पुढारी ऑनलाईन डेस्क : राज्यसभेच्या ६ जागांसाठी शुक्रवारी (दि.१०) मतदान होत आहे. दरम्यान, मनी लॉड्रींग प्रकरणी अटकेत असणारे राष्ट्रवादीचे माजी मंत्री नवाब मलिक आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना मतदान करण्यास परवानगी नाकारण्यात आली. याबाबतचा निर्णय मुंबईच्या विशेष पीएमएलए न्यायालयाने आज दिला. त्यामुळे महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला आहे. पीएमएलए न्यायालयाचे विशेष न्यायाधिश राहुल रोकडे यांनी नवाब मलिक आणि अनिल देशमुख यांचे उद्या होणाऱ्या राज्यसभा निवडणुकीसाठी मतदान करण्याची परवानगी मागणारे अर्ज फेटाळून लावले आहेत. दोघांनाही परवानगी नाकारल्याने महाविकास आघाडीची दोन मते कमी पडणार आहेत.
या निर्णया विरोधात देशमुख आणि मलिक उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. उच्च न्यायालय त्यावर उद्या सुनावणी घेण्याची शक्यता आहे. उच्च न्यायालय काय निर्णय देणार यावर या दोघांच्या मतदान करण्याचा फैसला अवलंबून आहे
राज्यसभा निवडणूकीत 6 जागांवर 7 उमेदवार रिंगणात उतरले असल्यामुळे निवडणूक बिनविरोध होणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. 10 जूनला होणार्या या निवडणूकीच्या रणधुमाळीसाठी भाजपसह मविआला आपल्या पक्षातील आमदारांसह अन्य पक्षांवर अवलंबून रहावे लागणार आहे. या निवडणूकीत मतदानाचा हक्क बजावता यावा म्हणून कारागृहात असलेल्या माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि राष्ट्रवादीचे मंत्री नवाब मलिक यांनी मुंबई सत्र न्यायालयातील विशेष न्यायालयात मतदान बजावण्याची परवानगी देण्यात यावी, अशी मागणी करणारे स्वतंत्र अर्ज दाखल केले आहेत.
या अर्जांवर न्यायाधीश राहुल रोकडे यांच्यासमोर बुधवारी सुनावणी झाल्यानंतर न्यायालयाने निर्णय राखून ठेवला होता. तो आज जाहीर करताना दोघांचे अर्ज फेटाळून लावले. दरम्यान सत्र न्यायालयाच्या निर्णया विरोधात मलिक व देशमुख यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली असून न्यायमूर्ती प्रकाश नाईक यांच्या समोर तातडीने सुनावणी होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, राज्यसभेच्या ६ जागांसाठी शुक्रवारी मतदान होणार असताना मंगळवारी महाविकास आघाडीने शक्तिप्रदर्शन केले. हॉटेल ट्रायडेंटमध्ये झालेल्या बैठकीला शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या आमदारांबरोबरच महाविकास आघाडीला पाठिंबा देणारे अपक्ष आणि छोट्या पक्षांचे 13 आमदार हजर होते. या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी चारही जागा जिंकण्याचा विश्वास व्यक्त केला.
राज्यसभा निवडणूक बिनविरोध करण्याचे प्रयत्न फसल्यानंतर महाविकास आघाडीने आपल्या चारही जागा जिंकण्यासाठी जोरदार फिल्डिंग लावली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोमवारी शिवसेना आमदार आणि पाठिंबा देणार्या अपक्ष आमदारांची बैठक घेऊन चाचपणी केली होती. मंगळवारी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आपल्या बॅगा घेऊन मुंबईत दाखल झाले. तिन्ही पक्षांच्या आमदारांची एकत्रित बैठक रात्री ट्रायडेंट हॉटेलमध्ये झाली.
भाजपने आमदारांना आमिष दाखविण्याचा आणि दबावतंत्राचा वापर करण्याचा प्रयत्न केला असला तरी तो यशस्वी होणार नाही, असे उद्धव ठाकरे म्हणाले; तर शरद पवार यांनी मतदानाच्या तांत्रिक बाजू समजून घेऊन मतदान करण्याच्या व त्यासाठी काटेकोर नियोजन करण्याच्या सूचना दिल्या.
2019 मध्ये सत्ता स्थापन करताना महाविकास आघाडीने अशाच प्रकारे एकत्र येत शक्तिप्रदर्शन केले होते. त्याची मंगळवारी पुनरावृत्ती केली आणि आमदारांमध्ये विश्वास भरला. या बैठकीला पाठिंबा देणारे छोटे पक्ष आणि अपक्ष आमदारही पोहोचल्याने विश्वास दुणावला आहे. बैठकीनंतर शिवसेनेचे आमदार ट्रायडेंटमध्येच मुक्कामी राहणार आहेत; तर राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचे आमदार पवईतील रेनीजोन्स या पंचतारांकित हॉटेलकडे रवाना झाले.
हेही वाचलंत का ?