मंगळावर दिसला एलियन? छायाचित्र आले समोर | पुढारी

मंगळावर दिसला एलियन? छायाचित्र आले समोर

वॉशिंग्टन : पृथ्वीशिवाय अन्यत्र जीवसृष्टी आहे की नाही हे अद्यापही विज्ञानाला समजलेले नाही. मात्र, तरीही अन्य ग्रहांवर एलियन्स म्हणजेच परग्रहवासी असल्याचे दावे केले जात असतात. आता अशाच एक ‘यूफो एक्स्पर्ट’ने दावा केला आहे की ‘नासा’च्या क्युरिऑसिटी रोव्हरने पाठवलेल्या मंगळभूमीवरील एका छायाचित्रात छोट्या आकाराच्या एलियनचीही प्रतिमा आहे. एका शिळेवर पहुडलेला हा एलियन एक फूट उंचीचा असल्याचेही त्याचे म्हणणे आहे.

सध्या मंगळभोवती अनेक ऑर्बिटर फिरत आहेत आणि प्रत्यक्ष मंगळभूमीवरही अनेक रोव्हर फिरत आहेत. त्यापैकीच एक असलेल्या क्युरिऑसिटीने मंगळभूमीची जी छायाचित्रे पाठवलेली आहेत त्यापैकी एका छायाचित्राचे विश्लेषण करून स्कॉट सी. वरिंग या ‘यूफो’ तज्ज्ञाने हा दावा केला आहे. मंगळावर शंभर टक्के जीवसृष्टीचे अस्तित्व असल्याचेही त्यांचे म्हणणे आहे.

त्यांनी म्हटले आहे की पृथ्वीवासीयांपेक्षाही अधिक बुद्धिमान जीव मंगळावर आहेत. स्कॉट यांनी क्युरिऑसिटीने पाठवलेल्या काही छायाचित्रांचे बारकाईने निरीक्षण केले आहे. संबंधित छायाचित्रात एक एलियन दगडावर आरामात झोपून पृथ्वीवासीयांच्या या मार्स रोव्हरला पाहत आहे. हा एक गुलाबी रंगाचा व एक फूट लांबीचा एलियन असल्याचेही त्यांचा दावा आहे. स्कॉट यांनी म्हटले आहे की ‘नासा’ने हे छायाचित्र एप्रिल 2021 मध्ये प्रसिद्ध केले होते. 3 फेब—ुवारी 2022 ला आपण या छायाचित्राचे विश्लेषण पूर्ण केले, असेही त्यांनी सांगितले.

Back to top button