स्पोर्ट्स

Karun Nair No More Chance : करुण नायरच्या ‘दुसऱ्या संधी’चा अंत? इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या कसोटीसाठी संघात बदलाचे वारे

मॅन्चेस्टर कसोटीत भारतीय संघात एकमेव बदल निश्चित, साई सुदर्शनला संधी मिळण्याचे संकेत

रणजित गायकवाड

Karun Nair vs Sai Sudarshan IND vs ENG 4th test

इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या कसोटी सामन्यासाठी भारतीय संघातील करुण नायरचे स्थान धोक्यात आले असून, त्याच्या जागी साई सुदर्शनला संधी मिळण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. ओल्ड ट्रॅफर्ड येथे 23 जुलैपासून सुरू होणाऱ्या या सामन्यात, तिसऱ्या क्रमांकावर हा एकमेव बदल अपेक्षित आहे. पाच सामन्यांच्या मालिकेत आपले आव्हान टिकवण्यासाठी भारताला हा सामना जिंकणे अत्यंत आवश्यक आहे.

आठ वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर कसोटी संघात पुनरागमन करणाऱ्या करुण नायरला या दौऱ्यातील सहा डावांमध्ये चांगली सुरुवात मिळाली, परंतु त्याला मोठ्या धावसंख्येत रूपांतर करण्यात अपयश आले. तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करताना, विशेषतः ड्राईव्ह खेळताना त्याने आपल्या फॉर्मची झलक दाखवली, मात्र आखूड टप्प्यावरून उसळणाऱ्या चेंडूंना सामोरे जाताना तो संघर्ष करताना दिसला. लॉर्ड्स कसोटीच्या दुसऱ्या डावात ब्रायडन कार्सच्या इनस्विंग चेंडूवर बॅट उचलून बाद झाल्याने, त्याच्या निर्णयक्षमतेवर आणि आत्मविश्वासावर अधिक प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

भारत या मालिकेत सध्या 1-2 ने पिछाडीवर आहे. चौथ्या कसोटीला एक आठवड्याचा अवधी मिळाला आहे. दरम्यान, संघ व्यवस्थापन आपल्याकडील पर्यायांचा विचार करत आहे. त्यामुळे मॅन्चेस्टरच्या ओल्ड ट्रॅफोर्ड मैदानावरील कसोटीत 33 वर्षीय नायरच्या जागी 23 वर्षीय साई सुदर्शनला संधी मिळण्याची शक्यता आहे आणि हा एकमेव बदल असू शकतो.

सुदर्शनने आपल्या पदार्पणाच्या सामन्यात फारशी चूक केली नसतानाही, आठव्या क्रमांकावर अतिरिक्त फलंदाजाला संधी देण्यासाठी त्याला संघाबाहेर ठेवण्यात आले होते. आता मालिकेत बरोबरी साधण्याचे आव्हान असल्याने, संघ व्यवस्थापन युवा खेळाडूंवर विश्वास दाखवण्यास तयार असल्याची चर्चा आहे.

मालिकेत अजून दोन कसोटी सामने शिल्लक असताना, एक अधिक स्थिर आणि आत्मविश्वासू फलंदाजी क्रम मँचेस्टरमध्ये मालिकेत बरोबरी साधण्यास मदत करेल, अशी आशा भारतीय संघ व्यवस्थापनाला असेल.

मँचेस्टर कसोटीसाठी साई सुदर्शनला पसंती मिळण्याची शक्यता

भारताचा माजी यष्टीरक्षक आणि सध्या समालोचन करणारा दीप दासगुप्ता याने साई सुदर्शनला संधी देण्याच्या निर्णयाचे समर्थन केले आहे. दासगुप्ताच्या मते, ‘अंतिम 11 खेळाडूंच्या संघात एकापेक्षा जास्त बदल अपेक्षित नाहीत. जर एकच बदल करायचा असेल, तर तो करुण नायरच्या जागी साई सुदर्शनला संधी देण्याचा असेल. कारण नायरच्या बॅटमधून धावांच्या अपेक्षांची पुर्तता झालेली नाही, त्याला सुरुवात चांगली मिळाली, पण तो मोठी धावसंख्या करू शकला नाही. तो खेळपट्टीवर तितका सहज दिसत नाही. त्यामुळे भविष्याचा विचार करता साई सुदर्शनला अधिक संधी देणेच योग्य ठरेल.’

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT