मनोरंजन

‘ड्यून’ला सहा ऑस्कर पुरस्कार ; ‘कोडा’ सर्वोत्कृष्ट चित्रपट

अनुराधा कोरवी

लॉस एंजिल्स ः येथील प्रसिद्ध डॉल्बी थिएटरमध्ये 94 वा ऑस्कर पुरस्कार सोहळा नेहमीच्या दिमाखात पार पडला. यावर्षीच्या सोहळ्यात वॉर्नर ब्रदर्स निर्मित 'ड्यून' चित्रपटाने सर्वाधिक सहा पुरस्कारांवर नाव कोरले. 'किंग रिचर्ड' या चित्रपटासाठी अभिनेता विल स्मिथ याला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा तर 'द आईज ऑफ टॅमी फेय' चित्रपटासाठी जेसिका चेस्टेन हिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला. 'कोडा' या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार मिळाला. सर्वोत्कृष्ट माहितीपटाच्या श्रेणीत नामांकन मिळवलेल्या भारताच्या 'रायटिंग विथ फायर'च्या वाट्याला निराशाच आली.

चित्रपटसृष्टीत मानाचा समजल्या जाणार्‍या ऑस्कर पुरस्कारासाठी यंदा बेनेडिक्ट कंबरबॅचची मुख्य भूमिका असलेल्या 'द पॉवर ऑफ डॉग' या चित्रपटाला सर्वाधिक 12 नामांकने मिळाली होती. मात्र, बाजी मारली 'ड्यून'ने. 'ड्यून' चित्रपटाला एडिटिंग, ओरिजिनल स्कोअर, प्रॉडक्शन डिझाईन, साऊंड, व्हिज्युअल इफेक्ट आणि सिनेमॅटोग्राफी असे एकूण सहा पुरस्कार मिळाले. 'कोडा' या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा ऑस्कर मिळालाच आणि चित्रपटाच्या संपूर्ण टीममधील कलाकारांना यावेळी स्टँडिंग ओव्हेशनही देण्यात आले.

'द आईज ऑफ टॅमी फेय' साठी जेसिका चेस्टेन हिने यंदा ऑस्करवर आपली मोहोर उमटवली. जगभर लोकप्रिय असलेला अभिनेता विल स्मिथ याला 'किंग रिचर्ड' साठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला. हा पुरस्कार स्वीकारत असताना विल भावूक झाला. 'द पॉवर ऑफ द डॉग' चित्रपटासाठी जेन कॅम्पियन यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार देण्यात आला. जेम्स बाँडच्या 'नो टाईम टू डाय' या गाण्यासाठी बिली एलिशला सर्वोत्कृष्ट मूळ गायकाचा पुरस्कार मिळाला. प्रेक्षकांची सर्वाधिक पसंती मिळालेला चित्रपट म्हणून जॅक स्नायडरच्या 'आर्मी ऑफ द डेड'ची निवड करण्यात आली.

सर्वोत्कृष्ट माहितीपटाच्या श्रेणीत 'द समर ऑफ सोल'ने ऑस्कर पटकावला. या श्रेणीत 'रायटिंग विथ फायर' या भारतीय माहितीपटाला नामांकन मिळाले होते. मात्र, पुरस्कार मिळवण्यात त्याला अपयश आले. सर्वोत्कृष्ट वेशभूषाकार श्रेणीत 'क्रुएला' चित्रपटासाठी जेनी बेवन यांना ऑस्कर मिळाला. सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय फीचर फिल्मचा पुरस्कार 'ड्राईव्ह माय कार'ला मिळाला.

टॉय कोत्सुर यांना 'कोडा'साठी सर्वोत्कृष्ट सहायक अभिनेत्याचा तर अ‍ॅरियाना डीबोसला 'वेस्ट साईड स्टोरी'साठी सर्वोत्कृष्ट सहायक अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला. 'एन्कँटो' हा सर्वोत्कृष्ट अ‍ॅनिमेटेड चित्रपट ठरला. या सोहळ्यात अनेक दिवंगत कलाकारांना श्रद्धांजली वाहण्यात आली. मात्र, लता मंगेशकर व दिलीप कुमार या दिग्गजांचा त्यामध्ये नामोल्लेख नसल्यामुळे अनेक भारतीयांनी सोशल मीडियावरून नाराजी व्यक्‍त केली.

हेही वाचलंत का? 

SCROLL FOR NEXT