ipl 2025 rcb vs csk who is ayush mhatre
मुंबई : आरसीबीविरुद्ध अवघ्या 48 चेंडूत 94 धावा काढल्यानंतर सीएसकेचा युवा सलामीवीर आयुष म्हात्रे अचानक चर्चेत आला आहे. या तरुण फलंदाजाचा जन्म 16 जुलै 2007 रोजी मुंबईत झाला. सध्या तो 17 वर्षांचा आहे. सीएसकेच्या या युवा स्टार खेळाडूची कहाणी राजस्थान रॉयल्सच्या युवा खेळाडू वैभव सूर्यवंशीसारखीच आहे. आरसीबीविरुद्धच्या धमाकेदार खेळीनंतर सर्वांना त्याच्याबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता आहे.
काही दिवसांपूर्वीच मुंबईतील आयुष म्हात्रेचा एक जुना व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. हा हिडिओ चित्रीत करण्यात आला त्यावेळी आयुष फक्त सहा वर्षांचा होता. त्या काळात, क्रिकेट खेळण्याचे स्वप्न घेऊन, तो सरावासाठी दररोज विरार ते चर्चगेट सुमारे 80 किमी प्रवास करत असे.
या युवा स्टारने नुकतेच वयाच्या 17 व्या वर्षी मुंबईचे प्रतिनिधित्व करताना प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये शतक झळकावले, ज्यामुळे तो जागतिक स्तरावर आपली छाप पाडण्यास उत्सुक असल्याचे क्रिकेट चाहत्यांना दिसून आले. 2024 मध्येच, त्याने लिस्ट ए क्रिकेटमध्ये 117 चेंडूत 181 धावा केल्या आणि विजय हजारे ट्रॉफीमध्ये 150+ धावा करणारा सर्वात तरुण खेळाडू ठरला.
सध्या आयपीएलचा 18वा हंगाम सुरू आहे. या हंगामापूर्वी 2024 मध्ये पार पडलेल्या आयपीएलच्या मेगा लिलावामध्ये म्हात्रेला कोणत्याही संघाने खरेदी केले नव्हते. पण नियतीने काहीतरी वेगळेच ठरवले होते. सीएसकेचा कर्णधार ऋतुराज गायकवाड जखमी झाल्यानंतर तो संपूर्ण स्पर्धेतून बाहेर पडला. धोनीकडे संघाच्या नेतृत्वाची जबाबदारी सोपवण्यात आली. दरम्यान, गायकवाडच्या जागी आयुष म्हात्रेची वर्णी लागली. या संधीचे सोने करत युवा आयुषनेही दमदार प्रदर्शन केले. त्याने त्याच्या पहिल्याच आयपीएल सामन्यात फक्त 15 चेंडूत 32 धावांची झटपट खेळी केली.
आयुष त्याच्या प्रतिभेने आणि आक्रमक फलंदाजीच्या शैलीने सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. त्यांचा जन्म 16 जुलै 2007 रोजी मुंबईतील विरार येथे झाला. तो उजव्या हाताने फलंदाजी सह तर ऑफ-ब्रेक गोलंदाजी करतो. स्थानिक क्रिकेटमध्ये तो मुंबई संघाकडून खेळतो.
आयुष म्हात्रे याने अगदी लहान वयातच आपल्या क्रिकेट कारकिर्दीला सुरुवात केली. त्याचे आजोबा लक्ष्मीकांत नाईक यांनी त्याची प्रतिभा ओळखली आणि त्याला मुंबईतील प्रतिष्ठीत अशा वेंगसरकर क्रिकेट अकादमीमध्ये प्रवेश मिळवून दिला. आयुषने वयाच्या 6 व्या वर्षी क्रिकेट खेळायला सुरुवात केली, पण त्याचे खरे क्रिकेट 10 वर्षांचे असताना सुरू झाले.
आयुष म्हात्रेने त्याच्या कारकिर्दीत अनेक विक्रम केले आहेत. लिस्ट ए क्रिकेटमध्ये 150 पेक्षा जास्त धावा करणारा सर्वात तरुण खेळाडू होण्याचा विक्रम त्याच्या नावावर आहे.
प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये 9 सामन्यांमध्ये 504 धावा. यात 2 शतके आणि एका अर्धशतकाचा समावेश.
लिस्ट-ए क्रिकेटमध्ये 7 सामन्यांमध्ये 458 धावा. यात 2 शतके आणि एका अर्धशतकाचा समावेश.