बाजूने पूर्णपणे झुकवली. या पराभवामुळे १४ गुणांसह दुसऱ्या क्रमांकावर पोहोचायचे स्वप्न बघणारा दिल्ली कॅपिटल्स संघ गुणतालिकेत १२ गुणांवरच मधल्यामध्ये लटकला आहे.