

IPL 2025 KKR Andre Russell Bowling
कोलकाता : पॉवर-हिटिंगसाठी प्रसिद्ध असलेल्या आंद्रे रसेलने आयपीएल 2024 मध्ये आपल्या जबरदस्त गोलंदाजीनेच खऱ्या अर्थाने कोलकाता नाईट रायडर्सच्या विजयी मोहीमेचा पाया रचला. त्या मोसमात त्याने 19 विकेट्स घेतल्या. हा त्याचा आयपीएलच्या कोणत्याही हंगामातील सर्वोत्तम आकडा! त्याने या स्पर्धेत 10.06 चा इकॉनॉमी रेट प्रशंसनीय ठरला. विशेष म्हणजे, रसेलचा 15 किंवा त्याहून अधिक विकेट्स घेतलेल्या 232 गोलंदाजांमध्ये थक्क करणारा 9.26 चा स्ट्राइक रेट संपूर्ण आयपीएल इतिहासात सर्वांत सर्वोत्तम आहे.
मागच्या हंगामात प्रत्येक सामन्यात गोलंदाजी करणाऱ्या रसेलला यंदा केवळ पाच सामन्यांत हाताळण्यात आले, तरीही त्याने 10.3 षटकांत 7 बळी टिपत जबरदस्त प्रभाव टाकला आहे. 2024 पासून आयपीएलमध्ये किमान 10 षटके टाकलेल्या 102 गोलंदाजांमध्ये त्याचा स्ट्राइक रेट सर्वोत्तम आहे. यंदाच्या हंगामात त्याच्या हाती चेंडू का सोपवला जात नाहीय? विशेषतः केकेआरची मोहीम धोक्यात असताना या मुद्यावरून आश्चर्य व्यक्त होत आहे.
शनिवारी (26 एप्रिल) पंजाबविरुद्धच्या सामन्यात 12व्या षटकात रसेलला गोलंदाजीस आणले गेले आणि त्याने लगेच 120 धावांची सलामी फोडत सामन्याला कलाटणी दिली. त्याची 3 षटकांत 27 धावांत 1 बळी ही कामगिरी यजमानांसाठी महत्त्वाची ठरली. पंजाब किंग्सने मधल्या टप्प्यात 11.67 च्या वेगाने धावा काढल्या होत्या, पण अखेरच्या पाच षटकांत केवळ 2 बाद 40 धावा करता आल्या. त्याच्या मागच्या सामन्यातही रसेलने आपल्या एकमेव षटकात साई सुदर्शनला बाद करत 114 धावांची मोठी भागीदारी मोडली होती.
केकेआरने 2024 मध्ये मधल्या षटकांतही वर्चस्व राखले होते. त्यावेळी या संघाने 49 विकेट्स, 20.93 च्या सरासरीने, आणि 36.9 टक्के डॉट बॉल्स टाकले होते. सहा गोलंदाजांनी 10 पेक्षा अधिक विकेट्स घेतल्या आणि त्यात रसेल हा एकमेव वेगवान गोलंदाज होता. आता प्रश्न असा आहे की, केकेआरसाठी संकटसमयी कामगिरी करणाऱ्या रसेलला अधिक संधी का दिल्या जात नाहीत?
रसेलने आयपीएल 2024 मध्ये आपल्या भेदक मा-याने सर्वांचे लक्ष वेधले होते. त्या हंगामात घेतलेल्या 19 विकेट्समध्ये अनेक निर्णायक क्षण सामावले होते. पहिल्याच सामन्यात, हैदराबादविरुद्ध (SRH) चार धावांनी मिळालेल्या थरारक विजयात, रसेलने अभिषेक शर्मा आणि अब्दुल समद यांना योग्य वेळी तंबूत धाडले होते. ज्यामुळे केकेआरला दोन गुण मिळाले होते. त्यानंतर तो आरसीबीविरुद्ध आणखी चमकला. सेट झालेल्या रजत पाटीदार आणि विल जॅक्ससह दिनेश कार्तिकलाही माघारी धाडत त्याने केकेआरला आणखी दोन महत्त्वाचे गुण मिळवून दिले होते.
मुंबई इंडियन्सविरुद्ध (MI) रसेलने दोन सामन्यांत अनुक्रमे 2/30 आणि 2/34 अशी प्रभावी कामगिरी केली. दोन्ही वेळा सूर्यकुमार यादवची शिकार त्यानेच केली. ज्यामुळे केकेआरला मुंबई इंडियन्सला दशकभरानंतर वानखेडेवर धूळ चारण्यात यश आले. त्या हंगामात रसेलने कॅमेरून ग्रीन, केएल राहुल, निकोलस पूरन, मार्कस स्टॉइनिस, हार्दिक पंड्या, टिम डेविड आणि एडन मार्करम यांसारख्या दिग्गज फलंदाजांनाही पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला होता. तर फायनलमध्ये मिशेल स्टार्क आणि वैभव अरोरा यांच्या जबरदस्त सुरुवातीनंतर रसेलने 3/19 अशी अफलातून गोलंदाजी करत केकेआरचा विजयी जल्लोष पूर्ण केला होता.