Cricket Included in Asian Games 2026
नवी दिल्ली : आशियाई क्रीडा महासंघाने आगामी आशियाई क्रीडा स्पर्धेत पुन्हा एकदा क्रिकेटचा समावेश करण्याचा निर्णय घेतला असून, या निर्णयामुळे क्रिकेटप्रेमींमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. या स्पर्धेत पुरुष आणि महिलांच्या टी-20 प्रकारातील सामने आयोजित करण्यात येणार आहेत.
अगामी आशियाई क्रीडा स्पर्धा 2026 चे आयोजन जपानच्या आइची आणि नागोया या शहरांमध्ये 19 सप्टेंबर ते 4 ऑक्टोबर दरम्यान होणार आहे. स्पर्धेतील खेळांचा अंतिम कार्यक्रम निश्चित करण्यासाठी सोमवारी (28 एप्रिल) नागोया सिटी हॉल येथे AINAGOC संचालक मंडळाची 41वी बैठक पार पडली. यामध्ये क्रिकेट आणि मिक्स्ड मार्शल आर्ट्स या दोन्ही खेळांना औपचारिक मान्यता देण्यात आली.
2023 साली चीनमधील हांगझोऊ येथे झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत पहिल्यांदाच टी-20 क्रिकेटचा समावेश करण्यात आला होता. भारत, पाकिस्तान, श्रीलंका, बांगलादेश आणि अफगाणिस्तान यांसारख्या आशियाई क्रिकेट संघांनी त्यामध्ये सहभाग घेतला होता. भारताच्या महिला आणि पुरुष संघांनी या स्पर्धेत सुवर्णपदकाची कमाई करत मोठे यश मिळवले होते.
क्रिकेट हा आशियाई देशांमध्ये अत्यंत लोकप्रिय खेळ मानला जातो. त्यामुळे या खेळाचा पुन्हा समावेश करण्यात आल्यामुळे आशियाई क्रीडा स्पर्धांची रंगत आणि लोकांची रुची आणखी वाढेल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे. यासोबतच उदयोन्मुख खेळाडूंनाही आंतरराष्ट्रीय मंचावर स्वतःला सिद्ध करण्याची संधी मिळणार आहे. या निर्णयामुळे भारतासारख्या देशांना त्यांच्या क्रिकेट वर्चस्वाचे पुन्हा एकदा प्रदर्शन करण्याची नामी संधी मिळणार आहे. यासोबतच क्रिकेटच्या प्रसार व विकासालाही चालना मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये पुन्हा एकदा क्रिकेटचा समावेश करण्याचा निर्णय केवळ क्रीडा क्षेत्रासाठीच नव्हे, तर आशियाई संस्कृतीतील एक महत्त्वाचा टप्पा ठरतो. क्रिकेट या खेळाने गेल्या काही दशकांत आशियात केवळ लोकप्रियता मिळवली नाही, तर तो अनेकांसाठी प्रेरणा, एकी आणि राष्ट्रीय अभिमानाचे प्रतीक ठरला आहे. क्रिकेटच्या माध्यमातून आशियाई देशांमध्ये वाढत असलेले सहकार्य, प्रतिस्पर्धा आणि युवा पिढीला मिळणारे व्यासपीठ हे या निर्णयामागचे खरे यश आहे.
क्रिकेट हा खेळ आता केवळ ‘बॅट-बॉलचा सामना’ राहिलेला नाही. तो आर्थिक गुंतवणूक, प्रेक्षकांची ओढ, प्रसारण हक्क, आणि देशाच्या सॉफ्ट पॉवरचा भाग झाला आहे. त्यामुळेच अशा स्तरावरील स्पर्धांमध्ये क्रिकेटचा समावेश म्हणजे देशाच्या क्रीडा क्षेत्रातील धोरणात्मक यश देखील म्हणता येईल.
पण यात केवळ लोकप्रियता पाहून निर्णय घेणे पुरेसे नाही. क्रिकेटमध्ये अग्रेसर असणा-या देशांची आता जबाबदारी वाढली आहे. त्यांनी केवळ यशासाठीच नाही तर नवोदित राष्ट्रांना प्रशिक्षणे, मैत्रीपूर्ण सामने व संधी देऊन खेळाचा खरा प्रसार करण्यावरही भर देणे गरजेचे आहे. कारण जर क्रिकेटने आशियात नवे स्वप्न उभे केले, तर ते सर्वांसाठी समान संधी देणारे असायला हवे. या निर्णयामुळे आशियाई क्रीडा स्पर्धा अधिक व्यापक, गतिमान आणि जनतेशी जोडल्या जातील, यात शंका नाही. पण याचा लाभ फक्त पदकांपुरता मर्यादित न राहता, तर क्रिकेट संस्कृतीच्या विकासासाठीही व्हायला हवा. तेव्हाच या समावेशाचा खरा अर्थ साध्य होईल.