मनोरंजन

दुर्गाचं भावविश्व रंगवणारी मालिका लेक माझी दुर्गा

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क

असं म्हणतात "आयुष्याच्या पुस्तकातलं सर्वात सुंदर पान म्हणजे बालपण". बालपणावर आपण सगळ्यांनीचं बरंच काही ऐकलं आहे नाही का? जर, बालपणावर बोलायचं किंवा लिहायचं म्हटलं तर शब्द आणि वेळ दोन्ही अपुरं पडेल. पण, यामधील अविभाज्य घटक म्हणजे आई – वडील, त्यांना विसरून कसं चालेल. आई आणि मुलीचं हळूवार भावनिक नातं उलघडणारी हृदयस्पर्शी मालिका कलर्स मराठीवर घेऊन येत आहे. लेक माझी दुर्गा-जाणीव तिच्या अस्तित्वाची १४ फेब्रुवारीपासून दररोज संध्या ७.३०. वाजता. अग्रगण्य क्रिएशन्स निर्मित आणि अभिजीत गुरु लिखित लेक माझी दुर्गा मालिकेद्वारे हेमांगी कवी पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

या मालिकेद्वारे आई आणि मुलीच्या नात्या पलीकडे समाजामध्ये घडणाऱ्या, चर्चित आणि अतिशय नाजूक विषयाला एका वेगळ्याच प्रकारे प्रेक्षकांच्यासमोर आणण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. मालिकेमध्ये दुर्गाच्या भावविश्वात कुठेतरी वडिलांकडून तिला तुच्छ दर्जाची वागणूक मिळते आहे तर दुसरीकडे आईचे भरभरून प्रेम मिळते आहे. दुर्गाला आईच्या प्रेमापेक्षा तिच्या वडिलांच्या डोळ्यातील आग सलतेय. तिच्या या भावविश्वात तिला स्वत:च्या अस्तित्वासाठी का बरं संघर्ष करावा लागतो आहे? का तिला वडिलांकडून झिडकारलं जातं आहे? लवकरच या प्रश्नांची उत्तरं आपल्याला मिळणार आहेत.

बालपणातल्या आठवणी सोन्यासारख्या असतात ज्या आपल्यासोबत शेवटच्या क्षणापर्यंत असतात. ते म्हणतात जितकं आपलं बालपण सरल तितका पुढचा प्रवास सोपा. पण, सगळ्यांच बालपण इतकं सुंदर आणि मनाच्या कप्प्यात साठवून ठेवावं असं असतं का? सातार्‍या जवळच्या एका छोट्या गावात राहणार्‍या जगताप कुटुंबाच्या "दुर्गा" चे भावविश्व जरा इतर लहान मुलांपेक्षा वेगळं आहे. जिथे तिला खेळायला मोठं आंगण आहे, घरात प्रेम करणारी, माया देणारी आई आहे, प्रेमळ, खाऊ देणारा, सगळ्यांना प्रेम करणारा बाबा आहे.

दुरून जरी हे भावविश्व वा चित्र एकदम सुंदर दिसतं असलं तरीदेखील दुर्गाला मात्र एक प्रश्न सतत पडतो आहे माझा बाबा मला दूर का बरं ठेवतो ? माझ्यावर का प्रेम नाही करत ? मी इतकी वाईट आहे का ? तिच्या वडिलांच्या मते ती घराला लागलेली कीड आहे. त्यामुळे तिच्या वाटणीचे प्रेम, माया देखील दुसर्‍या मुलीला देत आहे. का बरं असा भेदभाव होत असेल ? या मालिकेमधून मनोरंजनासोबत समाजात सुरू असलेल्या चालीरीती, सत्यपरिस्थिति आणि बालपणीची निरागसता यांची सांगड घालत समाजिक संदेश देण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.

अभिजीत गुरु म्हणाले, बर्‍याच यशस्वी मालिकांचं लिखाण केल्यानंतर एक निर्माता म्हणून स्वत:ची मालिका बनवेन असं कधीच वाटलं नव्हतं. आज स्वत:साठी लिहायची संधी मिळाली आहे, आणि संधीच सोन करायचा मी नक्कीच प्रयत्न करेन. या मालिकेच्या नावावरून जे काही तुम्हाला वाटत असेल तसं अजिबात नाही. केवळ कव्हर बघून पुस्तकात काय लिहलय आहे त्याचा अंदाज बांधण चुकीचं आहे. विषय वेगळा आहे, आणि या मालिकेतून काहीतरी वेगळं देण्याचा प्रयत्न मी करणार आहे.

हेमांगी कवि म्हणाली, या मालिकेत मी वैजयंती "वैजु" नावाची भूमिका साकारते आहे जी दुर्गाची आई आहे. आपण नेहेमीच बघतो आई म्हंटल की, मायाळू, दयाळू, सोशिक, परिस्थितीला सांभाळून घेणार्‍या अश्याच असतात. पण ही आई अगदीच वेगळी आहे, वैजु परिस्थितीशी भांडणारी आहे. तिच्या लेकीच्या मार्गात काही अडथळे आले, विघ्न आले तर तिच्यासाठी ती दुर्गेसारखी उभी रहाणारी आहे. असे एक वेगळेपण आहे या आईमध्ये. अभिजीत गुरु यांनी खूप उत्तमरित्या हे पात्र उभं केलं आहे. अशाप्रकारच पात्र सकारण हे एक आव्हान आहे असं मला वाटतं. मी आशा करते रसिक प्रेक्षकांना आमची मालिका आवडेल.

मुलीच्या आयुष्यातील पहिला नायक म्हणजे तिचे बाबा. त्यांच्याच प्रेमापासून जर मुलगी दूर राहिली तर तिच्या मनात अनेक शंका घर करून बसतात. आई आणि वडिलांच्या हाताच्या ओंजळीत मुलं वाढतं, सुरक्षित राहतं. या ओंजळीतला एक हात जरी बाजूला झाला तर मुलं गोंधळतात. अशीच परिस्थिती आपल्या दुर्गावर देखील ओढवली आहे. का ती वडिलांच्या प्रेमापासून वंचित आहे? का तिचे वडील तिला दूर ढकलत आहेत? का दुर्गाला तिच्याच वडिलांचे कटू बोल ऐकावे लागत आहे ? काय आहे या मागचं कारण.

जाणून घेण्यासाठी बघा कलर्स मराठीवर १४ फेब्रुवारीपासून दररोज संध्या ७.३०. वा. आपल्या कलर्स मराठीवर. आणि याच दिवसापासून नक्की बघा आपली लाडकी मालिका बाळूमामाच्या नावानं चांगभलं मालिका नव्या वेळेत रात्री १०.३०वा. आपल्या कलर्स मराठीवर.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT