

औरंगाबाद : पुढारी वृत्तसेवा : भाजप नेत्या व माजी मंत्री पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांना विधान परिषदेवर संधी न दिल्याने त्यांच्या समर्थकांमध्ये नाराजी आहे. त्यांच्या काही नाराज समर्थकांनी आज (दि.९) औरंगाबाद भाजप कार्यालयावर दगडफेक करत हल्ला केला. हल्लेखाेर समर्थकांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
या घटनेची माहिती मिळताच भाजपचे शहराध्यक्ष संजय केणेकर यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांनी कार्यालयात धाव घेतली. भाजप कार्यालयावर ल्ला झाला, पण हे कार्यकर्ते पंकजा मुंडे यांचे समर्थक असूच शकत नाहीत, भाजपचे काम व्यवस्थित सुरु आहे, त्यामुळे विरोधी पक्षांच्या काही लोकांना नैराश्य आले आहे, त्यामुळे या हल्ल्यामागे त्यांचा हात असण्याची शक्यता आहे, असेही केनेकर म्हणाले.
विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी भाजपने आपले उमेदवार जाहीर केले. या यादीतून पुन्हा एकदा पंकजा मुंडे यांचा पत्ता कट झाला आहे. विधान परिषदेचे विद्यमान विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, माजी मंत्री राम शिंदे, आमदार प्रसाद लाड, भाजपचे संघटन सरचिटणीस श्रीकांत भारतीय आणि प्रदेश महिला मोर्चाच्या अध्यक्षा उमा खापरे यांना संधी देण्यात आली आहे.
यावेळी विधान परिषदेसाठी भाजप पंकजा मुंडे यांना संधी देईल, अशी चर्चा होती. पंकजा मुंडे यांनीही पक्षाने संधी दिल्यास त्याचे सोनं करण्याचे संकेत दिले होते. मात्र त्यांच्या पदरी पुन्हा एकदा निराशा आली आहे. पाच जणांच्या यादीतून पंकजा मुंडे यांचे नाव कट करण्यात आले आहे. त्यामुळे त्यांच्य़ा समर्थकांमध्ये नाराजीचा सूर होता. यातून त्यांच्या समर्थकांनी भाजपच्या कार्यालयावर हल्ला केल्याचे सांगितले जात आहे.
हेही वाचलंत का ?