

virat kohli reach 900+ rating points of all formats in icc rankings
भारतीय क्रिकेटचा दिग्गज फलंदाज विराट कोहलीने आपल्या शानदार कारकिर्दीत आणखी एक मानाचा तुरा रोवला आहे. टी-20 आणि कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीचा निर्णय घेतला असला तरी, जाता जाता त्याने एक असा विश्वविक्रम प्रस्थापित केला आहे, जो क्रिकेटच्या इतिहासात यापूर्वी कधीही घडला नव्हता. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने नुकत्याच जाहीर केलेल्या ताज्या क्रमवारीनुसार, कोहलीच्या नावे या अद्वितीय कामगिरीची नोंद झाली आहे. यासह तो जागतिक क्रिकेटच्या शिखरावर विराजमान झाला आहे.
विराट कोहली कसोटी, एकदिवसीय आणि टी-20 या तिन्ही प्रकारांमध्ये 900 पेक्षा जास्त रेटिंग मिळवणारा जगातील पहिला आणि एकमेव खेळाडू ठरला आहे. हा एक असा टप्पा आहे, जो आजपर्यंत जगातील इतर कोणत्याही फलंदाजाला गाठता आलेला नाही.
कोहलीने कसोटीत त्याच्या कारकिर्दीच्या सर्वोच्च शिखरावर असताना 937 रेटिंग गुण मिळवले होते. तर एकदिवसीय क्रिकेटमध्ये त्याचे सर्वाधिक रेटिंग 911 राहिले आहे. नुकत्याच जाहीर झालेल्या क्रमवारीत टी-20 त्याने 897 रेटिंग वरून 909 चा आकडा गाठला आहे. हा ऐतिहासिक विक्रम आहे. ही कामगिरी कोहलीचे सातत्य आणि तिन्ही प्रकारांमधील त्याचे वर्चस्व दर्शवते.
टी-20 च्या बाबतीत बोलायचे झाल्यास, कोहली या प्रकारात 900 रेटिंगचा टप्पा ओलांडणारा जगातील पाचवा आणि सूर्यकुमार यादवनंतरचा दुसरा भारतीय खेळाडू आहे. या प्रतिष्ठित यादीत समाविष्ट असलेले इतर खेळाडू खालीलप्रमाणे :
डेव्हिड मलान (इंग्लंड): 919 रेटिंग
सूर्यकुमार यादव (भारत) : 912 रेटिंग
विराट कोहली (भारत) : 909 रेटिंग
ॲरॉन फिंच (ऑस्ट्रेलिया) : 904 रेटिंग
बाबर आझम (पाकिस्तान) : 900 रेटिंग
कसोटी आणि टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर, चाहते आता विराट कोहलीला पुन्हा मैदानात पाहण्यासाठी आतुरतेने वाट पाहत आहेत. ऑगस्टमध्ये बांगलादेशविरुद्ध होणारी एकदिवसीय मालिका रद्द झाल्यामुळे, आता ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील एकदिवसीय मालिकेत कोहली भारतीय जर्सीमध्ये दिसेल, अशी दाट शक्यता आहे. एकदिवसीय प्रकारातही त्याचा हा उत्कृष्ट फॉर्म कायम राहील, अशी अपेक्षा चाहत्यांना नक्कीच असणार आहे.