मराठी युवकांनो सावधान..! सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल; हिजाबप्रकरणी तटस्थ राहण्याचे आवाहन | पुढारी

मराठी युवकांनो सावधान..! सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल; हिजाबप्रकरणी तटस्थ राहण्याचे आवाहन

बेळगाव : पुढारी वृत्तसेवा
राज्यात हिजाब आणि भगव्या शेल्यांचा वाद रंगला आहे. संभाव्य धोका ओळखून सरकारने महाविद्यालयांना सुटी दिली आहे. प्रकरण न्यायालयात गेले तरी या विषयावर राजकारण सुरू झाले आहे. त्याचे बेळगावातही पडसाद उमटण्याची शक्यता आहे. त्यामुळे मराठी युवकांनो राजकारण्यांच्या पाठी लागू नका, या वादापासून तटस्थ राहा, न्यायालयाचा निर्णय सर्वांना बंधनकारक असेल, असे आवाहन करत मराठी युवकांनो सावधान, असे संदेश सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

सीमाभागातील मराठी युवकांना कर्नाटक सरकार आणि प्रशासन नेहमीच टार्गेट करत आले आहे. काही दिवसांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या विटंबनेविरोधात आंदोलन केले म्हणून राजद्रोह, खुनाचा प्रयत्न करणे असे गंभीर गुन्हे तब्बल 61 मराठी युवकांवर घालण्यात आले. 35 युवकांनी तब्बल 47 दिवस कारागृहात काढले आहेत. आता हिजाब आणि भगव्या शेल्यांचा वाद सुरू झाला आहे.

उडुपी, शिमोगा, मंड्या येथे हा वाद रंगला असून त्याची आंतरराष्ट्रीय पातळीवर चर्चा सुरू झाली आहे. प्रकरण न्यायालयात आहे. असे असले तरी काही पक्षांशी बांधील असलेल्या लोकांकडून शिमोगा, कुंदापूर येेथे हिजाबविरोधात युवक रस्त्यावर उतरत आहेत. बेळगावात कधी उतरणार, असा सवाल मराठीत करून मराठी युवकांना भडकवण्याचा प्रयत्न करत आहेत. पण, अनेक सुज्ञ मराठी युवकांनी आम्हाला हिंदूत्व शिकवू नये, प्रकरण न्यायालयात आहे. भगवा ध्वज आम्ही उभारला की आम्ही गुन्हेगार आणि तुम्ही उभारला की हिंदू, असे चालणार नाही. या प्रकरणी मराठी युवकांनी तटस्थ राहावे, न्यायालयाचा निर्णय सर्वांना बंधनकारक असेल. निर्णय घेण्यास सरकार सक्षम आहे, असा टोला हाणला आहे. यासंदर्भातील पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत असून मराठी युवकांनीही या धार्मिक वादापासून अलिप्‍त राहण्याचाच निर्णय घेतल्याचे दिसून येत आहे.

निवडणूक डोळ्यासमोर ठेवून..?

आगामी दीड वर्षात विधानसभा निवडणुका होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मराठी युवकांना धर्माच्या नावावर आपल्याकडे खेचण्याचा काहींकडून प्रयत्न होत आहे. पण, अशा प्रकारांना युवक खतपाणी घालत नसल्याचे दिसून येत असून यावर सोशल मीडियावर चर्चा रंगत आहेत.

हेही वाचलंत का? 

Back to top button