

मुंबई : आयपीएलचा 18वा हंगाम सध्या सुरू आहे. स्पर्धा चुरशीची होत आहे. काही संघ पुढे निघाले असून आता जेतेपद जिंकण्याच्या शर्यतीत दावेदार ठरले आहेत. तर काही संघ मागे पडले आहेत. त्यांच्यासाठी हा हंगाम जवळपास संपुष्टात आला आहे. दरम्यान, बीसीसीआय दोन वर्षांनंतर, म्हणजेच 2028 च्या आयपीएलपासून मोठे बदल करणार असल्याची माहिती समोर आली आहे.
2025च्या आयपीएलमध्ये एकूण 74 सामने खेळवले जाणार आहेत. 2026 आणि 2027 च्या आयपीएलमध्येही तेवढेच सामने खेळवले जातील, ज्यात अंतिम सामनाही समाविष्ट आहे. 2028 मध्ये आयपीएलचा 21 वा हंगाम रंगणार आहे. यामध्ये सामन्यांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) आयपीएल सामन्यांची संख्या वाढवण्याचा सक्रियपणे विचार करत आहे. 2028 च्या हंगामापासून आयपीएल सामन्यांची संख्या 74 वरून 94 पर्यंत वाढवली जऊ शकते. बीसीसीआय यासाठी प्रयत्नशील असल्याचे समोर आले आहे. आयपीएलचे चेअरमन अरुण सिंह धूमल यांनी याबाबत संकेत दिले असून, सर्व संघ प्रत्येक संघाविरुद्ध दोनदा (घरच्या आणि बाहेरच्या मैदानावर) खेळतील, ज्यामुळे प्रत्येक संघाला 18 साखळी सामने खेळावे लागतील. तथापि, नजीकच्या भविष्यात कोणत्याही नवीन संघाला किंवा फ्रँचायझीला संधी मिळण्याची योजना नसल्याचेही समजते आहे.
2022 पासून आयपीएलमध्ये 74 सामन्यांचा फॉरमॅट सुरू आहे. यामध्ये प्रत्येक संघांना घरच्या मैदानावर सात सामने आणि इतर मैदानावर सात सामने खेळण्याची संधी मिळते. याच वर्षापासून गुजरात टायटन्स आणि लखनौ सुपर जायंट्स दोन संघ आयपीएलमध्ये दाखल झाले. दरम्यान, 2025 च्या हंगामापासून 84 सामन्यांचे आयपीएल आयोजित करण्याची योजना होती, पण आंतरराष्ट्रीय कॅलेंडर लक्षात घेता, ते 74 सामन्यांपुरते मर्यादित ठेवावे लागले. मात्र, 2028च्या हंगामापासून प्रत्येक संघांना घरच्या मैदानावर आणि बाहेर 9-9 सामने खेळण्याची तरतूद केली जाऊ शकते. ज्यामुळे सामन्यांची एकूण संख्या 94 पर्यंत जाऊ शकते.
खरंतर, आयपीएल ही जगातील एकमेव स्पर्धा आहे ज्यासाठी आयसीसीकडून एक खास परवानगी दिली जाते. जर सामन्यांची संख्या वाढवायची असेल तर आयसीसीशी बोलून आयपीएलची कालमर्यादा वाढवावी लागेल. बीसीसीआयचा प्रयत्न असा आहे की सर्व संघ एकमेकांशी दोनदा सामना करतील. एक सामना घरच्या मैदानावर तर दुसरा सामना बाहेरच्या मैदानावर खेळला जावा, अशी योजना आहे.
बीसीसीआयकडून सामन्यांची संख्या वाढवण्याचा प्रस्ताव पुढे गेल्यास त्यासाठी ब्रॉडकास्टरशीही चर्चा करावी लागेल. खरंतर, आयपीएलच्या मध्यंतरात प्रेक्षकांचा उत्साह काहीसा कमी होतो. तीन महिन्यांहून अधिक काळ चालणाऱ्या आयपीएलला प्रेक्षक कितपत पाठिंबा देतील, हे येणारा काळच ठरवेल. यंदाच्या आयपीएलबाबत धूमल खूप समाधानी आहेत आणि त्यांनी असेही म्हटले की, यावेळी नवीन विजेता मिळाला तर ती चांगली गोष्ट असेल. दिल्ली कॅपिटल्स, रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरु आणि पंजाब किंग्स यांनी आतापर्यंत एकदाही आयपीएलचे जेतेपद पटकावलेले नाही. यावेळी हे तीनही संघ आपापली दावेदारी सादर करत आहेत. लखनऊ सुपर जायंट्सनेही आतापर्यंत आयपीएल जिंकलेले नाही, पण यावेळी हा संघ बराच मागे आहे. तरीही त्यांच्या संधी पूर्णपणे संपलेल्या नाहीत.